आशाताई बच्छाव
छत्रपती शंभुराजे परिवार (वेड इतिहासाचे) कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग आयोजित मुख्य दुर्गसंवर्धन मोहिम किल्ले श्री चांदवड येथे शनिवार दिनांक २० मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. हि मुख्य मोहिम असून ६ वी विभागीय मोहिम होती. गेले ६ महिने परिवाराचा नाशिक विभाग किल्ले चांदवड च्या संवर्धनासाठी अविरतपणे कष्ट करत आहे. त्यात प्रामुख्याने परिवाराचे नाशिक विभाग प्रमुख शिवव्याख्याते संदिप दादा पवार, चांदवड तालुका प्रमुख दत्ताभाऊ जाधव, गणेश आहेर, आकाश कुंभार्डे, भुषण गायकवाड, मंगेश सानप यांनी विशेष व चोख नियोजन केले. मोहिमेसाठी पुणे, मुंबई, अ.नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, सातारा ह्या जिल्ह्यांतून दुर्गसेवकांनी हजेरी लावली. किल्ल्यावर असलेल्या काही पाण्याच्या टाक्यांना मोकळा श्वास देण्याचे काम दुर्गसेवक व दुर्गसेविकांनी केले. पाण्याच्या टाक्यात साचलेली माती बाहेर काढून टाके साफ करण्यात आले.किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रेणुका माता मंदिर येथे रात्री हनुमान चालीसा, श्लोक व गीत पठण घेण्यात आले. त्यानंतर प्राध्यापक काळे सरांचे व्याख्यानातून मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षक राहुल दादा राजपूत यांच्या “गीता बाल विद्या मंदिराच्या” रणरागिणींनी मर्दानी खेळ खेळून एक लढाऊ बाणा शिकवला. शिवव्याख्याते संदिप दादा पवार ह्यांच्या व्याख्यानाने मोहिमेच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.
दुसर्या दिवशी रविवारी दिनांक २१ मे रोजी चांदवड तालुक्यातील अहिल्यादेवी होळकर रंगमहालाची साफसफाई करून राजमाता अहिल्यादेवींना एक आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शंभुराजे परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सुनील दादा साखरे, महिलाध्यक्षा धनश्री ताई शेवाळे व प्रदेशाध्यक्ष अनिकेत दादा मंडलिक हे देखील उपस्थित होते. अशाप्रकारे ही दोन दिवसीय मुख्य मोहिम अतिशय उत्साहात पार पडली.