राजेंद्र पाटील राऊत
ठाणेकरांची तहान भागणार…! ठाणे महापौर,खासदार राजन विचारे यांच्या हस्ते जलकुभांचं लोकार्पण….
ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
महापालिकेच्या स्वतंत्र पाणीपुरवठ्यातून वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी विविध उपाययोजनांची कामे मंजूर करुन याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. घोडबंदर रोड परिसरात नव्याने दोन जलकुंभ आणि संप-पंप देखील उभारण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे उभारण्यात आलेल्या संप-पंप हाऊस आणि जलकुभांचं आज लोकार्पण झालं.
सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या पाणीपुरवठ्याव्यतिरिक्त प्रतिदिन 12 द.ल.लि प्रतिदिन इतका पाणीपुरवठा या जलकुंभामार्फत होणार आहे. तसेच 15 लक्ष क्षमतेच्या संपमधून 100 अश्वशक्तीच्या तीन पंपाद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे. सुमारे 29 कि.मी लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
या जलकुभांमुळे घोडबंदर रोडवरील प्र.क्र. 1 मधील पाण्याचा प्रश्न सुटणार असून नागरिकांना मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा होईल असे महापौरांनी यावेळी सांगितले. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठा अंतर्गत रिमॉडेलिंगचे काम सुरू आहे.
टप्प्याटप्प्याने महापालिका कार्यक्षेत्रातील इतर विभागातही पाणीपुरवठा मुबलक होईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्याची कार्यवाही सुरू असल्याचं महापौरांनी सांगितलं. या दोन्ही जलकुंभामुळे घोडबंदर रोड परिसरातील पाणी समस्या सुटण्यास मदत होणार असून यामध्ये हावरे सिटी, रौनक हाईट, रोझा गार्डनिया, पारिजात गार्डन, महावीर कल्पवृक्ष, पाचवड पाडा, पुराणिक टोक्यो बे, वेदांत हॉस्पिटल, विहंग व्हॅली, उन्नती ग्रीन, प्लॅटिनम लॉन्स, कॉसमॉस ज्वेल्स, पार्क वुड, युनिक ग्रीन, साईनगर, भक्तीपार्क , ऋतु एन्क्लेव्ह, संघवी हिल्स, ग्रीन स्क्वेअर, ग्रॅण्ड स्क्वेअर सुदर्शन स्काय गार्डन आदी विभागातील 80 हजार नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याबरोबरच ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी देखील आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूकीवरील भार कमी व्हावा या दृष्टीने जलवाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही उपाययोजना करीत आहोत. असे महापौर यांनी सांगितले