राजेंद्र पाटील राऊत
कळवाडी गावात प्रशासनाच्या दक्षतेमुळे तणाव होता -होता टळला
मालेगांव /राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क
सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीचा धुमधडाका सुरु असताना नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातल्या कळवाडी गावात मात्र काल रात्री अज्ञात व्यक्तीनी न्यायालयाची बंदी असतानाही सार्वजनिक जागेवर महापुरुषांचा पुतळा बसविल्याने कळवाडी गावात तणाव होता- होता प्रशासनाच्या दक्षतेमुळे टळला आहे.
याबाबत प्राप्त सविस्तर माहिती अशी की,मालेगांव तालुक्याच्या कळवाडी गावात सध्या ग्रामपंचायतीची निवडणूक सुरु आहे.आणि आचारसंहीता लागू असतानाच काल रात्री काही अज्ञात व्यक्तीनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बस स्ट्ँण्ड परिसरात रातोरात बसविल्याने काही वादंग व तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्यापुर्वीच मालेगांवचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी मालेगांव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ढोमणे यांच्यासह पोलिस पथक सोबत घेऊन कळवाडी गावी घटनास्थळी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विधीवत पुजा करुन काढून घेण्यात आला.त्यामुळे निवडणूक काळात मोठ्या तणावाची घटना घडण्यापासून टळली.
सर्वाच्च न्यायालयाने सार्वजनिक जागावर महापुरुषांचे पुतळे बसविण्यास बंदी घातलेली असतानाही,कळवाडी सारख्या राजकीयदृष्टया सक्षम गावात असे प्रकार रात्रीच्या अंधारात करणाऱ्या अज्ञात गुन्हेगारांचा तपास लावण्याचे आव्हान अखेर तालुका पोलिसावर येते.
सदर पुतळा बांधकाम करताना बांधकाम कामगार कोण?सिमेंट रेतीची वाहतूक करणारे वाहनचालक कोण ?यांच्यापासून तपास केल्यावरच झारीतील शुक्राचार्य कोण?हे पोलिस तपासात उघड होणार आहे.