Home सामाजिक माझ्या आठवणीतली होळी

माझ्या आठवणीतली होळी

323
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_070049.jpg

माझ्या आठवणीतली होळी

आपल्या संस्कृतीत अनेक सण साजरे केले जातात.प्रत्येक सणाचं विशेष महत्त्व आहे.होळी या सणालाही खूप महत्त्व आहे.मला माझ्या बालपणीची होळी अजूनही आठवते.मला आणि माझ्या लहान मित्र – मैत्रिणींना होळीची फार उत्सुकता असे.वर्षामागून वर्षे सरली तरीही बालपणीच्या होळीची आठवण प्रत्येक होळीला हमखास येतेच.त्यावेळी मी नऊ- दहा वर्षांची असेल.आमच्यात थोडी मोठी मुले-मुली पण होती.ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही लहान मुले वागत असायचो.होळीची सर्वात जास्त मजा लुटता येते ती बालपणीच.आम्ही सर्व मुले मिळून धमाल करायचो.होळीच्या पहिल्या दिवशी रात्री होळी पेटली की मी आणि माझे दोन भावंडे होळीची पूजा करण्यासाठी आईसोबत जायचो.होळीला हळद-कुंकू,अक्षदा वाहून आणि होळीला नारळ अर्पण करून थोडावेळ आम्ही भावंडे होळीच्या शेकोटी भोवती बसायचो.सोबत माझे लहानगे मित्र- मैत्रिणीही असत.होळी झाल्यावर दुसरा दिवस यायचा तो रंगपंचमीचा.होळीच्या दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना रंग पूर्णपणे न निघाल्यामुळे कधीकधी शिक्षकांचा ओरडाही मिळायचा.पण त्यातही मजा वाटायची.मला मात्र रंग खेळण्याची भिती वाटायची कारण रंग सहजासहजी एका दिवसात निघत नाही.हे माहित असल्यामुळे माझ्या ग्रुपच्या मुली रंग पाहूनच दूर पळायचो.जिथे जागा मिळेल तेथे लपायचो.पण त्याचा काही उपयोग होत नसे.आमच्या ग्रुपची मुले आम्हाला हुडकून काढत आम्हाला रंग फासत आणि मोठ्याने ओरडत..’होली है’.पण त्यातही गंमत होती.रंगात भिजताना दुपार झालेली असायची आणि भूकही लागली असायची.मी आणि माझ्या ग्रुपची मुले- मुली रंग खेळून थकलेलो असत.मग आईने बनविलेल्या पुरणपोळीची आठवण होई.घरी जाऊन आंघोळ करून मस्त आईच्या हातची गरमागरम पुरणपोळी,वडे खायला मिळायचे.आईच्या हातची पुरणपोळीची आजही आठवण येते.आज प्रत्येकजण व्यस्त झालाय.त्यामुळे होळीची पूर्वीसारखी मजा करणं शक्य होत नाही.त्यामुळे लहानपणाची होळी आठवली की आजही मनाला आनंद होतो.
काळ बदलला तसे होळी खेळण्याची पध्दत सुध्दा बदलली.नैसर्गिक रंगांऐवजी केमिकल रंग वापरणे,पाण्याचे फुगे लोकांच्या अंगावर फेकणे,दारू पिऊन धिंगाणा घालणे असले प्रकार अधिकच वाढले.रस्त्यावरून जाणा-या येणाऱ्या लोकांवर रंग टाकणे,धावत्या रिक्षा-बसेसवर रंगांचे फुगे मारणे अशा गोष्टी हल्ली खूप वाढल्या आहेत.कित्येकदा यामुळे लोकांच्या डोळ्यांना,कानांना अपाय होतो.लोकांच्या जिवाशी खेळ करणारी ही कसली होळी? शहरांमध्ये होळीला पाण्याचे टॅंकर बोलावून रेन डान्स केला जातो. एकीकडे लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे काही लोक पाण्याची नासाडी करतात.ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.आपल्या सणांचा उद्देश कुणालाही त्रास देणे अजिबात नाही.लोक मात्र आपल्या मनमर्जीने वागतात ज्याचा कित्येकदा इतरांनाही त्रास होतो.होलीका वाईट होती म्हणून तिचा अंत जळून झाला.म्हणजेच जे वाईट आचार- विचार आहेत त्यांना तिलांजली देणे, मनातील वाईट विचारांना अग्नीत जाळून राख करणे हाच होळी सण साजरा करण्यामागे खरा उद्देश आहे.चांगल्या गोष्टींचा संकल्प करून आपले जीवन आनंददायी बनवणे हाच प्रत्येक सणाचा हेतू असतो.आता पूर्वीसारखी होळी साजरी होत नाही.शहरांमध्ये सिमेंटच्या जंगलात पेटणा-या होळ्या मन रिझवू शकत नाही.रंगांची चार बोटं गालावर लावून आभासी जगात सेल्फी सोशल मीडियावर टाकून त्यावरच्या काॅमेंट्स वाचण्यापुरतच आता काय ते इथलं होळीचं अस्तित्व.

लैलेशा भुरे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here