Home विदर्भ अनाथ बालकांना बाल संगोपन व बाल न्याय निधीमधून लाभ

अनाथ बालकांना बाल संगोपन व बाल न्याय निधीमधून लाभ

77
0

राजेंद्र पाटील राऊत

अनाथ बालकांना बाल संगोपन व बाल न्याय निधीमधून लाभ देण्यात यावा                                                                (ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा)
– जिल्हाधिकारी एस रामामूर्ती
• अनाथ बालकासंदर्भातील जिल्हा कृती दलाची बैठक
बुलडाणा, (युवा मराठा वृतसेवा) : जिल्ह्यात कोविडमुळे एक पालक किंवा आई-वडील गमावलेल्या बालकांची संख्या 522 असून चारशेपेक्षा जास्त बालकांची गृहचौकशी पूर्ण करण्यात आली आहे. बाल कल्याण समितीमार्फत काळजी व संरक्षणातील बालकांना शैक्षणिक साहित्य खरेदी, शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क आदींकरीता 10 हजार रूपयापर्यंत मदत बाल संगोपन व बाल न्याय निधीमधून देण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात अनाथ बालकासंदर्भात जिल्हा कृती दल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते.
बैठकीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एम. एम अष्टेकर, बाल संरक्षण अधिकारी श्री. मराठे, संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आदेशीत करताना म्हणाले, जिल्हा कृती दलाला 164 महिलांची माहिती प्राप्त झाली असून खामगांव, मेहकर व बुलडाणा तालुके वगळता इतर तालुक्यात सदर महिलांना योजनांचा लाभ देण्यात यावा. मिशन वात्सल्य, शासन आपल्या दारी अंतर्गत एकल अथवा विधवांना शासन निर्णयाप्रमाणे योजनांचा लाभ देण्यासंदर्भात तालुका स्तरावर कार्यवाही करण्यात यावी. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत बालकांच्या संपत्ती विषयक हक्कांचे संरक्षण करून त्यांना वारसा हक्क प्रमाणपत्र वाटप करावे.
रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षणाबाबत सूचीत करीत जिल्हाधिकारी म्हणाले, रस्त्यावर संकटात सापडलेल्या बालकांचे सर्वेक्षण पूर्ण करावे. सर्वेक्षणात ज्या बालकांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्माचा दाखला नाही अशा बालकांना संबंधित कागदपत्रे काढून देऊन त्यांना सेवा देण्यात यावी. तसेच अशा बालकांचा सर्व ठिकाणी शोध घेवून त्यांची निश्चिती करून एक पालक, अनाथ, हरविलेले बालक व बेवारस बालकांना बाल कल्याण समितीसमोर हजर करावे.
जयदीपला दिली कौतुकाची थाप
जयदीप हा चिखली तालुक्यातील आहे. तो कोरोनामुळे आई-वडील गेल्यामुळे अनाथ झालेला होता. जिल्हा कृती दलामार्फत जयदीपला यापूर्वी 5 लक्ष मुदतठेव देण्यात आलेली आहे. तसेच अनाथ प्रवर्गात एक टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळेच नीट परीक्षा 2021 मध्ये जयदीपला अनाथ प्रवर्गातून वैद्यकीय शिक्षणासाठी एमबीबीएसला संधी मिळाली. जिल्ह्यात अनाथ प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेणारा जयदीप हा पहिला विद्यार्थी असून या कामगिरीबद्दल जयदीपचा सत्कार करीत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी त्याला कौतुकाची थाप दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here