राजेंद्र पाटील राऊत
महावितरणच्या विरोधात रयत क्रांती आक्रमक
विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे धरणे आंदोलन.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
नांदेड/देगलूर दि.१४/०१ : रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा आ. सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार आणि युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली देगलूर येथे कार्यकारी अभियंता उपविभागीय कार्यालय समोर दि.१४ रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
जगाचा पोशिंदा असणारा शेतकर्यांचा या वर्षी खरीप हंगाम निसर्गाच्या अवकृपेमुळे वाया गेला आहे, शेतकरी नव्या जोमाने रब्बी हंगामात पेरणी केली आहे ,आपल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बोगस कृषी पंपाची बिले देऊन शेतकर्यांकडून सक्तीने वसूल केली आहे, तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिके वाळून जातील म्हणून बिले भरले .तरी सुद्धा महावितरण सेवा देण्यास सपशेल अपयशी ठरली आहे
मुखेड तालुक्यातील मौजे धामणगाव येथील शेत शिवारातील विजेचे पोल जुलै २०२१ या काळात पडून शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे .यापूर्वी शेतकऱ्यांनी यासंबंधी आपल्या कार्यालयात तक्रार दिली होती पण यावर कोणतीही उपाययोजना झाली नाही .आपल्या महावितरणच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभारामुळे आम्हा शेतकऱ्यावर धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे ,असे आंदोलनकर्त्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.
खालील मागण्या मान्य कराव्यात अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
१) जिल्ह्यातील सर्व गावातील व शेतातील डी.पी तात्काळ दुरुस्त करावे.
२) शेतीला दिवसा सलग आठ तास वीज पुरवठा करावा.
३)मोजे धामणगाव ता. मुखेड येथील लाईट पोल पडल्यामुळे शेतीचे नुकसान झाले त्याची भरपाई द्यावी.
४)धामणगाव व परिसरातील पडलेले विजेचे पोल तात्काळ दुरुस्त करावे.
निवेदनाची प्रत आंदोलन स्थळी येऊन कार्यकारी अभियंता चटलवार यांनी घेतली व लवकर आपल्या मागण्या मान्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, नायगाव तालुकाध्यक्ष शहाजी कदम,उत्तम वडजे, साईनाथ कोंडावार, व्यंकट आईनवाड व अनेक शेतकरी उपस्थित होते.