• Home
  • स्त्री स्वातंत्र्य .किती खरे,किती खोटे?

स्त्री स्वातंत्र्य .किती खरे,किती खोटे?

राजेंद्र पाटील राऊत

3-village-lady-vishal-gurjar.jpg

स्त्री स्वातंत्र्य .किती खरे,किती खोटे?

संकलन-श्रीमती आशाताई बच्छाव युवा मराठा नेटवर्क
स्वातंत्र्यानंतरच्या जवळजवळ सत्तर वर्षांच्या काळात भारतीयांच्या एकंदर आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यातही थोडे अधिक बदल झाले आहेत ते स्त्रियांच्या आयुष्यात. त्यांच्या साक्षरतेत वाढ झाली आहे आणि त्याचाच परिणाम त्यांच्या प्रगतीवरही झालेला आहे. त्यांचे विविध स्तरांतील, विविध विषयांवरचे काम आता जगासमोर यायला लागले आहे. त्यांना आपल्या कर्तव्याबरोबरीने येणाऱ्या हक्कांची जाणीवही होऊ लागली आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध, त्यांना न्याय मिळण्यासाठी नवीन कायदे केले जात आहेत. या साऱ्यामुळे जसजसा बदल एकूण स्त्रियांमध्ये होतो आहे, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात होतो आहे त्याचे प्रतिबिंब समाजावरही पडलेले दिसते. मात्र, हे सारे घडले आहे मूठभर स्त्रियांच्या आयुष्यात आणि त्यांच्याच छोट्याशा परिघात. भारतीय राज्यघटना समानतेवर आधारलेली असली, त्यात लिंगभेद, वर्णभेद आणि वर्गभेदाला जागा नसली, तरी प्रत्यक्षात तसे दिसत नाही. समानता अस्तित्वात नाही हे वास्तव इतके स्पष्ट आहे की ते सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. स्त्रियांचे स्थान कुटुंबात आणि पर्यायाने समाजातही गौण आहे.

संपूर्ण देशात केलेल्या एका पाहणीत स्त्रियांना सामोरे जावे लागणाऱ्या हिंसेसंदर्भात काही माहिती गोळा करण्यात आली. इतकी खासगी आणि संवेदनशील माहिती स्त्रिया एका अनोळखी व्यक्तीला देत असतील का? कदाचित सगळ्या देत नसतीलही. त्यामुळे पाहणीतून दिसणारे आकडे नि:संशय कमी आहेत. हिंसा याहून अधिक प्रमाणात होत असणार याची शक्यता आहे; परंतु किमान इतक्या स्त्रिया हिंसेला सामोरे जात आहेत हे तरी कळले. मिळालेल्या आकड्यांचे महत्त्व यासाठी की किमान त्या मोकळेपणाने बोलल्या. स्वत:ला असणारी समस्या स्वत:जवळच मान्य करणे, त्याविषयी इतर कोणाशी तरी बोलणे, चर्चा करणे हे समस्येवरील उत्तर शोधण्याची पहिली पायरीच समजायला हरकत नाही.

हिंसेविषयी गोळा केलेल्या माहितीनुसार दर तीनपैकी किमान एकीला, वयाची पंधरा वर्षे पूर्ण केल्यानंतर मारहाण किंवा शारीरिक इजेचा अनुभव आला आहे, तर सर्वेक्षणापूर्वीच्या एका वर्षात अशा घटना ३८ टक्के स्त्रियांच्या आयुष्यात घडल्या आहेत. हे आकडे अजिबात उत्साहवर्धक नाहीत; कारण यापूर्वी अशाच प्रकारे झालेल्या पाहणीतून आलेल्या आकड्यांपेक्षा ते जास्त आहेत.

एकीकडे स्त्रियांची प्रगती होते आहे, त्यांचे शिक्षण वाढते आहे, शिकणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढते आहे. मग हे आकडे असे का दिसतात? खरेच स्त्रियांना होणारी मारहाण, इजा वाढते आहे का? की हे आकडे आणखी काही सांगतात? म्हणजे असे होते आहे का की स्त्रिया त्यांच्या शिक्षणामुळे, त्यांना मिळत असणाऱ्या एक्स्पोजरमुळे अधिक प्रांजळ झाल्या आहेत, आपल्याला येत असलेल्या अनुभवाकडे अधिक तटस्थतेने पाहू लागल्या आहेत आणि त्यामुळे आलेला अनुभव सांगून मोकळ्या होत आहेत. याचे नेमके उत्तर आपल्याला पाहणीतून मिळत नाही; परंतु विचार करायला मात्र प्रवृत्त करते. समस्या मान्य करणे आणि अनुभवकथन करणे हे उत्तर शोधण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल असेल तर आकडे वाढले असले तरी वाटचाल योग्य मार्गाने चालू आहे आणि तसे नसेल, तर मात्र परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे.
शारीरिक इजेबरोबरच या सर्वेक्षणात लैंगिक आणि भावनिक हिंसेबद्दलही माहिती आहे. स्त्रियांच्या मनाविरुद्ध केलेला लैंगिक व्यवहार ही एक प्रकारची हिंसाच असल्याचे यात मानले आहे. तसेच मानहानीकारक, मनाला लागेल असे बोलणे, टोमणे मारणे हा भावनिक हिंसाचार समजला आहे. त्यानुसार दहा टक्के स्त्रियांनी लैंगिक हिंसेचा, तर १६ टक्के स्त्रियांनी भावनिक हिंसेचा अनुभव आल्याची माहिती दिली आहे. या दोन्ही हिंसांचे प्रमाण शारीरिक हिंसेपेक्षा कमी आहे. कदाचित विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात या आणि अशा गोष्टी पुष्कळदा घडत असल्याने त्याला हिंसा म्हणून नमूद करायला हवे असे अनेकींना वाटले नसावे. कारण दिलेल्या व्याख्येनुसार त्या हिंसांचे प्रमाण कितीतरी जास्त असणार यात शंका नाही. शारीरिक हिंसा ही फारच ठळक असते त्यामानाने भावनिक हिंसा अधिक सूक्ष्म स्तरावर होत असते.

तिन्ही प्रकारच्या हिंसांच्या माहितीचे विश्लेषण करताना समोर आलेल्या बाबी म्हणजे हिंसा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक आहे. तसेच जसजशी आर्थिक स्थिती सुधारत जाते, शिक्षण वाढत जाते तसतशी हिंसा कमी होत जाते. शिवाय एकंदरीत स्त्रियांना त्रास देण्याचे प्रमाण एकत्र कुटुंबात विभक्त कुटुंबांच्या तुलनेने कमी आहे. याचाच अर्थ ग्रामीण भागात, विभक्त कुटुंबात राहणारी अशिक्षित आणि गरीब स्त्री सर्वात जास्त प्रमाणात हिंसेला बळी पडते. पुन्हा एकदा स्त्रियांच्या संदर्भात विचार करताना त्यानी शिक्षण घेण्याची किंवा खरे तर शक्य तितके अधिक उच्च शिक्षण घेण्याची आवश्यकता अधोरेखित होते. शिवाय घरी इतर माणसे असतील आणि तिला कुटुंबाचा आधार असेल तर ती जास्त सुरक्षित राहील.

हिंसा होताना त्यात दुसरी व्यक्ती आणि याठिकाणी बऱ्याच वेळेला तर प्रत्यक्ष नवराच सहभागी असतो. कित्येक वेळेला स्त्रिया असहाय्य असतात, तर कधी काही कारणांमुळे प्रतिकार करू शकत नाहीत. याचाच अर्थ प्रत्यक्ष हिंसा होणे त्यांच्या हातात नसते. पूर्वी जरी स्त्रियांनी अशी हिंसा मान्य केलेली असली, तरी आता हिंसा मान्य नसणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढल्याचे याच पाहणीतून दिसून येते.

पुरुषांच्या तुलनेत मिळणारे दीर्घ आयुष्य अधिक जगण्यायोग्य करून त्याप्रमाणे पूर्ण क्षमतेने जगणे सर्वच स्त्रियांसाठी फार महत्त्वाचे आहे. वाढलेले आयुर्मान हे त्यांच्या अधिक चांगल्या आयुष्याकडे चाललेल्या वाटचालीची एक महत्त्वाची पायरी आहे. किमान काही विशिष्ट स्तरात तरी शिक्षण वाढते आहे, ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत, हळूहळू स्वत्त्वाची जाणीवही रुजायला सुरुवात झाली आहे तरीही त्यांना अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे; कारण भारतातील बहुसंख्य स्त्रियांच्या संदर्भात काही प्रश्न अजूनही उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत.

anews Banner

Leave A Comment