Home सामाजिक योद्धा संन्यासी , स्वामी विवेकानंद

योद्धा संन्यासी , स्वामी विवेकानंद

109
0

राजेंद्र पाटील राऊत

योद्धा संन्यासी ,
स्वामी विवेकानंद

( विशेष लेख- मोहन शिंदे कार्यकारी संपादक युवा मराठा कोल्हापूर )
स्वामी विवेकानंद हे नाव ऐकले की पहिल्यांदा डोळ्यासमोर उभी राहते एक दोन्ही हातांची घडी घालून, चेहऱ्यावर आणि डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास घेऊन उभे असलेली तरणीबांड मूर्ती. ही मूर्ती एका साधूची आहे, असे म्हटल्यावर कुणीही अविश्वास दाखवावा. अंगावरील भगव्या कपड्यांमुळे ते ओळखू यावे. पण कुठच्याही इतर कपड्यात भारतीयांना वैचारिक नेतृत्व देणारा तो नेताच वाटावा. राजेशाही कपड्यात राजा वाटावा. सूट घातला तर यशस्वी कॉर्पोरेट लीडर वाटावा. स्वामीजींनी भारतीयांना नेतृत्व देण्यासाठी भगवी वस्त्रे निवडली- कारण त्यांच्याच शब्दात धर्मकारण हा भारताचा मूळ स्वभाव आहे. भारतीयांना काही सांगायचे असेल तर ते धर्माच्या माध्यमातूनच अधिक चांगले समजते.
प्रचंड विद्वत्ता आणि अध्यात्मिक अनुभूतीचे तेज त्या मुखमंडळावर विराजमान आणि भविष्याच्या आरपार भेदू पाहणारी नजर. पण त्या नजरेने केवळ पारलौकिक आणि अध्यात्मिक भारताची मांडणी करण्याची स्वप्ने पहिली नाहीत. त्यांनी येथील भारतीय तरुणांना जागे करू पाहिले. म्हणाले, सिंहासारखे निडर व्हा! आणि राष्ट्र आणि राष्ट्र हे एकाच दैवत माना. राष्ट्राला कर्मयोगाची दीक्षा देताना, या संन्यासाने कर्मयोगाला अध्यात्मिक आणि तात्विक अधिष्ठान देत भगवद्गीतेतील कर्मसंन्यास योगाचीच जणू प्रचिती दिली. हिंदू धर्माचा आणि भारताचा- भारतीय होण्याचा प्रचंड अभिमान त्यांच्या कार्यात परावर्तित झाला. भारताला अशा एका योद्धा संन्यासाची गरज होती. भारताची पुण्याई इतकी, की तिला योग्य वेळी तो मिळाला.
तेंव्हाही आणि आजही स्वामीजींच्या चारित्र्यातील सर्वाधिक महत्वाचा मुद्दा कुठला तर ते तरुण होते. एखाद्या दाढी वाढलेल्या साधूने देशाला वेदांत सांगू पहिला असता तर त्याचा कदाचित अध्यात्मिक तेवढाच परिणाम झाला असता. त्यांचे कार्य भारताचे भाग्यविधाता ठरले, कारण एका तरुणाने हा मार्ग निवडला- हे भारतीयांना आवडले. एका तरुणाने तरुणांना प्रेरणा दिली. स्वामीजींच्या बोलण्यात धार होती- विचारात स्पष्टता होती आणि चेहऱ्यावर तारुण्य होते. म्हणून या देशाच्या तरुणांना ते आरपार भेदून गेले.
आपल्या इतिहासाच्या कालखण्डात, हिंदू धर्मात होऊन गेलेल्या संन्यासी- संत महंतांनी भारताच्या तात्कालिक गरजे बर हुकूम कार्य केले. म्हणूनच भारतीयत्वाचा प्रवाह सदोदित वाहता राहताना हिंदू धर्माची पताका सतत उंचावत राहिली. या महात्म्यांनी आपल्या उपदेशातून या प्रवाहातील साचलेपण दूर केले आणि तो वाहता केला.
स्वामीजींच्या जीवनाचे इप्सित या देशाच्या गर्भश्रीमंतीची ओळख जगाला आणि आपल्यालाही पुन्हा करुन देणेच होते. यासाठी स्वामीजींनीच वेदांताचा पाया स्वीकारला, आणि त्यावर आपल्या विचारांची इमारत रचली. त्यांनी प्राचीन भारताच्या श्रीमंतीचा दाखला दिला. ते स्वत: ह्या श्रीमंतीने प्रभावित झाले होते. ते म्हणतात, जितका मी भारताच्या प्राचीन इतिहासाचा अधिक अभ्यास करतो, या देशाविषयी असणारा माझा आदर अधिक वाढत जातो. ह्या प्राचीन वारशाचा दाखला देतच त्यांनी भारतीय तरुणांमध्ये जाग निर्माण केली.
तत्कालीन भारताची विशेषतः नव-शिक्षित तरुणांची विचार शक्ती पाश्चिमात्य होत होती. पाश्चिमात्य विचारानीं प्रेरित होऊन, इंग्रजांना जे भारतीयात रुजवायचे होते, ते भारताच्या इतिहासाविषयी आणि विचारदर्शनाविषयी अनास्था, भारतीयांत वाढीस लागू पाहत होती. अशा वेळेस स्वामीजींनी प्रवाहाच्या विरुद्ध पोहून आपले म्हणणे भारतीयांमध्ये रुजवले. ते रुजवण्यासाठी त्यांनी आधी या अनास्थेच्या मूळ स्रोतावर घाव घातला. अमेरिकेत जाऊन आधी त्यांचा सुपडा साफ केला. भारतीयांमध्ये धर्म नाहीच सांगणाऱ्या पाश्चिमात्यांच्या डोळ्यात अंजन घातले. तिकडे वेदान्ताचे वर्ग सुरु केल्यावर इथे आपल्या देशातील ग्लानी दूर झाली. गोऱ्या कातडीने उदो उदो केल्यावर आपल्याला आपल्या माणसाचे महत्व पटावे ही तर आमची जुनी खोड! भारतात धर्मजागृती करण्यासाठी येणाऱ्या मिशनऱ्यांची आवश्यकताच त्यांनी संपवली हा त्यांचा तत्कालीन भारतावरील राजकीय परिणाम.
आज भारताला ह्या जागृतीची गरज आहे. तशी ती नेहमीच लागणार आहे. ह्या जागृतीचे अधिष्ठान स्वामीजींच्या हिंदुत्वाची मशाल आहे. त्यांचे विचार- त्यांची दर्शने- त्यांची तळमळ समजून घेतली आणि प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीत रुजवली तर भारताला कधीच ग्लानी येणार नाही. त्यांच्या मोहिमेची योजना प्रत्येक भारतीयाचा पहिला पाठ असला पाहिजे. त्यांच्या भाषणातून आणि पुस्तकातून कितीतरी कालातीत विचार त्यांनी मांडले आहेत. ते भारतीयांनी स्वीकारले आणि अंगिकारले- पुढच्या पिढीत पसरवले, तर त्यांना कुठच्याही काळात- स्वतःला प्रेरित करणाऱ्या, आणि स्वतःचा सन्मान जपणाऱ्या विचारांची कमतरता जाणवणार नाही- वैयक्तिक आयुष्यतही आणि सामाजिक आयुष्यतही.
आणि स्वामीजींच्या विचाराचा कार्यकारणभाव सामाजिक कामात आहे. कुठचेही राष्ट्रीय कार्य ज्यात तुम्ही स्वतःला अडकवून घेऊ शकता. अगदी संपूर्ण समर्पण नाही करता येणार प्रत्येकाला पण किमान त्याच्याशी काही प्रमाणात नाळ साधून घेता येईल.
अजून जी एक महत्वाची गोष्ट प्रत्येक भारतीयाने स्वामीजींकडून घेतली पाहिजे तो लढाऊपणा. स्वामीजी लढाऊ होते. त्यांचे विचार स्पष्ट आणि कार्यप्रवृत्त करणारे आहेत- संन्यासी होऊन सर्व त्याग करण्याची भावना ते देत नाहीत. योद्धा असण्यात गैर नाही- किंबहुना असे योद्धा प्रत्येकाने असावेच! योद्धा असणे म्हणजे दांडगटपणा करणे नव्हे! पण वेळ आली तर तोही करता येतो एवढे समोरच्याला माहित असले पाहिजे. स्वामिजींशी सभ्य शब्दात वाद विवाद न करता, हेकेखोरी करणाऱ्या आणि हिंदू धर्माला अपशब्द बोलणाऱ्या एका मिशनर्याची स्वामीजींनी बोकांडीही धरली होती.भारतीयांनी स्वतःच्या विचारांचे आणि स्वभावाचेही रिस्ट्रक्चरिंग करण्याचा हा काळ आहे. जे सहन करणे अयोग्य आहे तेही सहन करण्याची सद्गुण विकृती भारतीयांमध्ये फार आहे. अशा वेळेस हा लढाऊपणा आवश्यक आहे.
स्वामीजींच्या विचारांची घडी समाजात सतत उलगडती राहिली पाहिजे. स्वामीजींनी त्या काळी भारतीय समाजातील साचलेपण दूर केले होते. असे साचलेपण येऊच नये यासाठी ही सवय भारतीयांनी स्वतःला लावली पाहिजे.
येणाऱ्या काळात भारत देशाचे नेतृत्व करेल असे भाकीत स्वामीजींनी वर्तवले होते. अशा जगज्जेत्या देशाचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे यासाठीच हा अट्टाहास!

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleबातमी शंभर टक्के खरी! होय माझ्यापासुन “ति”ला दोन मुले!! सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेचा खळबळजनक खुलासा….!!
Next articleमुंबई अहमदाबाद हायवे वर १५लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात तलासरी पोलिसांना आले यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here