आशाताई बच्छाव
बिरदेवाच्या नावानं चांगभलं!
एखादी व्यक्ती पालावर शेळ्या-मेंढ्या कातरत असताना पलीकडून मित्राचा फोन येतो; अन् तो म्हणतो. ‘अरे तू आयपीएस झालास’ विचार करा कसा असेल तो अद्भूत क्षण? सारे कल्पनेच्या पल्याड आहे. एका मेंढपाळाच्या मुलाने परिस्थितीला शरण न जाता जिद्द, चिकाटी, संघर्षातून आपली यशोगाथा लिहिली आहे. कोल्हापुरचा बिरदेव सिद्धाप्पा ढोणे हा तमाम वंचित घटकातील तरुणांसाठी ‘दीपस्तंभ’ बनला आहे. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावात बिरदेवचीच चर्चा आहे. जेव्हा युपीएससीचा निकाल लागला, तेव्हा बिरदेव बेळगावी वाड्यातच होता. मग कुटुंबियांनी तेथेच बिरोबाच्या नावानं चांगभलं म्हणत भंडारा उधळला. ग्रामीण पेहेरावातील बिरदेवला धनगरी फेटा बांधण्यात आला; सोबतीला शेळ्या-मेंढरं होतीच! आजवर अनेक सत्कार झाले असतील पण हा सत्कार कैकपटीने निराळा होता. कारण, एक मेंढरं राखणारं पोरगं आयपीएस झालं होतं. लहानपणी मेंढ्या हाकताना एका हातात काठी अन् दुसर्या हातात पुस्तक घेणं कामी आलं होतं! बिरदेवची संघर्षगाथा महासागराच्या गर्तेसमान अन् यश हे हिमालयासमान आहे; तरी ती थोडक्यात सांगण्याचा यत्न करण्याचा मोह होतोच. सबब ही कहाणी आहेच प्रेरणादायी…
बिरदेव हा कोल्हापुरातील कागल तालुक्यातील यमगे गावचा रहिवासी. मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बिरदेवाने घरी अठराविश्व दारिद्र्य बघितले. पोट भरण्यासाठी माळरान, गावं पालथी घालावी लागत. जेथे किडूक मिडूक मिळेल तेथे पाल पडत. बिरदेवाने घरच्या लोकांची फरफट बघितली. बिरदेवचे शिक्षण गावातील झेडपी शाळेतच झाले. भटकंतीचा हंगाम असल्यास शाळा बुडायची. पण बिरदेवाने पुस्तकांशी असलेली मैत्री अबाधित राखली. पालावरच तो तासन्तास वाचत बसायचा. तेथे धड वीजेची सोय देखील नसायची. दिवा-चिमणीच्या प्रकाशाखाली तो अभ्यास करायचा. पण त्याने परिस्थितीचा बाऊ कधी केला नाही. बिरदेव कधी गावातील शाळेत तर कुठे माळरानावर; मिळेल तेथे पुस्तकात हरवलेला असायचा. मेंढपाळ मुलाची शाळेतील चमक बघून गुरूजीही दीपून गेले होते. हा मुलगा प्रगती करेल; हे त्यांनी बिरदेवाच्या वडिलांना पटवून सांगितले. बिरदेवचे वडील दहावी उत्तीर्ण आहेत. मिल्ट्रीत भरती होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले होते. म्हणून त्यांच्यावर मेंढ्या, बकर्या हाकण्याची वेळ आली होती. मुलाला ते दिवस येवू नये म्हणून बिरदेवच्या वडिलांनी तो आठवीत असताना मेंढ्या शालकाकडे सुपूर्द केल्यात व ते यमगे गावात स्थायिक झाले. दोघा पती-पत्नींनी प्रसंगी मजुरी केली, शेतावर ते राबलेत. पण मुलाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. शिक्षणाने शहाणपण येते त्याचे हे उदाहरण! बिरदेवने दहावीत कमाल केली. तो 96 टक्क्यांनी उत्तीर्ण होवून केंद्रात प्रथम आला. गणितात त्यास शंभरापैकी शंभर गुण होते. बिरदेवाची भरारी बघून त्याचा मोठा कौतूक सोहळा झाला. शिक्षणमंत्र्यांनी अभिनंदनाचे पत्र पाठवले. बरेच सत्कार होवून लोकांनी बिरदेवास भरभरून आश्वासने दिलीत; पण सारी आश्वासने हवेतच विरलीत. त्यातील कोणीही मदतीला पुढे आले नाही. बिरदेवास आता शिक्षण कसे घ्यायचे ही चिंता भेडसावत होती. मात्र; नियतीने बिरदेवाकडून फक्त संघर्षाची अपेक्षा केलेली होती. त्याने अकरावीत विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. लागलीच त्यास कोल्हापुरच्या रवीराई चॅरिटेबल ट्रस्टने दोन वर्षांसाठी शैक्षणिक दत्तक घेतले. यानंतर राजेंद्र हजारे नामक एका गृहस्थाने एज्युकेशन लोनसाठी बिरदेवाची ग्यारंटी घेतली. ती किती योग्य होती; ते यथावकाश निकालातून स्पष्ट झाले. बिरदेवाने बारावीत 89 टक्के गुण मिळविले. तो पुन्हा केंद्रात प्रथम आला. सीईटीत चांगले मार्क मिळवत 2016 मध्ये त्याने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (सीईओपी) मध्ये अॅडमिशन घेतले. केवळ स्कॉलरशिपच्या जोरावर बिरदेवाने एवढी हिम्मत केली होती. कॉलेजमध्ये ‘कमवा आणि शिका’ योजनेद्वारे दिवसाला तो शे-दोनशे जुळवत होता. याठिकाणचे मुले युपीएससीत चमकदार कामगिरी करून उत्तीर्ण होताना बिरदेवाने आपल्या डोळ्यांनी बघितले. तेथेच त्याच्या डोक्यात युपीएससीचा विचार घोळू लागला. मग त्याने विचारांना कृतीची जोड देत युपीएससी परीक्षेचा श्रीगणेशा केला. यादरम्यान त्याचा भाऊ वासुदेव ढोणे हा मिल्ट्रीत सिलेक्ट झाल्याने घरची परिस्थिती थोडी सुधारली होती. बिरदेवचा भार हलका झाला होता. वासुदेवाने वडिलांचे मिल्ट्रीत जाण्याचे स्वप्न साकारले होते. आता बिरदेवची बारी होती. त्याने शिक्षण पूर्ण करत स्वत:ला युपीएससीत झोकून दिले.
करोनात लॉकडाऊन लागल्याने बिरदेव गावाकडे आला. त्याने गंगापूर पोस्ट येथे पोस्टमन म्हणून नोकरी पत्कारली. कारण सर्व सोंग करता येतात, पैशांचे सोंग कसे करणार? बिरदेव 11 महिने पोस्टमन म्हणून राबला. दरम्यानच्या काळात बिरदेवचा मित्र अक्षय सोळंकर जो त्यास कॉलेजमध्ये सीनीयर होता; त्या मित्राने त्यास भावासारखे सांभाळले; वेळोवेळी आर्थिक मदत पाठविली. शिवाय, त्यास पुन्हा आपल्या ध्येयाची जाण करुन दिली. यानंतर बिरदेवाने युपीएससी सर करण्यासाठी दिल्ली गाठण्याचे ठरविले. पण पैशांची चणचण होती. त्याने ही अडचण आपला मित्र जय पाटीलला बोलून दाखविली. त्याने त्याचे आजोबा बी.टी. पाटील यांना आपल्या जीवलग मित्राची व्यथा सांगितली. ते एका शिक्षण संस्थेत प्राचार्य होते. श्रीयुत बी.टी. पाटलांनी आपला विद्यार्थी उद्योजक अजित शहा यास फोन केला व त्यांना बिरदेवला मदत करण्याचे सांगितले. त्या माणसाने गुरू आज्ञा प्रमाण मानत बिरदेवच्या खात्यावर 2 लाख 35 हजार रूपये टाकलेत. बिरदेवच्या सोबतीला जय देखील दिल्लीला गेला. त्यांनी तेथे खाजगी कोचिंगमध्ये युपीएससीचे बारकावे शिकून घेतले. याठिकाणी बिरदेव दररोज दहा ते पंधरा तास अभ्यास करायचा. मे 2022 मध्ये त्याने नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा दिली, त्यात तो नापास झाला. मग 2023 मध्ये सीडीएस पूर्व परीक्षा दिली; त्यात तो उत्तीर्ण झाला. एप्रिल महिन्यात त्याची मुलाखत होती; मात्र मे 2023 मध्येच युपीएससीची पूर्व परीक्षा देखील होती. पुन्हा त्याची घालमेल सुरू झाली. कारण, सीडीएस देखील त्याचे आयुष्याचे सोने करणार होती. दरम्यान, दिल्लीत रहाणे अवाक्याबाहेरचे होत असल्याने त्याने पुण्याची वाट धरली. पुण्यात ज्ञानप्रबोधिनी याठिकाणी पुर्व परीक्षा पास असल्याखेरीज प्रवेश मिळत नाही; तेथे वशिलेबाजीही खपविली जात नाही. परंतु, बिरदेवला कोचिंग व रहाण्याची सोय करायची होती. तो थेट ज्ञानप्रबोधिनीचे सर्वेसर्वा विवेक कुलकर्णींना भेटला. त्यांनी बिरदेवाची हुशारी अचूकपणे हेरली व त्यास ज्ञानप्रबोधिनीत आसरा दिला. तेथेच कार्यरत सविता कुळकर्णी मॅडमांना त्याने सीडीएस इंटरव्यू देवू की युपीएससीची प्री देवू हा प्रश्न विचारला. त्या मॅडमांनी बिरदेवास सांगितले ‘मला तू प्री परीक्षा पास झालेला दिसत आहे.’ बिरदेवने सीडीएसच्या इंटरव्यूकडे पाठ फिरवली; किती हे धाडस! येथूनच बिरदेवचे आयपीएस बनणे ठरले. म्हणजे आयुष्यात एक कणखर निर्णय आयुष्य बदलविण्याची ताकद राखतो; हे नंतर सार्यांना कळाले. बिरदेवने सारे लक्ष युपीएससीकडे केंद्रीत केले. तो खरोखरच 2023 ची युपीएससी प्री क्लियर झाला. सोबतच वनसेवेची पुर्व परीक्षा देखील उत्तीर्ण झाला. मात्र; नियतीला बिरदेवाची आणखी परीक्षा बघायची होती. मुख्य परीक्षेचा तो जीवतोड अभ्यास करत होता. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत होता. पण परीक्षा काळातच त्यास डेंग्यूने घेरले; यात तो प्रचंड आजारी पडला. अवघ्या 35 मार्कांनी त्याचा युपीएससी मुख्य परीक्षेचा कट ऑफ हुकला. मात्र गडी कोलमडला नाही. त्याने जिद्दीने पुनश्च: हरिओम केले. भाऊ आणि मित्रांचे पाठबळ पाठीशी होतेच. या पाठबळास त्याने कठोर मेहनतीची जोड दिली. म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर…! बिरदेवने तिसर्या प्रयत्नात देशात 551 वी रँक मिळवत आयपीएस पदाला गवसणी घातली. बिरदेवचा निकाल घोषित होताच कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांनी आनंदाश्रूतून भावनांना वाट मोकळी करून दिली. बिरदेवच्या बहिणीने भावाला रडत-रडत जी मिठी मारली; तो क्षण त्यांची संघर्षगाथा बयाण करत होता. कारण, मेंढपाळांच्या वाट्यास बहिष्कृताचे जीणे येते. लोकं मेंढपाळांकडे कुत्सित नजरेने बघतात. अनेक गावांमध्ये मेंढपाळांना अवमानाला सामोरे जावे लागते. कधी वनखाते, कधी पोलीस खात्याकडून मेंढपाळांची अडवणूक होते. पोलीस ठाण्यात मेंढपाळांना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. बिरदेवाने हे सारे आपल्या डोळ्यांनी बघितले होते. मात्र, आता तोच जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी बघणार आहे. कसा हा नियतीचा न्याय!
बिरदेवच्या जवळच्या लोकांना अजूनही युपीएससी म्हणजे नेमकं काय; हे नीटसे ठाऊक नाही. ती परीक्षा किती खडतर असते; याचाही त्यांना अंदाज नाही. फक्त आपल्या वाड्यातील मुलगा साहेब होणार; इतकेच त्यांच्या गावी आहे. खरोखर बिरदेवाने अवघ्या मेंढपाळ समाजाच्या आयुष्याचे सोने केले. आजही रानोमाळ फिरणार्या धनगर समाजाला शिक्षणाचा गंध नाही. शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळालेले नाही. मात्र, शिक्षणाची ताकद काय असते हे बिरदेवाने दाखवून दिले. यासाठी बिरदेवचे यश डोळ्यात भरणारे आहे. बिरदेवाने आपल्या यशातून एक सामाजिक संदेशही दिला.
अब राजा का बेटा राजा नही बनेगा
अब राजा वही बनेगा जो हकदार होगा
बिरदेवाच्या नावानं चांगभलं!*
– पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील






