• Home
  • नांदेड़ महानगर पालिकेचे कारभारी लवकरच बदलन्याच्या हलचाई सुरु – ऑनलाईन सभेद्वारे होणार निवडणुका

नांदेड़ महानगर पालिकेचे कारभारी लवकरच बदलन्याच्या हलचाई सुरु – ऑनलाईन सभेद्वारे होणार निवडणुका

नांदेड़ महानगर पालिकेचे कारभारी लवकरच बदलन्याच्या हलचाई सुरु – ऑनलाईन सभेद्वारे होणार निवडणुका

नांदेड, दि.१२ ; राजेश एन भांगे

कोरोना संकटात कार्यकाळ लांबलेल्या महापौर आणि महिला व बालकल्याण समिती सभापतींची निवड प्रक्रिया आॅनलाईन करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. हे निर्देश मिळताच महापालिका नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांकडे रिक्त पदांबाबत माहिती सादर केली असून निवडणूक कार्यक्रमा बाबत मार्गदर्शन मागितले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या कार्यक्रमानंतर महापौर आणि महिला बालकल्याण समिती सभापतींच्या निवड प्रक्रियेला वेग येणार आहे.

नांदेडच्या महापौर दीक्षा कपिल धबाले यांची मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपली होती. मात्र कोरोनाचे संकट पाहता राज्य शासनाने महापौर निवडीला स्थगिती देत त्यांचा कार्यकाल वाढवला होता. विद्यमान महापौर आणि उपमहापौरांना दैनंदिन कामकाज पाहता येईल, असेही स्पष्ट केले होते. त्यानंतर राज्य उपसचिवांनी ९ आॅक्टोबर २०२० रोजी स्थानिक स्वराज्य संस्थातील रिक्त पदे विहित पद्धतीने भरण्याबाबत सूचित केले होते.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, महापौर, सभापती ही पदे ३ जुलै २०२० पत्रान्वये भरणे आवश्यक असल्याबाबत कळवले होते. त्यात ९ सप्टेंबर रोजी राज्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी निर्देश देत ३ जुलै २०२० च्या पत्रान्वये रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना कळवले आहे.

हे पत्र प्राप्त होताच नगरसचिव विभागाने औरंगाबाद विभागीय आयुक्ताकडे नांदेडच्या रिक्त असलेल्या महापौर पदाबाबत आणि महिला, शिक्षण व बालकल्याण समितीच्या सभापती पदासंदर्भात माहिती दिली. ही पदे रिक्त असून या पदाच्या निवडणुकीबाबत कार्यक्रम द्यावा, असेही कळवले आहे. त्यामुळे आता विभागीय आयुक्तांकडून महापौर आणि शिक्षण महिला व बालकल्याण सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम कधी येईल, याकडे लक्ष लागले आहे. महापौरांसह उपमहापौर पदासाठीही निवडणूक घेतली जाणार आहे. मागच्या कालावधीत काँग्रेसने उपमहापौर म्हणून विनय गिरडे पाटील आणि सतीश देशमुख तरोडेकर यांना संधी दिली होती. उपमहापौर पदासाठीही आता नवे दावेदार पुढे येत आहेत. सध्या कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या संकटाच्या काळात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. सध्याच्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी महापालिकेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पण त्याचवेळी आगामी काळातील महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाही या नव्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर होतील. त्यामुळे महापौर, उपमहापौर पदाची निवड ही वेगवेगळ्या निकषावर केली जाईल, हे मात्र निश्चित आहे.

महापौर पद इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलेसाठी राखीव
अवर सचिवांचे हे पत्र प्राप्त झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींनाही वेग येणार आहे. महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असून महापौर पद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. महापौर पदाच्या निवडीची परंपरा पाहता काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे ज्या उमेदवाराचे नाव देतील तोच उमेदवार अर्ज दाखल करतो. काँग्रेसच्या मोहिनी येवनकर या स्थायी समितीवर संधी देण्यात आली आहे. मात्र आगामी महापौर पद लक्षात घेता त्यांनी सभापतीपदासाठी आग्रह धरला नव्हता. त्यामुळे महापौर पदासाठी आता त्या प्रबळ दावा करु शकतात. पण त्याचवेळी महापालिका, जिल्हा परिषद आणि पुन्हा महापालिका असा राजकीय प्रवास करणाऱ्या जयश्री पावडे यांचा महापौर पदावरील दावाही तगडा मानला जात आहे. मनपाच्या महिला बालकल्याण सभापती असताना त्यांनी दाखविली कामाची चुणूक सभागृहात प्रश्न मांडताना अभ्यासू आणि आक्रमक भूमिकाही लक्षवेधी आहे. जिल्हा परिषदेतही त्यांनी चांगली कामगिरी केली होती. तरोडा प्रभागातील सुनंदा सुभाष पाटील याही काँग्रेसकडून दावेदार आहेत. त्याचवेळी महापौर म्हणून संधी मिळालेल्या शैलजा किशोर स्वामी याही महापौर पदासाठी इच्छुक आहेत. त्यांचा महापौर कार्यकाळही लक्षणीय होता.

महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीची मुदत १४ फेब्रुवारी २०२० रोजी संपली होती. त्यानंतर नवीन ११ सदस्यांची निवड महापालिकेच्या १९ मार्च २०२० रोजी झालेल्या सभेत करण्यात आली होती. समिती सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीला २७ मार्चच्या आदेशामुळे स्थगिती मिळाली होती. या समिती सभापती व उपसभापतीचीही निवड प्रक्रिया विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर होणार आहे. शिक्षण महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांमध्ये काँग्रेसच्या कविता मुळे, सरिता बिरकले, अपर्णा नेरलकर, संगीता पाटील, गीतांजली कापुरे, आयेशा बेगम, प्रभा यादव, ज्योत्स्ना गोडबोले, आर्सिया कौसर, प्रकाशकौर खालसा आणि बेबीताई गुपिले यांची निवड करण्यात आली आहे. सभापती पदासाठी आता अपर्णा नेरलकर, गीतांजली कापुरे, ज्योत्सना गोडबोले यापैकी कोणाला तरी संधी मिळण्याची शक्यता आहे.

anews Banner

Leave A Comment