आशाताई बच्छाव
महात्मा बसवेश्वर चौकाच्या सौदर्यीकरणासाठी विरशैव लिंगायत समाजबांधव आक्रमक
अतिक्रमण हटविण्यासाठी महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ- नगर परिषदेच्या दस्ताऐवजामध्ये नामकरण झालेल्या स्थानिक हिंगोली नाका येथील महात्मा बसवेश्वर चौकाला वाढत्या अतिक्रमणामुळे अवकळा आली आहे. याठिकाणी समाजबांधवांनी लावलेला महात्मा बसवेश्वर चौकाचा फलकही अतिक्रमणामुळे झाकोळला आहे. त्यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या जात असून याठिकाणचे अतिक्रमण हटवून चौकाचे सौदर्यीकरण करण्याच्या मागणीसाठी महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीच्या पुढाकारातुन मंगळवार, २९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी व न.प. मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, हिंगोली नाका चौकाचे नामकरण महात्मा बसवेश्वर चौक असे करण्याबाबतचा ठराव नगर परिषदेमध्ये भुतपुर्व नगराध्यक्षांच्या कार्यकाळात करण्यात आलेला आहे. या चौकामध्ये समाजबांधवांच्या वतीने महात्मा बसवेश्वर चौक असे नामकरण करुन फलक लावण्यात आलेला होता. मात्र काही दिवसानंतर हा फलक तेथून नाहीसा झाला होता. सद्यस्थितीत या फलकाच्या चारही बाजुला अतिक्रमणाने वेढले आहे. महान थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांनी १२०० वर्षापुर्वी समता, समानतेचा संदेश देवून समाजात मोठी जनजागृती केली आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याची दखल घेवून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लंडन येथे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. अशा या जगप्रसिध्द महात्म्याच्या नावाने शहरातील हिंगोली नाका चौकाचे नामकरण महात्मा बसवेश्वर चौक असे करण्यात आले आहे. मात्र सद्यस्थितीत या चौकाची दुरावस्था झाली आहे. या चौकातील अतिक्रमण हटवून चौकातील सौदर्यीकरण करणे गरजेचे आहे. तरी नगर परिषदेने याकडे तातडीने लक्ष देवून महात्मा बसवेश्वर चौकातील अतिक्रमण तातडीने काढून सौदर्यीकरण करुन लिंगायत विरशैव समाज बांधवांच्या भावनांचा सन्मान करावा. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदन देतांना उत्सव समितीच्या अध्यक्षा डॉ.सौ. अर्चना मेहकरकर, कार्यकारी अध्यक्ष पवन इसापुरे, उपाध्यक्ष सचिन फुटाणे, सचिव स्वप्नील जिरवणकर, गोपाल जिरवणकर, बाळासाहेब मेहकरकर, चंद्रकांत खेलुरकर, नंदकिशोर देशमुख, सुरेश घळे, किशोर पेंढारकर, दत्ता चवरे, संजय काष्टे, विजय महाजन, अशोक वणगे, सागर रावले, सौ. रेखा रावले आदींची उपस्थिती होती.