Home सामाजिक स्त्रियांचे अस्तित्व

स्त्रियांचे अस्तित्व

113
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_070049.jpg

स्त्रियांचे अस्तित्व

स्त्री कोण आहे?स्त्री म्हणजे फक्त कोणी हाडामासाची व्यक्ती नव्हे.तर स्त्री म्हणजे अशी व्यक्ती जी आयुष्यभर कर्तव्याच्या दोरीने बांधलेली असते.किती विवंचना सहन करते ती आयुष्यभर! विवंचना सहन करता करताच लहानाची मोठी होते.कित्येक मुलींना तर आईच्या गर्भातच मारून टाकल्या जाते.हे जग पाहण्याचा अधिकारही त्यांना मिळत नाही. कित्येकदा स्त्री कर्तव्याच्या ओझ्याखाली इतकी दबून जाते की तिला स्वतः च्या अस्तित्वाचा विसर पडतो.स्वत: साठी जगायला तिला वेळच मिळत नाही.स्त्री कमावती असो किंवा गृहिणी, घरच्यांसाठी ती जगत असते.काळ कितीही बदलला असला तरी स्त्रियांची होणारी कुचंबणा थांबली का? नक्कीच नाही.स्त्री एखाद्या यंत्रागत घरातील लोकांसाठी वावरत असते.एवढे करूनही तिच्या वाट्याला जेव्हा प्रेमाचे दोन शब्दही येत नाहीत त्यावेळी ती मनाने खचते.घरातील पुरूष मंडळी पैसा कमवून आणतात ज्याचा त्यांना अभिमान असतो.फक्त स्त्रीला पोसणं म्हणजे पुरूषार्थ नव्हे.त्यासोबतच तिला घरातल्यांनी मानसन्मान देणं, तिच्या मनाचा विचार करणं, तिला समजून घेणं महत्त्वाचं आहे.तिच्या भावनांचाही विचार व्हायला हवा.
अनेकदा शब्दांच्या तीक्ष्ण बाणाने स्त्रियांच्या कोमल हृदयाला घायाळ केले जाते.कित्येक स्त्रीया नव-याचा, सासरच्या मंडळींचा जाच सहन करत आपले आयुष्य घालवतात.त्याबद्दल एक शब्दही काढत नाहीत.स्त्रियांमध्ये अफाट सहनशक्ती असते.ज्यादिवशी स्त्री अन्यायाविरुद्ध आवाज उठविते, त्यादिवशी ती सर्व हादरवून सोडते.समाजातील पुरूष मन जोपर्यंत स्त्रीला यंत्र न समजता एक व्यक्ती म्हणून स्विकारत नाही, तोपर्यंत स्त्रियांच्या जीवनात बदल घडू शकत नाही.स्त्री अर्भकाला रस्त्यावर,कच-यात फेकून दिल्याच्या कित्येक घटना आपण वर्तमानपत्रात वाचत असतो.आजची स्त्री नोकरी करणारी असली तरी रात्री घरी एकटी परतताना तिच्या मनात कुठेतरी एक भीती असते.कारण समाजात वावरणारे पुरुष लांडगे अनेकदा एकट्या स्त्रीला पाहून तिच्यावर अत्याचार करतात.याचा अर्थ कितीही वर्षे उलटून गेली असली तरी पुरूषांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन आजही बदललेला नाही.सर्वच पुरूष सारखे असतात असे मी म्हणत नाही.पण समाजात आज स्त्रियांविषयी पूर्वीपेक्षाही भयाण परिस्थिती दिसते आहे.बलात्कारासारख्या घटनेत कित्येकदा स्त्रीचा दोष नसतानाही तिलाच दोषी ठरवले जाते.जणूकाही हे सर्व तिच्यामुळेच घडले अशी समाजाची मानसिकता असते.तिला तिच्या हक्कांची जाणीव जरी झाली असली तरी तिची कुचंबणा मात्र अद्यापही थांबलेली नाही.कित्येक गरीब आईवडील आपल्या पोटच्या पोरीला धनाढ्य माणसाला विकून त्याच्याकडून मोठी रक्कम वसूल करतात.असे करताना आईवडिलांना काहीच कसे वाटत नाही? म्हणजे स्त्री वयाने लहान असो वा मोठी, तिला कुठल्य ना कुठल्या मार्गाने कुचंबणा सहन करावी लागते.मुलगी जन्माला आली की नाक मुरडले जाते.पण खरेतर स्त्री शिवाय पुरूषी अस्तित्व नाही.स्त्रियांना कित्येक घरांमध्ये दुय्यम वागणूक दिली जाते. आज चूल आणि मूल याच्या पलीकडे जरी स्त्री गेली असली तरी घरातील प्रत्येक निर्णयात तिला सहभागी करून घेतले जात नाही.संविधानात त्यांना मिळालेले ३३टक्के आरक्षण सहज मिळाले नाही.त्यासाठी कित्येक वर्षे त्यांना लढा द्यावा लागला.स्त्री म्हणजे पुरुषाच्या करमणुकीचे साधन आहे अशी मानसिकता आजही समाजात आहे.नव-याची वासनापूर्ती करून कुढत आयुष्य जगणारी स्त्री आजही समाजात आहे.स्त्री फक्त बाहेरच असुरक्षित आहे असे नव्हे तर घरातही तिची हीच अवस्था आहे.कित्येकदा घरातीलच काही नराधमांकडून तिच्यावर पाशवी बलात्कार केला जातो.अशावेळी ती भितीपोटी किंवा बदनामी होईल या कारणाने कुणाला काहीच सांगत नाही.कारण तिला माहित असतं की जर तिने तोंड उघडलं तर घरातील लोकच तिला गप्प राहण्यास सांगतील.सीता असो वा द्रौपदी,त्याही त्या काळात सुरक्षित नव्हत्या आणि तीच परिस्थिती आजही आहे.किंबहुना जास्तच बिकट झाली आहे.जनावर होऊन स्त्रिची अब्रू लुटणं सोपं आहे.पण माणूस म्हणून तिला समजून घेणे कठीण आहे.काही घरांमध्ये स्वतःच्या मुलीला स्वातंत्र्य दिलं जातं,पण दुस-या घरून आलेल्या स्त्रीला (सून) स्वातंत्र्य दिलं जात नाही जे अगदी चुकीचे आहे.
स्त्रियांचेही अस्तित्व आहे
फक्त याची जाणीव त्यांना व्हायला हवी.आपल्याकडे लहानपणापासूनच मुलगा आणि मुलीवर वेगवेगळे संस्कार केले जातात.मुलींना वारंवार आठवण करून दिली जाते की तू एक स्त्री आहेस.तुला दुसऱ्या घरी जायचं आहे.तू असंच वागलं पाहिजे.हे शिक ते शिक.मुलांना मात्र कामाची कुठलीही जबाबदारी दिली जात नाही जे चुकीचं आहे.लाज आणि कर्तव्य या दोन गोष्टींच्या भोवतीच ती आजही फिरते आहे.अनेक प्रकारची भिती तिची वाच्या गोठवून टाकते.त्यामुळे ब-याचदा स्त्री आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत नाही.लग्नानंतर मुलीने सासरच्यांच्या मर्जीप्रमाणे वागावे असे सर्वांना वाटते.नातेसंबंधात अनेकदा ताण निर्माण होतो तो याचमुळे.नवरा बायकोकडून सगळ्या बाबतीत परफेक्ट असावं अशी अवास्तव अपेक्षा करीत असतो.मग त्यानेही बायकोच्या अपेक्षा पूर्ण करणे आवश्यक नाही का? कुणीही जगात परफेक्ट नाही.मग सासरच्या मंडळींनी अवाजवी अपेक्षा का करावी? राष्ट्राच्या विकासात महिलांचे महत्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन, मातृदिन यांसारखे कार्यक्रम राबविण्यात येतात.महिलांचे सक्षमीकरण तेव्हाच होईल जेव्हा त्यांचे हक्क आणि मूल्ये मारणा-या विचारांना तिलांजली दिली जाईल.स्त्रियांचे सक्षमीकरण करणे म्हणजे त्यांना आर्थिक, सामाजिक, विचार स्वातंत्र्य या संधीची समानता प्राप्त करून देणे होय.हाच मार्ग आहे ज्याद्वारे स्त्रिया आपल्या आकांक्षा पूर्ण करू शकतात.ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन कुटुंब, समाजात आपले खरे अधिकार मिळवू शकते.
कित्येक घरांमध्ये स्त्रियांना नोकरीसाठी बाहेर जाण्याची परवानगी दिली जात नाही.एवढेच काय, कुटुंबातील महत्वाचे निर्णय घेण्याची तिला स्वातंत्र्य नसते.प्रत्येकच कामात तिला पुरूषांपेक्षा कमी समजले जाते.स्त्री घरच्यांच्या प्रेमापोटी आपले अस्तित्व त्यागू शकते. तशीच ती आपल्या अस्तित्वासाठी दुर्गाही होऊ शकते.स्त्रिचा आदर करणे प्रत्येक पुरूषाचे कर्तव्य आहे.स्त्री ही जीवनात लढा देत कसे जगावे याचे शिक्षण देणारी दिनदर्शिका आहे.आपण एक स्त्री असल्याचा सार्थ अभिमान प्रत्येक स्त्रीने बाळगलाच पाहिजे.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleपरळी तालुक्यातील शेतकऱ्यांना २२ लाखाचा गंडा
Next articleबीडमध्ये खळबळजनक घटना अल्पवयीन मुलीची हत्या; मुख्य आरोपीने विषारी द्रव प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here