Home नाशिक पिक नुकसानीचे खोटे पंचनामे करणाऱ्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल…

पिक नुकसानीचे खोटे पंचनामे करणाऱ्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल…

132
0

आशाताई बच्छाव

IMG-20230529-WA0081.jpg

पिक नुकसानीचे खोटे पंचनामे करणाऱ्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल…

कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद करत शेतकऱ्यांची केली बोळवन..

कंपनी विरोधात आणि कृषी विभागातील जबाबदार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात यावा–शेतक-यांची मागणी–

दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे

पुर परिस्थीती, अतिवृष्टी, रोग आणि किडीचा प्रादुर्भाव यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसानीपासुन बचाव होण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक योजने अंतर्गत पिकांचे पिकविमा काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना आवाहन केलेले होते. त्याप्रमाणे शासनाने नेमुन दिलेल्या एचडीएफसी अग्रो या कंपनीकडुन निफाड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढले होते. ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले होते. त्याबाबत शेतकऱ्यांनी कंपनीने दिलेल्या टोल फ्री नंबरवर आणि कंपनीच्या अँपवरुन तर काहींनी कॉम्पुटर लिंक वरून नुकसानीचे फोटोसह तक्रार नोंदविलेल्या होत्या. कंपनीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीतील अनेक शेतकऱ्यांनी विमा रकमेसाठी भरलेली रक्कम अदा करण्यात आली तर काही शेतकऱ्यांना विमा रकमेच्या अर्धी रक्कम तर काहींना हजार दोन हजार रुपये अदा केली. तर काही शेतकरी अजुनही वंचित आहेत. कंपनीकडुन शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तक्रारींची योग्य वेळेत दखल घेतली गेली नाही. या विरोधात निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील रामेश्वर शांताराम शिंदे व इतर ३ शेतकरी यांनी आवाज उठविला आहे. संबंधित शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे १०० टक्के नुकसान झालेले होते. त्यामुळे ते १०० टक्के नुकसान भरपाईसाठी पात्र ठरत होते. मात्र विमा कंपनीने नेमलेल्या ग्लोबल अर्क या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर न जाता परस्पर नुकसान झालेल्या पिकाची पहाणी अहवाल तयार करून कमी नुकसान दाखविल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. याबाबत मागील ३-४ महिन्यांपासुन रामेश्वर शिंदे यांनी पाठपुरावा सुरु ठेवला आहे. योग्य न्याय मिळत नसल्याने रामेश्वर शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, मुंबई, ग्रामीण पोलीस अधीक्षक, नाशिक, विभागीय पोलीस अधीक्षक निफाड, जिल्हा कृषी अधीक्षक, विभागीय सहसंचालक, नाशिक विभाग, तालुका कृषी विभाग यांचेशी पत्रव्यवहार केलेला आहे.

विमा कंपनीने नेमलेल्या ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर कार्यालयात बसुन पिक नुकसानीचे अहवाल तयार करत कमी नुकसान दाखविले. त्यामुळे १०० टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले असल्याने संबंधित कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दिपक नानासाहेब सोमवंशी तालुका कृषी अधिकारी निफाड यांनी दाखल कला आहे. अनेक दिवसांपासुन गुन्हा नोंदविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांनी गुन्ह्याची नोंद झाल्याने आनंद व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खेडलेझुंगे येथील शेतकरी रामेश्वर शांताराम शिंदे व इतर ३ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे माहे ऑगस्ट २०२२ रोजी नुकसान झाले होते. त्यांनी सदर कंपनीचा पीकविमा काढलेला असल्याने त्यांनी संबंधित कंपनीस नुकसानी बाबत कळवले होते. भारत सरकारद्वारे प्रधानमंत्री पीक योजना ही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पिकविलेल्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावे म्हणून राबविली जाते. त्यासाठी एच.डी.एफ.सी. ऍग्रो या कंपनीने ग्लोबल या कंपनीला नाशिक जिल्ह्याचे सर्व्हे करण्याचे काम दिले होते. मात्र कंपनीचे संदीप प्रभाकर पावडे, क्षेत्रीय कर्मचारी सर्व्हेक्षण अर्क कंपनी, पिंप्री महिपाल, नांदेड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता परस्पर विहित नमुन्यातील फॉर्म भरला. त्यात शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षात झालेल्या नुकसानी पेक्षा कमी नुकसान दाखवले. त्यावर शेतकऱ्यांच्या सह्या न घेता खोट्या सह्या करून शेतकरी व कृषी सहाय्यकाची दिशाभूल करून त्यावर कृषी सहाय्यक यांची सही घेऊन संबधित शेतकरी व कृषी विभागाची फसवणूक केली म्हणून फिर्यादी दीपक नानासाहेब सोमवंशी, तालुका कृषी अधिकारी, निफाड यांचे फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप शिंदे पुढील तपास करीत आहेत.

शेतकऱ्यांची मागणी—
शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता परस्पर कार्यालयात बसुन विमा कंपनीने खोटे पंचनामे तयार करुन शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करुन कृषी विभागाकडे सादर केले. कृषी विभागाने सादर केलेले पंचनाम्यांची खातरजमा न करता आणि सत्यता न पडताळता कृषी सहाय्यक यांनी देखील परस्पर कार्यालयात बसुनच सह्या करुन पंचनामे कंपनीकडे जमा करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या विरोधात आम्ही लासलगांव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यासाठी गेलो असता त्यांनी गुन्हा नोंदवुन घेतला नाही.कंपनीने नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याने तयार केलेल्या खोट्या अहवालावर सह्या करणारे प्रशासकीय जबाबदार अधिकारी कृषी सहाय्यक व संबंधित विमा कंपनीवर गुन्हा ज्यांची फसवणुक झाली त्यांच्याकडुनच नोंदविणे आवश्यक होते. परंतु कृषी विभागाने अधिकारी कर्मचारी यांना पाठीशी घालत कंपनीच्या कंत्राटी व रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवुन बोळवण केली आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवुन त्यांनी आमची फसवणुक केली आहे. त्यामुळे सदरचा गुन्हा फसवणुक झालेल्या शेतकऱ्यांकडुन कृषी विभागातील जबाबादर कर्मचारी व विमा कंपनीवर नोंदविण्यात यावा .
रामेश्वर शिंदे शेतकरी (खेडलेझुंगे)

कृषी सहाय्यक यांचे जबाब
@ माझी मुळ सजा नांदुरमध्यमेश्वर असुन खेडलेझुंगे अतिरिक्त पदभार आहे. माझ्याकडे सोपविण्यात आलेल्या एकुन ६ गावातील २०६४ शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी व सततच्या पावसाचे पंचनामे मी प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर जावुन केले आहे. सन २०२२ मध्ये खेडलेझुंगे, कोळगांव, सारोळेथडी येथील १८८ शेतकऱ्यांनी पिकविमा काढलेला आहे. या कालावधीत शासानाच्या इतर योजनांचेही कामकाज करत असतांना पिकविमा कंपनीच्या प्रतिनीधींनी केलेल्या पंचनाम्यांपैकी ४-५ शेतकऱ्यांचे प्रातिनिधीक स्वरुपात तपासणी केली असता ती बरोबर आढळुन आल्यामुळे त्या आधारावर बाकी शेतकऱ्यांचे पंचनाम्यावर सह्या केल्या. परंतु शेतकऱ्यांच्या पिकविमा पंचनाम्यावरच्या स्वाक्षरी माझ्या समोर घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्या खऱ्या आहे कि खोट्या याबाबत मला काहीही माहीती नाही. कारण माझ्याकडील सहा गावांमध्ये नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे चालू होते.
वंदना आघाव, कृषी सहाय्यक, नांदुरमध्यमेश्वर, खेडलेझुंगे ता.निफाड

@ एचडीएफसी अग्रो कंपनीच्या प्रतिनिधीने श्री.शांताराम किसन शिंदे, रा.खेडलेझुंगे यांच्या सायाळे ता.सिन्नर येथील गट नं. १७१ मधील सोयाबिन पिकाचे नुकसान झाल्याचा पंचनामा केल्याचे दि.१५/०८/२०२२ रोजी सादर केलेल्या पंचनामा फॉर्मद्वारे कळते. त्या पिक पंचनामा फॉर्मवर त्याने माझे खोटे नांव व खोटी सही केलेली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी संबंधित कंपनीने किंवा कंपनीच्या प्रतिनिधीने मला कळविले नाही. उलट संबंधित प्रतिनिधीने माझी खोटी सही करत खोटा अहवाल सादर केला आहे. –
संगिता शिवाजी दवंगे, कृषी सहाय्यक, पाथरे बु. ता.सिन्नर

धक्कादायक बाब
शेतकऱ्यांनी पीक विमा काढला एचडीएफसी ऍग्रो कंपनीकडे त्यामुळे नियमानुसार नुकसानीचे पंचनामे करण्याची जबाबदारी याच कंपनीकडे होती. परंतु असे न होता नुकसानीचे पंचनामा करण्यासाठी विमा कंपनीने ग्लोबल अर्क या कंपनीला सर्वेक्षणासाठीचे कंत्राट दिले.
ग्लोबल अर्क कंपनीने हे काम स्वतः न करता प्रतीक जाधव नामक इसमास कंत्राट दिले. प्रतीक जाधव याने रोजंदारीवर कर्मचारी नियुक्त करत सदरच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे प्रत्यक्ष शेतावर न जाता एकाच ठिकाणी बसून जमेल तसे पंचनामे केले.
जबाबदार कंपनीला दिलेले काम कंपनीने न करता ते कंत्राट परस्पर इतरांना दिल्याने शेतकऱ्याने मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्याने केलेले पंचनामे कृषी विभागातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांनी पडताळणी न करता त्यावर सह्या करून दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे एचडीएफसी आणि कृषी विभागातील कर्मचाऱ्यांवर देखील गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Previous articleअपघात संदर्भातील एमएलसी आता जवळच्या कोणत्याही पोलीस स्टेशनला
Next article▪️ नाशिक मुक्त विद्यापीठ पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क घेवून लोहा येथील केंद्र संयोजक झाले भुर्र..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here