Home कृषिसंपदा नैसर्गिक शेती आणि वास्तव जाणून घेऊ या लेखातुन

नैसर्गिक शेती आणि वास्तव जाणून घेऊ या लेखातुन

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20220927-WA0020.jpg

नैसर्गिक शेती आणि वास्तव जाणून घेऊ या लेखातुन

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

लेखक:-अमोल थिटे वरूड(९६०४१०२९४५) शेतकरी

खरच शुन्य खर्चात शेती होऊ शकते का?तर याच उत्तर माझ्या मते नाही असं आहे.खर्च कमी होऊ शकतो पण त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो.इथून पुढच्या काळात रासायनिक खत औषधी आणि सेंद्रिय व जैविक यांचा मेळ घालून शेती करावी लागेल.एकदम रासायनिक सोडून चालणार नाही.नैसर्गिक शेती हा बहुतेक ठिकाणी फसलेला प्रयोग आहे.कारण एकदम शेतीची पद्धत बदलल्यामुळे उत्पादनात प्रचंड घट होते.ती सर्वसामान्य शेतकरी सहन करू शकत नाही.तसेच या शेतीत तण शेतात तसच ठेवायचं,नांगरणी करायची नाही,तणनाशकांचा वापर करायचा नाही,फक्त शेण व गोमूत्रावर शेती करायची हे मनाला न पटणार आहे.आज कुठल्याही पिकात नवनवे आणि जास्तीच उत्पादन देणारे वाण आले आहेत.एका ठराविक काळानंतर पिकांवरील रोग,बुरशीजन्य रोग येत असतात तसेच जमिनीची अन्नद्रव्ये यांची गरज पिकांनुसार बदलत राहते.निसर्गात वेळोवेळी घडणारे बदल गारपीट, अतिवृष्टी,धुके,पावसाचे खंड,सततचा पाऊस, तापमानवाढ,अतिथंडी अशी वेगवेगळी परिस्थिती बदलत राहते.अशावेळी अशा एखाद्या नैसर्गिक पद्धतीनेच शेती करावी,एका चौकटीत राहून करावी हे म्हणणे न पटणारे आहे.सर्वच रसायने वाईट असतात हे चुकीचे आहे उदाहरण जर माणसाचे दिले तर, पूर्वी एखादा व्यक्ती आजारी पडला तर घरगुती इलाज करायचे त्यासाठी परंपरागत ज्ञान आणि ते काम करणारे वैद्य असायचे.काहींवर यशस्वी इलाज व्हायचे काही लोकांवर व्हायचे नाही.तसेच प्लेग सारखे अनेक साथीचे रोग यायचे.अशा रोगांपासून मुक्तता मिळवायची असेल तर त्यावर प्रतिबंधात्मक लसीकरण करून त्यापासुन मुक्ती मिळवली आहे.कोरोना रोगाचं उदाहरण आपल्यासमोर आहे.या लसीमध्ये,औषधामध्ये रसायने आहेत म्हणजे शरीरात रसायने गेले त्याने आजार बरे होतात,प्रतिकारशक्ती वाढते,शरीरात शक्ती निर्माण होते.फक्त शेती असो का माणूस यांनी त्या रसायनांचा किती वापर करायचा यावर चर्चा होऊ शकते.तसेच त्याचा वापर करण्याची पद्धत, दर्जा,कालावधी,पिकाची स्थिती,पिकाची जात,जमीन यावर त्याची परिणामकारकता फायदा तोटा यावर गाणित ठरू शकते.यापलीकडे जाऊन शेतीच्या समृद्धतेसाठी शासन स्थरावरून मालाचे वाढत्या खर्चानुसार योग्य भाव देणे, शेतीला जिथं शाश्वत पाणी नाही अशा ठिकाणी ती व्यवस्था करणे यासाठी तेलंगणा सरकारच्या ‘कालेश्वराम’ प्रकल्पसारखा जो आशिया खंडातील सर्वात मोठा असणारा उपसा सिंचन प्रकल्प आहे तसा पाण्यासाठी एखादा प्रकल्प राबवणे,शेतीसाठी रस्त्यांची कामे सक्तीने आणि सर्व यंत्रणा लावून कामे करून देणे आजच्या रोजगार हमी सारख्या योजनेत अनेक समस्या आणि ही योजना सदोष आहे.सोयाबीन,कापूस,तूर,भात आणि जे काही पीक आहेत त्यात नवनवीन संशोधित कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या कीड,मर रोग प्रतिकारक जाती शोधणे गरजेचे आहे.याबरोबर शासनाकडून योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचत नाहीत आज शेतीसाठी ठिबक अतिशय महत्वाचा घटक आहे याविषयी म्हणावी तेवढी जागरूकता शेतकऱ्यांमध्ये नाही.अशा अनेक योजनांविषयी शेतकऱ्यांमध्ये अनास्था,नाराजी आहे.याचे कारण भांडवल नसणे,अनुदानावर मिळणाऱ्या बाबींचे सहा सहा महिने अनुदान न मिळणे,तेवढा वेळ गुंतवणूक करण्यासाठी पैसे नसणे ही मुख्य अडचण आहे त्यामळे योजना कागदावरच राहतात.खत,तणनाशक,टॉनिक,औषधी,बियाणे यांची गुणवत्ता हा घटक तेवढाच महत्त्वाचा आहे.आज मार्केटमध्ये शेतकऱ्यांना फसवणुक करणाऱ्या अनेक गुणवत्ता व दर्जा नसलेल्या कंपन्या आहेत.त्यांची औषधी ,खत यांची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा योग्य,पुरेशी आणि पारदर्शी नाही. वाढलेली मजुरी आणि ती वाढत्या महागाईच्या तुलनेत वाढणार कारण शहरी भागातील किंवा व्यवसाय,उद्योगातील लोक त्यांना त्यांचा नफा चांगला असल्यामुळे मजुरांना पैसे देतात.शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांना या लोकांच्या तुलनेत मजुरी द्यायला जड जाते पण ती द्यावी लागत आहे.वाढता मशागत खर्च,वाढते डिझेल-पेट्रोलचे दर, खत औषधी रासायनिक वापरा किंवा जैविक त्याला लागणारा खर्च,बनवण्याची मेहनत,सिंचनासाठी लागणार साहित्य ठिबक,स्प्रिंगलर,पाईप,मोटार,स्टार्टर,बैलजोडी,मशागतीची अन्य साहित्य त्यास लागणारे भांडवल, वाहतूक खर्च,मालासाठी पोते, थैल्या ,कापड असे वेगवेगळे खर्च शेतीत होत असतात.हा खर्च सुद्धा उत्पादन खर्चात येतो.वरील खर्च पकडून शेतमालाला भाव मिळणे हा सर्वात महत्वाचा विषय आहे .उदाहरण द्यायचे झाले समजा, एखाद्या शेतकऱ्याला एक एकरमध्ये रब्बी व खरीप मिळून जर 12 ते 15 कुंटल माल होत असेल आणि त्याला 5 हजार सरासरी भाव मिळत असेल आणि तोच माल शेतकऱ्याने विकल्यावर दोन तीन महिन्यांनी जर 6 हजार विकत असेल तर त्या शेतकऱ्याचा एकरी 15 हजार जो खरा नफा आहे तोच त्याला मिळणार नाही.माल साठवून फक्त 10 टक्के भांडवलदार किंवा अन्य जोडव्यवसाय असणारे,नौकरी असणारे शेतकरी ठेऊ शकतात.बाकी शेतकरी पीक आले की लगेच विकतात.यात आयात-निर्यात हे धोरण शेतकरी हिताचं असावं,दुर्दैवाने ते नाही आणि कुठल्याच सरकारच राहिलेलं नाही.शेतकऱ्यांचा माल आला की भाव पडतात हे नेहमी आपण बघतो. यात आता ऊस,हळद यासारखे पीक घेणं सुद्धा अवघड होतं आहे कारण पाच वर्षपूर्वीचे भाव आज या दोन्ही पिकांचे आहेत. शेवटी शेतकरी सुद्धा गटशेती, बदलून पीक घेणे, योजनांचा लाभ घेणे,नवेनवे संशोधित बियाणे लागवड करणे,बेड पद्धतीने व ठिबकचा वापर करून जवळपास सर्वच पीक टोकण पद्धतीने घेणे, शेतरस्ते,शेतमालाला योग्य भाव यासाठी सर्वांनी एकत्र येईन आग्रही मागणी धरणे अशा अनेक गोष्टी शासन व शेतकरी यांना कराव्या लागतील!फक्त रासायनिक किंवा नैसर्गिक हा विषय शेतीच्या बाबतीत सर्व काही फायदा -तोटा ठरवेल अस नाही यापलीकडे वरील मांडलेल जळजळीत वास्तव आहे ,दुर्दैव यावर कोणीही योग्य पद्धतीने मांडणी करायला ,त्यावर काम करायला तयार नाही.आपल्याकडे एक म्हण आहे’दुःख म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला’अशी इथली व्यवस्था आणि अवस्था आहे.नेमक्या समस्या,प्रश्न यावर काम होणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी शेतकरी,शेतीतज्ञ,सामाजिक कार्यकर्ते,प्रसारमाध्यमे आणि शेतकरी संघटना यांनी नेमका प्रश्न विचारला पाहिजे,प्रश्न सुटण्यासाठी पाठपुरावा, जागरूकता केली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here