• Home
  • 🛑 रत्नागिरी ,आंजर्ले गांवचा….! कड्यावरचा गणपती 🛑

🛑 रत्नागिरी ,आंजर्ले गांवचा….! कड्यावरचा गणपती 🛑

🛑 रत्नागिरी ,आंजर्ले गांवचा….! कड्यावरचा गणपती 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

रत्नागिरी/दापोली :⭕रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जोग नदीच्या मुखाशी इतिहासप्रसिद्ध सुवर्ण दुर्ग किल्ल्या जवळ आंजर्ले नावाचे बंदर आहे. दापोली पासून २० किलोमीटर अंतरावर असलेले हे निसर्गरम्य गावआहे . याच आंजर्ले गावात सुप्रसिद्ध ” कड्यावरचा गणपती” च स्थान आहे. कड्यावरचा गणपती हे आज कोकणातील एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.

दापोली आणि मुरुड हर्णे जवळ असलेल्या आंजर्ले या निसर्गरम्य गावात गणपतीचे प्राचिन मंदिर आहे. फ़ारपूर्वी आंजर्ल्याजवळ समुद्रात एका खडकावर “अजरालयेश्वर” आणि “श्री सिद्धिविनायक” मंदिर होते. सागळपातळीत वाढ झाल्यामुळे जुनी मंदिरे सागराच्या पाण्यात गडप झाली. त्यामुळे नविन मंदिर उंच जागी डोंगराच्या कड्यावर बांधण्यात आले. हा गणपती कड्यावरचा गणपती या नावाने प्रसिद्ध झाला. हा गणपती नवसाला पावतो अशी येथील स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. एके काळी पुलाअभावी द्राविडी प्राणायाम करावा लागणारा प्रवास आज नैसर्गिक विविधतेने नटलेल्या रस्त्याने सुखकारक झाला आहे.

मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या दगडी जिन्याने मंदिराच्या वरच्या भागात जाता येते. सर्वदूर पसरलेल्या हिरव्यागार टेकड्या, नारळी-पोफळीची झाडे, अथांग पसरलेला निळा समुद्र आणि चटकन नजरेत भरणारा कनकदुर्ग असे मनोहारी दृश्य येथून दिसते.

कड्यावरील गणपती मंदिराच्या उगम कथेबाबत अनेक वदंता असल्या तरी त्याचा निर्मिती काल खात्रीलायकरीत्या सांगणारी कागदपत्रे आज उपलब्द्ध नाहीत. अनेक आख्यायिकांची साक्ष खरी मानल्यास हे मंदिर १२ व्या शतकातील असून पूर्वी संपूर्ण बांधकाम लाकडी असण्याची शक्यता आहे. इ. स. १६३० पासून या देवस्थानाचे व्यवस्थापन “नित्सुरे” घराण्याकडे आले असावे.

सध्या बांधलेल्या मंदिराचा जिर्णोध्दार १७७० मधे करण्यात आलेला आहे. मंदिराचे सभामंडप, अंतराळ आणि गाभारा असे ३ भाग आहेत. सभामंडपात कारंजे आहे. गाभार्‍यातील गणेश मुर्ती उजव्या सोंडेची असून पावणे दोन मीटर उंचीची आहे. मंदिरा समोर दगडी बांधणीचे तळे आहे.

आंजर्ला हे एकेकाळी गणेशक्षेत्र म्हणूनच प्रसिद्ध होते. केळशी, आंजर्ला, वेळास, हर्णे, मुरूड ही गावे पेशवेकाळातील. पेशवाईच्या ऱ्हासानंतर येथील पेशवाईसंबंधित घराण्यांची राजसत्तेशी असणारी जवळीक संपुष्टात आली, तरीही त्यांचे देवाधर्माशी असलेले नाते कायम राहिले. आजही ते कायम आहे. मंदिरे ही समाजाच्या जीवनशैलीचे एक प्रतीक असते. त्या घराण्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोकांनीही खूप भक्तीभावाने या परिसरातील मंदिरे अधिकाधिक चांगली राहावीत, यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले, व चालू ठेवले.

आंजर्ला हे दापोलीपासून साधारण २० किलोमीटर अंतरावरील गाव. येथे असलेले कडय़ावरच्या गणपतीचे देऊळ आज मोठय़ा दिमाखाने व अधिकाधिक सोयीसुविधांनी युक्त असे आहे. पूर्वी आंजर्ला गाव तसे संपर्कासाठी खूप आडनिडे होते. गाडीनंतर होडीचा वापर करून खाडी ओलांडून गावात जावे लागे किंवा मंडणगडहून गाडीरस्तामार्गे जावे लागे. त्यावेळी एस.टी. बसची सेवाही तशी कमी होती. खाजगी मोटारीचे वापरण्याचे प्रमाणही कमी होते. आज तेथे पूल व रस्ता झाल्याने तेथे गाडीरस्तामार्गे जाण्यासाठी पूर्वीसारखा द्राविडी प्राणायाम करावा लागत नाही. दापोलीहून तडक गाडीरस्तामार्गे आंजर्ल्याला पोहोचता येते.

आंजर्ला गावाला लागून असलेल्या एका उंच डोंगरावर काळवत्री दगडात उभारलेले गणपतीचे हे देऊळ निसर्गरम्य असे स्थान आहे. देवदर्शन आणि पर्यटन अशा दोन्ही गोष्टी साध्य होतील असे हे ठिकाण आज खूप वर्दळीचे झाले आहे.

साधारण इ. स. ११५० मध्ये मूळ देऊळ बांधले गेले होते. मंदिर , आवाराची तटबंदी आणि समोरील सुदर्शन तलाव यांची रचना १२०० वर्षां पूर्वीची असावी असे अनुमान आहे. मात्र इ.स. ११०१ पासून मंदिराचे अस्तित्व सिद्ध करता येते. प्राचीन मंदिर लाकडी खांबावर गवती छपराचे असावे. इ.स. १६३० पासून नित्सुरे कुळाकडे देवस्थानाचे व्यवस्थापन आहे. प्राचीन काळात समुद्र किनारी अजरालयेश्वर म्हणजे शंकर व सिद्धीविनायकाचे मंदीर होते. अजरालय या मंदिरावरून या गावाला आंजर्ले हे नाव पडले. जसजशी समुद्राची पातळी वाढू लागली तसतसे हे मंदिर पाण्यात जाऊ लागले. आजही भाऊबिजेला ओहोटीच्या वेळी दूर समुद्रात जुन्या बुडालेल्या मंदिराचे अवशेष दिसतात. या बुडालेल्या मंदिराची स्थापना जवळच्याच उंच डोंगरावर करण्यात आली. इ.स. १७६८ ते इ.स. १७८० या १२ वर्षात, आज दिसणारे घुमटावर आधारीत २६ कळस असणारे जांभ्या दगडाने बांधलेले त्रिस्तरीय मंदिर निर्माण झाले. सुमारे २०० पायऱ्या चढून गेल्यावर माळासारखी जमीन सुरू होते. तेथे काही अंतरावर हे सुंदर देवालय आहे.

या देवळाच्या निर्मितीची पूर्वपीठिका अधिक सविस्तरपणे आज देवालयाच्या आवारात फलकावर लिहिण्यात आली आहे.

नित्सुरे कुटुंबाचे हे मंदिर असून त्यांच्या पूर्वजांना म्हणजे रामकृष्ण हरी नित्सुरे (हर भट ) यांना दृष्टांत झाला व त्यांनी याच गावातील वासुदेव रघुनाथ घाणेकर जे पेशव्यांच्या दरबारी असलेले अधिकारी होते, त्यांच्या कानावर ही माहिती घातली, त्यांच्या सहकार्याने १७६८ ते १७८० मध्ये हे मंदीर बांधले. आज काळ्या दगडावर जीर्णोद्धार करताना त्यावर गिलावा करून देऊळ संगमरवरासारखे शुभ्र केले गेले आहे. विस्तीर्ण आवारात मध्यभागी हे गणपतीचे त्याच्या बाजूला शंकराचे देऊळ आहे. गणपतीच्या मंदिरासमोर तलाव आहे, तुळशीवृंदावन, धर्मशाळा (आता सुखसोयींनी युक्त अशी बांधली आहे.), दीपमाळा, आवाराभोवती दगडी तटबंदी असे सुंदर स्वरूप आहे. आज २०० पायऱ्या चढून जाण्याची गरज नाही. थेट मोटारही मंदिरापर्यंत जाते. इ .स. १९८० मध्ये मंदिराचा द्विशताब्दी महोत्सव संपन्न झाला. तो पर्यंत जवळपास १० ते 1२ पिढ्या मंदिराचे व्यवस्थापन नित्सुरे घराण्याकडे होते. १९९० नंतर या मंदिराला आर्थिक सुबत्ता आली.

६२ फूट उंचीचे मंदिर असून, लांबी ५५ फूट,रुंदी ३९ फूट. मंदिराच्या बांधणीवर वेगवेगळ्या काळातील म्हणजे मोगल, रोमन, गोथीक शैलीचा अंमल दिसतो. मंदिरास ६ फूट उंचीचा एक दगडी तट आहे. सभामंडपावरील गोपुराची उंची ४० फूट व मुख्य मंदिरावरील गोपुराची उंची ६2 फूट असे देवालयाचे स्वरूप आहे. मंदिराची रचना त्रिस्थळी म्हणजे सभागृह, अंतराळ, गर्भगृह अशी आहे. सभागृहाला आणि गर्भगृहाच्या वर गोल घुमट आहे. गर्भगृहाच्या वर १६ उपकलश आणि अष्टविनायकाच्या रेखीव प्रतिमा आहेत. सर्व घुमटांच्या टोकाशी कमलपुष्प दिसते. मंदिराला एकूण २६ कळस आहेत. सभागृहाला ८ कमानी आणि सुंदर घुमटाकृती छत आहे. अंतराळ हे गर्भगृहाच्या पेक्षा लहान आहे. तेथे घंटा लावलेल्या आहेत. मंदिराच्या कळसावर जाण्यासाठी वाट असून तेथून उंचावरून आजूबाजूचा परिसर, हर्णेचा किल्ला, खाडी व सागराचे दर्शन अतिशय विलोभनीय आहे. मंदिराच्या चारही कोप-यावर पुरातन बकुळ वृक्ष असून वनस्पती शास्त्रांच्या म्हणण्यानुसार ते सहाशे वर्षांपूर्वीचे आहेत. येथे माघी उत्सव जोरात होतो.

गाभा-यातील गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. ती उजव्या सोंडेची असून ५ फूट सिंहासनाधिष्ठीत आहे. मूर्ती बेसॉल्ट रॉकपासून बनविलेली आहे. ही मूर्ती तैलरंगाने रंगविलेली आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धिसिद्धिच्या सुमारे एक फूट उंचीच्या मूर्ती आहेत. ही मूर्ती दाभोळच्या धोंडू पाथरवट यांनी घडवली आहे.

सुवर्ण दुर्गसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या किल्ल्यासमोरील हे गजाननाचे स्थान सूर्यास्ताच्या वेळी जीवानाचे सार प्रभावीपणे मांड्यात यशस्वी ठरते.

निसर्गरम्य समुद्रकिनारे, नारळी-पोफळी, काजू आणि आंब्याच्या बागा यांनी समृध्द असलेल्या या कोकणातील माणूसही अत्यंत अगत्यशील आहे. येथे येणारे पर्यटक येथील विविध वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ खाऊन तृप्त होतात. मांसाहारींसाठी समुद्रातील ताजी मासळी, खेकडे इत्यादींची मेजवानीच असते. धार्मिक प्रवृत्तीचा माणूसही या भूमीत सहज रमतो आणि मन:शांती प्राप्त करतो.

anews Banner

Leave A Comment