Home Breaking News जय श्रीराम! – अयोध्यानगरीत उद्या ऐतिहासिक सोहळा तर देशभरात सर्वत्र उत्साहाचे आणि...

जय श्रीराम! – अयोध्यानगरीत उद्या ऐतिहासिक सोहळा तर देशभरात सर्वत्र उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण –

150
0
 1. जय श्रीराम! – अयोध्यानगरीत उद्या ऐतिहासिक सोहळा तर देशभरात सर्वत्र उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण –

  विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

  कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराममंदिराचा भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. बुधवारी होणार्‍या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्यानगरी सजली असून, देशभरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रमुख संत-महंत आणि मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीत हा मंगलमय सोहळा होणार आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन भूमिपूजन कार्यक्रमावेळी कोविड-19 प्रोटोकॉलचे काटेकोर पालन केले जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

  संपूर्ण अयोध्यानगरी रंग-रंगोटी आणि रोषणाईने सजली आहे. शरयू नदीचा घाट दिव्यांनी उजळून निघाला आहे. सर्वत्र आनंदी आणि मंगलमय वातावरण असून, बुधवारी दिवाळीच साजरी होणार आहे. भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत ठिकठिकाणी एलईडी स्क्रिन लावण्यात आले आहेत. देशभर या सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमानंतर बुधवारी रात्री शरयू नदीच्या तीरावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  लालकृष्ण आडवाणी यांना निमंत्रण नाही

  रामजन्मभूमी आंदोलनातील अत्यंत महत्त्वाचे योगदान असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण दिलेले नाही. त्याचप्रमाणे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनाही निमंत्रण नाही. आडवाणींचे वय 90 वर्षांचे आहे. वयाचा विचार केला गेला आहे. त्याबद्दल फोन करून आडवाणी यांची माफी मागितली असे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी सांगितले. कल्याणसिंह यांच्याही वयाचा विचार केला आहे.

  इक्बाल अन्सारी म्हणाले, ही तर प्रभू श्रीरामाची इच्छा

  अयोध्या प्रकरणातील मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी यांना भूमिपूजन सोहळ्याची पहिली निमंत्रण पत्रिका देण्यात आली. ही तर प्रभु श्रीरामांची इच्छा असावी. मी भूमिपूजनाला उपस्थितीत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया इक्बाल अन्सारी यांनी दिली. आता कोणताही वाद राहिला नाही. अयोध्येत हिंदू-मुस्लिम सलोखा आहे. राममंदिर निर्माण होईल आणि अयोध्येचे भाग्यही बदलेल. अयोध्या अधिक सुंदर होईल. लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अयोध्या हे गंगा-यमुना परंपरेचे प्रतिक असेल, असे अन्सारी म्हणाले. दरम्यान, बेवारस मृतदेहांवर अनेक वर्षांपासून अंत्यसंस्कार करणारे पद्मश्री मोहम्मद युनुस यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

  175 जण सहभागी

  भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रमुख संत-महंत यांच्यासह 175 मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. हिंदुस्थानच्या प्रत्येक भागातील प्रतिनिधी या सोहळ्याला हजर असेल. प्रत्येक निमंत्रणपत्रिकेवर स्पेशल सिक्युरिटी कोड असणार आहे. हा कोड एकवेळेसच काम करेल. एकदा भूमिपूजन सोहळ्यासाठी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर जर कोणी बाहेर पडले तर हा कोड काम करणार नाही. निमंत्रिताची यादी पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडेही हा सिक्युरिटी कोड असेल. कार्यक्रमस्थळी मोबाईल, कॅमेरा आणि कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी असणार आहे, अशी माहिती चंपतराय यांनी दिली.

  उमा भारती शरयू तीरावर प्रार्थना करणार

  राममंदिर आंदोलनातील एक नेत्या, भाजप उपाध्यक्ष उमा भारती 5 ऑगस्टला अयोध्येतच असणार आहेत; पण भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. यामागे त्यांनी कोरोना व्हायरसचे कारण सांगितले आहे. त्यावेळी आपण शरयू नदीच्या तीरावर प्रार्थना करणार असून, प्रमुख पाहुणे गेल्यानंतर आपण रामलल्लाचे दर्शन घेऊ असे उमा भारती यांनी म्हटले आहे. भूमिपूजन कार्यक्रमावेळी पाहुण्यांच्या यादीतून आपले नाव वगळावे, असेही त्यांनी सांगितले आहे.

  पंतप्रधान मोदींसह पाचजण व्यासपीठावर

  कोरोना संसर्गाचे सावट देशभर आहे. तसेच अयोध्येतही आहे. रामजन्मभूमीच्या पुजार्‍यांसह 17 पोलिसांना कोरोना झाला आहे. त्यामुळे भूमिपूजन सोहळ्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

  भूमिपूजन सोहळ्याच्या मंचावर केवळ पाच मान्यवर असतील. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास मंचावर असणार आहेत.

Previous articleराममंदिराच्या पाया भरणीसाठी पंतप्रधान मोदी ३ तास थांबतील, तर भूमि पूजनाच्या वेळी ४८ कॅमेऱ्यांसह १०० लोकांचे पथक लाइव्ह कव्हरेज साठी सज्ज –
Next article🛑 मनसेचा…..! ठाकरे सरकारला इशारा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here