

*पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरातील पी.डब्ल्यू.डी. विभागाचा मनमानी कारभार;*
पालघर (दि.4ऑगस्ट, 2020) (वैभव पाटील) : महिन्याभरापूर्वी, बोईसर तारापूर रस्ता बांधला गेला होता. त्यावेळी हा रस्ता तयार होताना, बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत.
पालघर / बोईसर सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे बोईसर ते चित्रलय रोडचे कंत्राट मिलन बिलटेक एलएलपीला देण्यात आले आहे, परंतु बांधकामात गुणवत्ता दिसून येत नाही. लॉकडाऊनचा फायदा घेत रस्तयाचे काम रात्रीच्या अंधारात केले जात होते. मिलरच्या मदतीने रस्त्यावर काँक्रीट टाकण्याचे काम रात्रीच्या वेळी केले जात होते. त्यामुळे, दोन्ही ठिकाणी रस्ता बंद असताना रात्री काम करण्याची सक्ती का होती, असा सवाल आता केला जात आहे.
काँक्रीटीकरणाच्या वेळी वायब्रेटर किंवा वॉटरिंग पम्प काहीच वापरण्यात आले नव्हते. रस्ता काँक्रीट झाल्यानंतरही फ्लोटर चालू करण्यात आला नाही. एकूणच बांधकाम करताना गुणवत्तेचा विचार केला गेलेला नाही. नवीन रस्त्यावर क्युरिंगची व्यवस्था योग्य नव्हतीच पण, टेस्टिंग क्यूबही भरण्यात आले नव्हते. लॉकडाऊन आणि अंधाराचा फायदा घेऊन या रस्त्याचे बांधकाम दुय्यम दर्जाचे केले गेले. हे बांधकाम बिना शटरिंग ऑयल आणि बिना जॉइंटचे सेल्टेक्स बोर्डाचा दुय्यम दर्जाचा माल वापरून करण्यात आले.
मागे स्थानिक आमदार राजेश पाटील यांनी बांधकामाची पाहणी केली होती व बांधकाम पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी आणि संबंधित कंपनीचा चाचणी अहवाल का तपासला गेला नाही, असे प्रश्न आता जनतेतून येत आहेत. त्या रस्त्याचे परीक्षण केले जावे जेणेकरून रस्त्याची गुणवत्ता कळू शकेल, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.
रस्त्यावर बॅरिकेटिंग केले गेलेले नाही, रस्ते बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या सळ्या बाजूंनी बाहेर आलेल्या आहेत, ज्या कोणालाही लागून अपघात होण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेकडे दुर्लक्ष का केले जात आहे? प्रशासन आणि संबंधित विभागांनी वेळेत गुणवत्तेकडे लक्ष न दिल्यास बांधकामानंतर काही वर्षातच रस्ता तुटण्यास सुरवात होईल, वेळ आणि पैशाची दोन्ही खर्च होईल, असे म्हटले जात आहे. जनतेत इतके प्रश्न उठत असताना बांधकामाच्या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता आणि कंत्राटी कंपनी अभियंता यांच्यापैकी कोणी जबाबदार व्यक्ती तेथे उपस्थित नव्हती. फक्त काम करणारे कामगार होते. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणारा जबाबदार माणूस नव्हता. रस्त्याचे बांधकाम देवाच्या भरवश्यावर सुरू असल्याचे म्हटले जात असून, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. रात्रीचे काँक्रीटचे काम थांबवून, दिवसा व्यवस्थित काम करण्यात यावे आणि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने कडक कारवाई करवी, असे म्हटले जात आहे.