*युवा मराठा न्युजच्या पत्रकारावर प्राणघातक हल्ला सटाणा पोलिसांचे दुर्लक्ष*
*सटाणा,(जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)* युवा मराठा न्युज चँनलचे नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील पत्रकार अशोक शंकर बहिरम यांचेसह त्यांच्या भावावर व वडिलांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करुन त्यांना अटक करण्याकामी सटाणा पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, सटाणा तालुक्यातल्या दगडी साकोडे या गावी पत्रकार अशोक बहिरम यांची शेती असून,या शेतातून दिनांक २आँगस्ट रोजी बयाजी सयाजी पवार यांच्या कुटूंबातील काही मुले शेतातून शेंगाची चोरी करीत असताना रंगेहाथ पकडण्यात आल्यावर बहिरम कुटुंबाकडून बयाजी सयाजी पवार यांना समज देण्याचा प्रयत्न केला गेल्यावर पवार कुटुंबातील एकूण ९ लोकांनी पत्रकार अशोक बहिरम यांचेसह त्यांच्या भाऊ व वडीलांवर प्राणघातक हल्ला करुन त्यांचे घर जाळून टाकण्याची धमकी हल्लेखोंरानी दिली.एवढया भयानक प्रकाराची दहशत या हल्लेखोर पवार कुटूंबाची दगडी साकोडे गावावर असताना सुध्दा सटाणा पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती मिळत आहे,
त्याशिवाय डांगसौंदाणे औट पोस्टचे हवालदार जाधव व दगडी साकोडे गावचे पोलिस पाटील देशमुख यांचाही या गावावर कोणताही वचक राहिलेला नसल्यामुळे पत्रकारावर हल्ला करण्याचे धाडस हल्लेखोर पवार कुटुंबाने केले.दरम्यान अशोक बहिरम यांचेवरील या भ्याड हल्ल्याचा निषेध करतांनाच युवा मराठा न्युज चँनल महाराष्ट्रच्या वतीने सदर हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली,तर सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नंदकुमार गायकवाड यांचेशी युवा मराठा न्युजने दुरध्वनीवरुन संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती देऊन कारवाईची मागणी केली आहे.