🛑 नातू गमावल्यानंतरही आजीने राखले समाजभान; गृहमंत्री झाले नतमस्तक 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे ( पिंपरी ) 20 जून:⭕ प्रेम प्रकरणावरून पिंपळे सौदागर येथील खुनी हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या विराज जगताप या तरुणाच्या कुटुंबीयांची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सरकारच्या वतीने मदतीचा पहिला भाग म्हणून ४ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश कुटुंबाला त्यांनी दिला तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.
गेल्या आठवड्यात प्रेम प्रकरणातून झालेल्या खुनी हल्ल्यात विराज जगताप याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुलीचे वडील, काका, दोन भाऊ आणि अन्य दोघांना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून दोन समाजातील भावना भडकविण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. त्यामुळे तसा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला या कुटुंबीयांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली होती. तसेच अॅड. प्रकाश आंबेडकर, दीपक निकाळजे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनीही जगताप कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
गृहमंत्री देशमुख यांनी आज जगताप कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळेल, अशी ग्वाही विराज जगताप याची आजी माजी नगरसेविका सुभद्रा जगताप यांना गृहमंत्र्यांनी दिली. या केससाठी तुम्ही म्हणाल तो वकील शासनाच्या वतीने देण्यात येईल, असे नमूद करताना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिले. यावेळी महापालिकेतील पक्षनेते नाना काटे, शहराचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई उपस्थित होते.
गृहमंत्री म्हणाले, ‘या प्रकरणाला जातीय वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला होता. परंतु, विराजच्या कुटुंबीयांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. सुभद्राबाईंनी समोर येऊन संपूर्ण गावाशी संवाद साधला. सर्व गावाची एकत्र बैठक घेतली. माझा नातू गेला आहे तो काही परत येणार नाही, परंतु तुम्ही वाईट सोशल पोस्ट करू नका, यातून दोन जातीमध्ये वाद निर्माण होईल, असं आवाहन त्यांनी केलं. यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं नाही. दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांनी संयम दाखविला, असं नमूद करत यावेळी गृहमंत्री देशमुख सुभद्राबाईंपुढे नतमस्तक झाले. महाराष्ट्राची हिच ताकद आहे. कोणत्याही प्रकारची जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना इथे थारा मिळत नाही. हेच जगताप कुटुंबीयांनी अधोरेखित केले आहे, असेही देशमुख म्हणाले.⭕
