मुख्यमंत्र्यांनी लाल डब्बाने पंढरपूरला जावे! जर संतांच्या पादुका लाल डब्यातून पंढरपूरला नेणार असाल तर…
पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे : दरवर्षी पालखी सोहळ्या दरम्यान तुकोबा-माऊलींच्या गजराने आळंदी आणि देहू नगरी दुमदुमून जायची. मात्र, कोरोना विषाणूच्या संकटामुळे या वर्षीचा पालखी सोहळा अगदी सध्या पद्धतीने होत आहे. १२ आणि १३ जूनला मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. आता तुकोबा-माऊलीं यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला एसटी बसने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान, आता याच मुद्द्यावरून भाजपने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
संतांच्या पादुका आता हेलिकॉप्टर ऐवजी बस ने पंढरपूरला नेण्याचे शासनाने ठरविले असल्याने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा संतांचा सन्मान राखण्याकरिता लाल डब्याच्या बसनेच पंढरपूरला महापुजेसाठी जावे असं भाजपा आध्यात्मिक आघाडीचे सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी मत मांडले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर यावर्षी कोणालाही वारीला जाता येणार नाही. फक्त प्रमुख सात संतांच्या पादुका आम्ही विमानाने किंवा हेलिकाॅप्टरने पंढरपूरला नेऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालखी सोहळा प्रमुखांना दिली होती. आता प्रत्यक्षात मात्र विमान , हेलिकॉप्टर ऐवजी एस.टी. बसने पादुका नेण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. आम्ही वारकरी अत्यंत सहनशील असल्याने शासनाच्या सर्वच आदेशांचे पालन करु यात शंकाच नाही.
मात्र संतांची शेकडो वर्षांची पायी जाण्याची परंपरा खंडीत होऊन आपणच त्यांना वाहनाचा पर्याय दिला आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करतो की त्यांनी सुद्धा संतांचा सन्मान राखण्यासाठी हेलिकॉप्टरने पंढरपूरला जाऊ नये. जसा शासनाचा राजशिष्टाचार असतो तसा त्यांनी संतांचाही सन्मान राखावा. महाराष्ट्राचे महान संत एस.टी. बसने आणि मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने असे होऊ नये. संतांचा मान मुख्यमंत्र्यांपेक्षा कैक पटीने मोठा आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर्षी लाल डब्याच्या बसनेच पंढरपूरला महापूजेसाठी सपत्निक जावे आणि शिष्टाचार राखावा असं भोसले म्हणाले….