राजेंद्र पाटील राऊत
मालेगांव छावणी पोलीस स्टेशन हद्दीत व जायखेडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष!
कळवण तालुक्यातील कारवाईने नागरिकांत समाधान!
नाशिक- विशेष प्रतिनिधीः नाशिक जिल्ह्यातील मालेगांव शहर तालुका व तसेच ग्रामीण भागात देवळा,सटाणा तालुक्यातील जायखेडा तसेच मालेगांव तालुक्यात व शहरातील छावणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील जुगाऱ्यांचा सट्टा मटका व अवैध गुटखा धंदा बेधडक पणाने सुरू असून, पोलीस प्रशासनाचे याकडे आंधळ दळतं.. कुत्र पीठ खातं…! या पद्धतीने दुर्लक्ष सुरू केले असून त्यामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली असून, तालुक्यातल्या विविध गांवात तसेच तालुक्यातल्या ठिकठिकाणी सट्टा मटका जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असतांना पोलीस प्रशासनातले जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने साहेब यांनी अद्यापही धडाकेबाज व ठोस कारवाई न केल्यामुळे साशंकतेचे वलय निर्माण होत आहे. यापुर्वी असलेले जिल्हा पोलीस प्रमुख शहाजी उमाप साहेब यांनी नाशिक जिल्ह्यात ठोस आणि धडाकेबाज कारवाई केल्यामुळे त्यांचे नांव आजही या जिल्ह्यात घेतले जात आहे. तथापी कळवण तालुक्यात अप्पर पोलीस अधिक्षक श्री अनिकेत भारती साहेब यांनी धडाकेबाज कार्यवाही केल्याने त्यांचे जिल्हात कौतुक होत आहे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत सुरू असलेल्या अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. वास्तविकता कसमादे पट्टयात मालेगांव शहर व परिसरात अनेक गावांमध्ये सट्टा मटका जुगाऱ्यांचे अड्डे सुरू असून, पोलीस प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. वेळीच जर पोलीस प्रशासनाने लक्ष न घातल्यास युवा पिढी जुगार, सट्टा मटका, गुटखा व इतर व्यसनांच्या आहारी जावून बरबाद होण्याची दाट शक्यता आहे. यास शासन व प्रशासन हेच जबाबदार राहतील. अशी नागरीकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. तर मालेगावच्या छावणी पोलिस स्टेशन हद्दीतील सुजन थिएटर च्या आवारात खुलेआम सट्टा मटका जुगाराचा अवैध धंदा सुरू असून, पोलिसांनी मात्र या प्रकाराकडे डोळेझाक चालविली आहे.त्याशिवाय जामखेडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सोमपूर, मांगीतुंगी, मुल्हेर भागातही राजरोसपणे सट्टा मटका सुरू असून या बेकायदेशीर धंद्यांना नेमका कुणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.