आशाताई बच्छाव
देवळा, तालुका प्रतिनिधी भिला आहेर : ऑनलाइन जुगारात पैसे हरल्यामुळे हरलेली रक्कम मिळवण्यासाठी चक्क पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न अंगलट आल्याने तीन जणांना पोलीस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली. त्यामुळे पुन्हा एकदा तरुणांमध्ये ऑनलाईन गेम चा व्यसनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
देवळा-मालेगाव या राज्य महामार्गावरील पिंपळगाव (वा) येथील एम. के पेट्रोल पंपावर सोमवारी दि. 24 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास तीन जणांनी पंपावरील कामगारास कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून रोख रक्कम 6 हजार 140 रुपयांची जबरी चोरी करून येथून पळ काढल्याची घटना घडली. तीनही आरोपींविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळामालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी येथील इंडियन ऑइलच्या एम. के. पेट्रोल पंपावर सोमवारी दि. 24 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास सचिन बाळु आहिरे, रोशन बाळु आहिरे (दोघे रा. दहिवड, ता. देवळा) व कुणाल संजय पवार (रा. कणकापुर, ता. देवळा) हे विना नंबरची बजाज पल्सर घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आल्यानंतर त्यांनी अजय बनवरीलाल यादव (वय 30, रा. सुजनीपुर कत्रोवली ता. राणींगंज जिल्हा प्रतापगढ़ राज्य उत्तरप्रदेश, हल्ली रा. पिंपळगाव वाखारी) या पंपावरील कामगाराला पकडुन खाली पाडले.
त्याला मारहाण केली व यातील एकाने कोयता काढुन धाक दाखविला व दुसऱ्याने त्याकामगाराच्या खिशातुन जबरदस्तीने 6, 140 रुपये रोख रक्कम काढुन चोरी करून पळुन गेले. अजय बनवरीलाल यादव याच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी दखल घेत वरील तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सपोनि दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एन. सोनवणे करीत आहेत.
चौकट : दहिवड येथील सचिन बाळू अहिरे यास मोबाईलवर ऑनलाइन जुगार खेळण्याचे व्यसन होते त्या व्यसनापाई तो चाळीस हजार रुपये हरला होता. घरचे जाब विचारतील या भीतीने त्याने पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा विचार केला. त्यासाठी त्याचा भाऊ रोशन अहिरे व कुणाल संजय पवार रा. कणकापूर यांना त्याच्या कटात सहभागी करून घेतले. मात्र पोलिसांनी तात्काळ त्यांच्या मुसक्या आवळल्याने त्यांचा प्लॅन धुळीस मिळाला.






