राजेंद्र पाटील राऊत
लॉ कडाउन घाला, पण लॉकडाऊन शिथिल करा युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
शिवसेनेचे बरडे व धुत्तरगांवकर यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सोलापूर (२६ मे) – शहरातील घटती रुग्ण संख्या आणि दिवसेंदिवस कोलमडत चाललेले सर्वसामान्यांसह कामगार व व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित लक्षात घेऊन १ जूनपासून लॉकडाऊन शिथिल करा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मेल द्वारे पाठविलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, कोविड संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने टाळेबंदी जाहीर केल्यापासून अत्यावशक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद आहेत. सोलापूर शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. मागील दीड महिन्यापासून हाताला काम नसल्यामुळे येथील यंत्रमाग कामगार, विडी कामगार, रेडिमेड गारमेंटचे कामगार यांच्या चुली पेटणे अवघड बनले आहे. त्याचबरोबर छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली आहे. व्यवहार बंद असला तरी इतर सर्व खर्च, दुकान भाडे, लाईट बिल, बँकांचे कर्जावरील व्याज, विम्याचे हप्ते, शासनाचे कर, मिळकत कर आदी खर्चाचा बोजा वाढतच राहतो. टाळेबंदीच्या काळात सोलापूरकरांनी शासनाचे सर्व नियम पाळले आहेत. त्यामुळेच शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोरोंना विरूद्धची लढाई सक्षमपणे लढत असतानाच जनजीवन पूर्ववत होण्याच्या दृष्टीने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत व्यापाऱ्यांना काही निर्बंध घालून दिल्यास, नियमांचे काटेकोर पालन करीत व्यवसाय सुरू राहतील अशी ग्वाही या निवेदनात देण्यात आली आहे. विशेषतः अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या व्यापाऱ्यांना स. ९ ते ३ व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा देण्यात यावी तर विडी कामगार महिला घरात बसूनच विड्या वळत असतात. तरी त्यांना कारखान्यातून कच्चा माल आणण्यासाठी व विड्या जमा करण्यासाठी सवलत देण्यात यावी, त्याचप्रमाणे यंत्रमाग व गारमेंट कामगारांसाठी किमान एक पाळी चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.
कुटुंबंप्रमुख म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे निश्चितच सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा देखील पुरुषोत्तम बरडे व गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी व्यक्त केली आहे.