बाराहाळी परिसर गोळीबाराने हादरले, प्रशासनाची झोप उडाली
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
▶️गोळीबारांत जखमी झालेल्या युवकांना बाऱ्हाळी येथे प्राथमीक आरोग्य केंद्रात उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे
••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड धुमाकूळ घालणारे गोळीबाराचे सत्र आता थेट आपला मोर्चा ग्रामिण भागाकडे वळविला की काय अशा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा प्रत्यय मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास बाऱ्हाळी ते वडगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील निवळी शिवारात आला. सिनेस्टाईल पाठलाग करुन एका तरुण शेतकऱ्यांवर पिस्तुलातून गोळीबार करुन हल्लखोर पसार झाले. यात शेतकरी तिरुपती पपुलवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बाऱ्हाळी येथे प्राथमीक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निवळी (ता. मुखेड ) येथील शेतकरी तिरुपती रानबा पपुलवाड हे त्यांच्या वैयक्तीक कामानिमित्त देगलुर तालुक्यातील करडखेड येथे गेले होते. ते आपल्या दुचाकी (एमएच२४-एपी-३१९४) वरुन मंगळवारी (ता. ९) सकाळी अकराच्या सुमारास परत येत होते. त्यांचा दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी पाठलाग सुरु केला. तिरुपती पपुलवाड यांची दुचाकी बाऱ्हाळी ते वडगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील निवळी शिवारात गणपती मंदिराजवळ येताच पाठलाग करणाऱ्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात तिरुपती पपुलवाड ( वय ३१ ) यांच्या खांद्याला गोळी लागली. मात्र त्यांनी हिम्मत न हारता जखमी अवस्थेत आपली दुचाकी थेट बाराहाळी रुग्णालयात नेली.
गोळीबार करुन हल्लेखोर पसार झाले. जखमी शेतकऱ्यांवर उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले. ही माहिती बाऱ्हाळी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळाला भेट दिली. मुखेड पोलिसांनीही रुग्णालयात जावून जखमीची भेट घेऊन विचारपुस केली. मात्र सध्या जखमी भयभीत झाला असून तो या प्रकरणावर काहीच बोलत नसल्याने हा नेमका प्रकार का आहे, गोळीबार करणारे कोण व कशामुळे हल्ला केला याबाबत पोलिस माहिती घेत आहेत. तुर्त तरी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. बाऱ्हाळी परिसरात भर दिवसा गोळीबार झाल्याची घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून अशा प्रकारची घटना बाऱ्हाळी परिसरात प्रथमच घडली असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.