Home जळगाव वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वाटणीवरून चतुर्भूज भावांमध्येच हाणामारी

वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वाटणीवरून चतुर्भूज भावांमध्येच हाणामारी

175

आशाताई बच्छाव

1001477888.jpg

वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वाटणीवरून चतुर्भूज भावांमध्येच हाणामारी
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – वडिलोपार्जीत शेत जमिनीचा वाटा पाडण्यावरून तालुक्यातील चतुर्भूज तांडा शिंदी येथे दोन भावांमध्ये वाद निर्माण झाला. त्यातून दोघा भावांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी लहान भावाने दिलेल्या फिर्यादीवरून मोठा भाऊ व त्याच्या कुटुंबियाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळु गुलाब राठोड रा. चतुर्भूज तांंडा शिंदी याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या वडिलोपार्जीत शेत जमिनीचा वाटा पाडण्याकामी मोठा भाऊ विजय गुलाब राठोड याच्या शेतात फिर्यादी, फिर्यादीचा काका व गावातील इतर लोक असे गेले असता शेतवाटणीची चर्चा सुरू असतांना भाऊ विजय राठोड व पुतण्या सचिन राठोड यांनी सांगितले की, तुम्हाला पैशांमध्ये व ट्रॅक्टरमध्ये वाटा मिळणार नाही. तुम्ही इथून निघुन जात असे सांगितले. त्यावर पैसे का देणार नाही असे विचारले असता आरोपीतांनी चापटाबुक्यांनी विठ्ठल राठोड यास मारहाण केली. बाळू राठोड हे सोडवण्यास गेले असता त्यांना सचिनने लोखंडी रॉडने डोक्याच्या डाव्या बाजुला मारून दुखापत केली. तसेच बाळू राठोड यांच्या पत्नीलाही इतरांनी मारहाण केली. व परत शेतात आले तर शेतात बुजून मारून टाकू अशी धमकी दिली. ही घटना दि.8 रोजी दुपारी दोन वाजता घडली.
या प्रकरणी बाळू गुलाब राठोड याच्या फिर्यादीवरून भाऊ विजय राठोड, पुतण्या सचिन राठोड, मुलीबाई राठोड, मंगलबाई राठोड, यमुनाबाई राठोड अशा पाच जणांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 115(2), 189(2), 191(2), 190,352,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार तुकाराम चव्हाण करीत आहेत.