Home सामाजिक विद्यार्थी आत्मविश्वास दिन

विद्यार्थी आत्मविश्वास दिन

236
0

आशाताई बच्छाव

IMG_20240326_084703.jpg

विद्यार्थी आत्मविश्वास दिन

भारतात अनेक दिवस साजरे केले जातात.जसे रोज डे,हग डे, प्राॅमिस डे, व्हॅलेंटाईन डे ,मदर्स डे,फादर्स डे इत्यादी.हे सर्व डे विदेशातून भारतात आले आहेत.आणखी एक दिवस विदेशात साजरा केला जातो आणि तो म्हणजे विद्यार्थी आत्मविश्वास दिन.हा दिवस दुर्दैवाने आपल्या भारतात साजरा केला जात नाही.खरंतर हा दिवस भारतातील प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक महाविद्यालयात साजरा व्हायला पाहिजे.शाळेचा किंवा महाविद्यालयाचा पहिला दिवस आपण विद्यार्थी आत्मविश्वास दिन म्हणून साजरा करू शकतो.यामागे संकल्पना अशी आहे की शाळेत किंवा महाविद्यालयात येणा-या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल असा प्रयत्न शिक्षकांद्वारे किंवा उपदेशकांमार्फत केला जावा.या पहिल्या दिवशी फक्त विद्यार्थ्यांशी चर्चा झाली पाहिजे.त्यांच्या अडचणी थोडक्यात समजवून घेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हाच या दिवसाचा खरा उद्देश आहे.
आत्मविश्वास म्हणजे स्वतः मधील विश्वासाला प्रोत्साहन देणे.सर्वप्रथम स्वतःला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.तेव्हाच आपल्याला कुठलीही चांगली गोष्ट करण्यासाठी आत्मविश्वास मिळू शकतो.यासाठी स्वतःवर प्रेम करायला पाहिजे.आत्मविश्वास यशाची पहिली पायरी आहे.आत्मविश्वास जर विद्यार्थ्यांमध्ये असेल तर ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतात आणि परीक्षेत यश मिळवू शकतात.अर्थात त्यासाठी नियमित अभ्यास हा हवाच. विद्यार्थ्यांमध्ये जर आत्मविश्वास असेल तर त्यांच्या पुढील आयुष्यातही ते नक्कीच यशस्वी होतात.कुठलेही कार्य करताना योग्य निर्णय घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागते.आत्मविश्वास विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभे राहण्याचे आत्मबळ मिळवून देतो. आत्मविश्वास असणारे विद्यार्थी कधीही खचून न जाता आपल्या ध्येयासाठी अथक परिश्रम घेतात. आत्मविश्वासामुळे त्यांच्यात आशावाद निर्माण होतो. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असावा पण अति आत्मविश्वास नको.कारण अती तेथे माती या उक्तीप्रमाणे फाजील आत्मविश्वास विद्यार्थ्याचे भविष्य बिघडवू शकतो.आत्मविश्वास आला की हळूहळू अभ्यासाची भिती कमी होते. आत्मविश्वास असणारा विद्यार्थी आपण नापास तर होणार नाही अशा नकारात्मक गोष्टीपासून दूर होतो.कारण त्याला खात्री असते की तो नक्कीच छान गुण मिळवणार.जेव्हा विद्यार्थी ठरवतो की तो रोजच नियमित अभ्यास करणारच, तेव्हा तो त्या पद्धतीने अभ्यास करतो आणि परीक्षेत चांगले यश मिळवतो.हे कशामुळे शक्य होते तर ते फक्त आणि फक्त त्याच्यातील आत्मविश्वासामुळे.आपल्या देशाचे भवितव्य विद्यार्थ्यांच्या हातात आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची कमी असेल तर देशाचे भविष्यही मागासलेले राहील.कारण आजचा विद्यार्थी उद्याचा डॉक्टर, इंजिनिअर, वकील,राजकारणी असणार आहे.त्यासाठी शाळेपासूनच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांना मोठा वाटा असतो.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या कामासाठी सतत प्रोत्साहन दिले पाहिजे.त्यातूनच पुढे एक चांगला नागरिक घडेल.हल्ली शिक्षणातही भ्रष्टाचार वाढत चाललाय.शाळा, काॅलेजेस भरमसाठ फी विद्यार्थ्यांकडून घेतात.मात्र त्या बदल्यात त्यांना फक्त पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकविल्या जातो.परंतु विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी थेट संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांमधील कौशल्यात वाढ होण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास असावा लागतो.फक्त पुस्तकी ज्ञानाने आत्मविश्वास येत नाही.त्यासाठी लोकांशी संपर्क येणे महत्त्वाचे आहे.त्यातूनच विचारांचे आदानप्रदान होते.बाहेरच्या जगाची माहिती मिळते.पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.शिक्षकांना याबाबत नक्कीच महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल.काही विद्यार्थी असे असतात जे परीक्षेत तर चांगले गुण मिळवतात पण त्यांच्यात बाहेरच्या जगात वावरण्याचा आत्मविश्वास नसतो.ते फक्त पुस्तकी कीडे होऊन राहतात.ही बाब खरंच चिंताजनक आहे.अशी मुले अनेकदा आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर अपयशी ठरतात.आजच्या जगात वास्तववादी असणं फार गरजेचं आहे.आपण कित्येकदा वर्तमानपत्रात वाचतो की हल्ली शाळेत शिकणारी मुले,मुली सुद्धा मादक पदार्थांचे सेवन करतात.जीवनात योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते वाईट मार्गाला लागतात.आज कित्येक विद्यार्थी वर्गात न बसता शाळा, काॅलेजच्या नावाने दिवसभर हुल्लडबाजी करीत असतात.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यास हातभार लावावा.भारताला विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे जायचे असेल तर भावी पिढीत आत्मविश्वास असणे आवश्यक आहे.पालकांनीही याबाबत सजग असायला पाहिजे.पाल्यासोबत वेळ घालवणे, घरातील लहानसहान गोष्टींमध्येही त्याच्या/ तिच्या निर्णयाचे स्वागत करणे, आपल्या पाल्यासोबत त्याच्या अडचणी समजवून घेणे,अशा कितीतरी गोष्टींमधून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो.पुस्तकी ज्ञानाने विद्यार्थ्यांचा फक्त विकास होऊ शकतो.मात्र आत्मविश्वासाच्या बळावर विद्यार्थी स्वतः सोबतच इतरांचाही विकास घडवू शकतो.
विद्यार्थीदशा हा जीवनातील खूप महत्त्वाचा टप्पा आहे.त्यामुळे हीच वेळ असते त्याच्यातील आत्मविश्वासात वाढ होण्याची.त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला सकारात्मक लोकांशी जोडून घेतले पाहिजे. आत्मविश्वासाची सुरूवातच आत्मजागरूकतेने होत असते.मी हे नक्कीच करू शकतो असे स्वतःला पटवून दिले की आत्मविश्वास आपोआप वाढतो. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असला की ते आत्मसुधारणा देखील करू शकतात.विद्यार्थी आत्मविश्वासाच्या बळावर नक्कीच त्यांची स्वप्ने साकार करू शकतात.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleनाशिकच्या भगूरमध्ये धुलीवंदन निमित्त वीरांची मिरवणूक उत्साहात संपन्न
Next articleक्रुसाच्या वाटेची भक्ती….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here