Home सामाजिक ताणतणाव

ताणतणाव

277
0

आशाताई बच्छाव

IMG_20240225_072850.jpg

ताणतणाव

हल्ली बहुतेक सगळ्यांनाच ताणतणाव असतात.असा माणूस शोधूनही सापडणार नाही ज्याला काहीच तणाव नाही.तणाव मानसिक आणि शारीरिक स्वरूपाचा असतो.कधीकधी क्षुल्लक वाटणारा एखादा प्रसंगही व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करतो.तणाव माणसाच्या मनावर आणि तनावर वाईट परिणाम करतो.तणावग्रस्त व्यक्तीला कशातच आनंद वाटत नाही.त्याच्या जीवनात निरूत्साह, उदासीनता येते.अशी व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही.
आता हेच बघा ना, परीक्षा जवळ आली की बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येतो.याचे कारण म्हणजे ब-याच वेळा परीक्षेचा अभ्यास पूर्ण न होणे हे असते.परीक्षेची तयारी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कमी-जास्त प्रमाणात ताण येतोच.परीक्षेच्या वेळी तणाव येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नीट नियोजन करणे गरजेचे आहे.परीक्षेचा ताण आला की ब-याच विद्यार्थ्यांमध्ये घाम फुटणे,मळमळ होणे,छातीत धडधड होणे इत्यादी लक्षणे दिसतात.परीक्षा फक्त शाळा-काॅलेजच्या विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित नसते.इंटरव्हू असो, स्पर्धा परीक्षा असो, प्रेझेंटेशन असो, अशावेळी सुध्दा परीक्षार्थी घाबरतात.त्यांना आपण आपली जवाबदारी व्यवस्थित पार पाडू शकू की नाही याची धास्ती वाटते.इतरांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही तर काय होईल याचा ताण त्यांना येतो.काही विद्यार्थी आपली तुलना दुस-यांशी करतात.तो अमुक किती हुशार आहे.आपण त्याच्यापुढे काहीच नाही,असा विचार करून ब-याच विद्यार्थ्यांना तणाव येतो.काही विद्यार्थी ऐन परीक्षेच्या काळात परीक्षेचा अतिरिक्त तणाव घेऊन आजारी पडतात.आपल्याला परीक्षेत आठवेल की नाही,जो अभ्यास केला तोच येईल की नाही असा विचार करून काही विद्यार्थी आपली तब्येत बिघडवून घेतात.अशावेळी थोडं मनाला शांत करून एक दीर्घ श्वास घ्यावा.त्यामुळे आलेला ताण थोडा हलका होण्यास नक्कीच मदत होते.परीक्षेत आपणही इतरांपेक्षा चांगलं करून दाखवू शकतो याची खात्री बाळगावी.जो अभ्यास केला तो जरी नीट लक्षात ठेवला तरी आपल्यातील आत्मविश्वास वाढतो.अर्थात त्यासाठी नियमित अभ्यास गरजेचा आहे.
आजचे युग स्पर्धेचे आहे.इथे कुणीही ताणतणावापासून मुक्त नाही.काहीतरी प्राप्त करायचे असेल तर जीवनात थोडा ताण असणेही गरजेचे आहे.त्याशिवाय आपण मेहनत कशी करणार ? प्रत्येकाची तणावाची कारणे वेगवेगळी असतात.नकारात्मक विचारांना बाजूला सारून आपले ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.त्यासाठी मनाला रोज सांगायचे की मी हे काम करू शकतो किंवा शकते.म्हणजे तणाव येणं कमी होईल.भविष्याचा विचार करणा-या लोकांना जास्त ताण येतो.जे होणार आहे ते आपल्या हातात नाही.म्हणूनच जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे आणि जीवनाचा मनमुराद आनंद घ्यावा.हसण्यानेही कितीतरी ताण कमी होतो.ताण कमी करण्यासाठी आपण आपल्या आवडत्या सिरीयल्स पाहू शकतो, हास्य क्लब जाॅईन करू शकतो, आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत कधीतरी वेळही घालवू शकतो.यामुळे नक्कीच ताण कमी होईल.तणाव एक नैसर्गिक भावना आहे.मनात भीती निर्माण झाली की तणाव येतो.यातून बाहेर पडण्यासाठी आपण योग्य मार्गदर्शन मिळवू शकतो.एका विशिष्ट मर्यादेत ताण असला की आपला परफाॅर्मन्स उत्तम होतो.तोच ताण वाढला की भीती उत्पन्न होते.कधीकधी ब-याच लोकांना तणाव घालवण्यासाठी मानसोपचारतज्ञांची मदत घ्यावी लागते.कुठलीही परीक्षा, जीवनातील संकटे कितीही मोठी असली तरी धैर्याने, योग्य मार्गदर्शन आणि आपल्या प्रयत्नाने त्यातून मार्ग नक्कीच काढू शकतो.आपले जीवन म्हणजेही परीक्षाच आहे.आपल्या जीवनात अनेक सुखदुःखे येत असतात.आपण अनेक संकटे झेलून त्यातून बाहेर पडत असतो.जीवन एकदाच मिळतं.मग उगाच तणावात जगण्यापेक्षा हसत हसत का जगू नये? बरोबर ना!

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleखऱ्या कलावंतांना मानधनाचा लाभ मिळवून देणार- समाज कल्याण सभापती मदनभाऊ रामटेके
Next articleफोटो व व्हिडीओ व्हायरल करून शरीर संबंध करण्याची मागणी – एकावर गुन्हा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here