Home सामाजिक माझा आवडता छंद

माझा आवडता छंद

50
0

आशाताई बच्छाव

IMG_20240224_081242.jpg

माझा आवडता छंद

एक धागा सुखाचा
शंभर धागे दुःखाचे,
जर तारी हे वस्त्र मानवा
तुझिया आयुष्याचे !
माणसाचे आयुष्य हे दुःखाने, अपेक्षाभंगाने, अपमानाने भरलेले आहे. अशा या दुःखाने भरलेल्या जगात मनुष्य जगतो कशाच्या बळावर? तर छंद किंवा विरंगुळा यांच्या बळावर. सुख जवाएवढे, दुःख पर्वताएवढे तुकारामाने म्हंटल्याप्रमाणे ह्या दुःखांची झुंज देण्याची शक्ती आपल्याला कोण देते? तर तो छंद!
छंद म्हणजे विरंगुळा किंवा आवड. प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो. मराठीत व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे म्हटले जाते तर संस्कृत मध्ये पिंडे पिंडे मती: भिन्न: असे वचन आहे. प्रत्येकाचा छंद हा त्याच्या स्वभावाला धरून असतो. कोणाला चित्रकलेचा, कोणाला संगीताचा, कोणाला खेळण्याचा तर कोणाला पोस्टाची तिकिटे गोळा करण्याचा. पण मला मात्र छंद आहे पुस्तकांशी मैत्री करण्याचा. पुस्तकांच्या सहवासात शांतपणे आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही असे माझे स्पष्ट मत आहे.
या पुस्तकांची आणि माझी मैत्री कधी झाली हे कळलेच नाही. लहानपणी सिंदबादच्या सात सफरी हे पुस्तक वाचून माझ्या मनात समुद्र प्रवासाची ओढ निर्माण झाली आणि मला सुद्धा सिंदबाद सारख्या सफरी करायच्या आहेत असा हट्ट धरून बसायची. चिंगी आणि गोट्याने मला पोट दुखेपर्यंत हसवलं. कोणत्याही संकटांना सामोरे जाणारा फास्टर फेणे, आम्हा मुलांचा अमिताभ बच्चनच होता. अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा या पुस्तकामुळे आपल्याला असा जादूचा मिळाला तर किती गंमत येईल असा मजेशीर विचार मनात यायचा. इसापनीती ने पशुपक्ष्यांच्या गोष्टीतून व्यवहार शिकवला. सिंड्रेलाने राजकुमार परी कथेच्या दुनियेत फिरवून आणले.
त्यानंतर घडो-घडी आठविणारा, बालपणीचा काळ सुखाचा मागे पडला.आयुष्याच्या अत्यंत नाजूक व अवघड अशा किशोर वयात मी येऊन पोहोचले. धड लहान नाही की धड मोठी नाही अशी ती विचित्र अवस्था. या वयात उगीच एकटे वाटायचे. आपल्याला समजून घेणार कोणी नाही, सगळे उगाचच बोलतात असे वाटायचे. आयुष्याच्या या अवघड वळणावर श्यामची आई या पुस्तकाने मला मदतीचा हात दिला. श्यामची आई, श्यामची आई न राहता महाराष्ट्रातील सर्व मुलांची आई होती. त्यानंतर पु.ल. देशपांडे, प्र.क.अत्रे, व.पु.काळे, रणजीत देसाई, वि.स.खांडेकर यांसारखी सरस्वतीच्या दरबारातील यजमान मंडळी मला आकर्षित करू लागली. पु.ल. देशपांडे व लता मंगेशकर ही महाराष्ट्राची दैवते आहेत असे म्हटले जाते. पु.ल.देशपांडे यांचे साहित्य वाचून त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व का म्हटले जाते हे लक्षात आले.त्यांची बटाट्याची चाळ, अपूर्वाई, असा मी, व्यक्ती आणि वल्ली ही पुस्तके वाचून या महान लेखकापुढे मी नतमस्तक झाले.
प्र.के.अत्रे यांच्या विनोदाची तऱ्हा याहून वेगळी आहे. त्यांच्या कऱ्हेचे पानी, झेंडूची फुले, मी अत्रे बोलतोय या पुस्तकातील लेखन शैलीने मला खळखळून हसविले. इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी मला शिवाजींच्या काळात नेले तर स्वामींचे लेखक रणजी देसाई यांनी मला पेशवे काळात नेले. जी.ए.कुलकर्णी यांची पायवाटच वेगळी होती.
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे असे म्हणतात, त्यात काही खोटे नाही. अशा या थोर साहित्यिकांच्या दरबारात मी वेडीपीसी होऊन, असे वाटायचे की शाळा नको, अभ्यास नको, ते शिकवणी वर्ग नको, मुसळधार पाऊस पडत असावा, अंगावर रेशमी मऊदुलई असावी, हातात कॉफीचा कप असावा, आणि दुसऱ्या हातात पु.ल.चे एखादे पुस्तकात असावे. वाह! क्या बात है!
असा धरी छंद l जाई तुटोनिया भावबंध ll अशा मताची मी बनली. पण समोर दहावीची पुस्तके गुणवत असायची. मन म्हणत असायचे, जरा थांब, छंद असावा पण छंदिष्ठ असू नये! पुस्तकेही सांगतात दहावीची परीक्षा होऊ दे. मग आपली भेट आहेच, तोपर्यंत पुढील अभ्यासाकरिता- ऑल दि बेस्ट.
शब्दांचा असा जडला मला छंद!
नका घालू मला, कोणताही बंध
मैत्री माझी पुस्तकांशी स्वच्छंद…!
सविता तावरे
युवा मराठा न्यूज-मुंबई स्पेशल रीपोर्टर
महाराष्ट्र भूषण न्यूज-मुंबई प्रतिनिधी
स्वराज्य पोलीस मित्र संघटना
(संचालक तथा मुंबई अध्यक्षा)
ग्राहक सेवा संस्था
(मुंबई महिला अध्यक्षा)

Previous articleकथा – स्नेहबंध
Next articleरविवारी वाशिम येथे भव्य विदर्भस्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here