Home सामाजिक मोबाईल उपयोगी पण….

मोबाईल उपयोगी पण….

161
0

आशाताई बच्छाव

IMG-20240206-WA0023.jpg

मोबाईल उपयोगी पण….

कुटुंबव्यवस्था हा भारतीय समाजाचा पाया आहे.पण हल्ली एकत्र कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे.म्हणजे आपली कुटुंबव्यवस्था दिवसेंदिवस बदलते आहे.आता सर्वजण आधुनिक झाले आहेत.आपल्या जीवनशैलीत त्यामुळे आमूलाग्र बदल झाला आहे.पूर्वी एकाच घरात संपूर्ण कुटुंब राहायचं.त्यामुळे त्यावेळी एकमेकांशी संवाद साधला जायचा.कुठलाही सण सर्व कुटुंब आनंदाने साजरा करत.घर लहान असो किंवा मोठे, सारेजण गुण्यागोविंदाने एकत्र नांदत.पण जसजसा काळ बदलला तसतसे माणसे आपल्या कुटुंबापासून कामानिमित्त, शिक्षणासाठी बाहेरगावी किंवा परदेशात जाऊ लागली.त्यामुळे ती आपल्या कुटुंबापासून दुरावली.काही घरांमध्ये तर एकत्र राहून एकमेकांशी न बोलणारी मंडळीही आहेत.मग एकांतवासात त्यांना आठवण येते ती मोबाईलची.कित्येकदा वाटतं की मोबाईलमुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते आहे.माणसे अधिकाधिक प्रमाणात मोबाईलवर व्यस्त राहू लागली आहेत.घरच्यांशी बोलायला सुध्दा त्यांना वेळ नसतो.आज प्रत्येकाकडे मोबाईल असतो.अगदी लहान मुलांच्या हातात देखील मोबाईल असतो.बाळ रडले की आई त्याला शांत करायला मोबाईल देते आणि मोबाईल मिळताच बाळही शांत राहातं.त्याला माहित असतं की रडलो की मोबाईल हाती येणार.लहान मुले कितीतरी वेळ मोबाईल पाहण्यात घालवतात.त्यामुळे त्यांच्या नाजूक डोळ्यांना इजा होण्याचा धोकाही संभवतो.लहान असो की वयोवृद्ध, हल्ली सगळ्यांनाच मोबाईलने वेड लावले आहे.
पूर्वी रात्रीचे जेवण घरातील मंडळी एकत्र बसून करत असत.किती आनंद होता त्यात! जेवताना अनेक विचारांचे आदानप्रदान व्हायचे.घरातील एखादी व्यक्ती नोकरीनिमित्त बाहेरगावी गेली की सर्व घरचे त्याच्या पत्राची वाट पाहायचे.पत्र हाती पडून वाचले की घरच्यांना आभाळभर आनंद व्हायचा.घरातील सर्व लोक कुठलीही तक्रार न करता सगळी कामे आनंदाने करत.लोकांची ये-जा घरात असायची.आता माणसे एकमेकांकडे फारसं जात नाही.मोबाईलवरच सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतात.पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही वेगळाच असतो.पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुठल्याही समस्येवर घरातील मंडळी मिळून तोडगा काढत.एकत्र कुटुंब असल्यामुळे कुठल्याही संकटात माणसाला एकटे वाटत नव्हते.आपली माणसे सोबत आहेत ही भावना असायची. बदलत्या जीवनशैलीने मानवी जीवनावर प्रभाव टाकला आहे.माणूस एकटा झाल्यामुळे मोबाईल त्याला जवळचा वाटू लागला.त्यामुळे एकमेकांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात खूप कमी लोक असतात.त्यामुळे हळूहळू नात्यांतील जिव्हाळा कमी होऊ लागला आहे.अन्न, वस्त्र, निवारा यांसोबत मोबाईल एक मुलभूत गरज झाली आहे.अनेकजण सोशल मिडियावर तासन् तास घालवत असतात.आपल्या आजूबाजूला काय चालू आहे याचे भानही त्यांना नसते.जेवताना पानात काय वाढलंय हे बघायची तसदी देखील काही लोक घेत नाही.मोबाईल बघता बघता जेवण चावण्याऐवजी नुसतं गिळण्याचं काम चालू असतं.एकाच घरात राहून अबोला वाढला आहे याला जबाबदार सोशल मिडिया म्हणजेच पर्यायाने मोबाईल जवाबदार आहे.आभासी जगात वावरताना समोरच्या व्यक्तीकडून फसगत होण्याचीही शक्यता असते.सोशल मिडियावर अनोळखी लोकांना आपल्या जीवनात घडलेल्या किंवा घडत असलेल्या गोष्टींबद्दल भरभरून सांगत असतात.मात्र त्याच गोष्टी घरच्यांना सांगत नाही याचे आश्चर्य वाटते.अश्यावेळी सोशल मिडियावरील समोरची व्यक्ती कशावरून आपल्या असाह्यतेचा फायदा घेणार नाही? आपल्या आजूबाजूलाही एक सुंदर जग आहे याचा विसर मोबाईलमुळे कित्येकांना पडतो.जीवनशैलीत झालेला बदल आपण नक्कीच स्विकारला पाहिजे.पण त्यामुळे आपले आपापसातील संबंध बिघडायला नको याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे.नात्यातील संवाद टिकून राहणे गरजेचे आहे.शेवटी विषय आपल्या नातेसंबंधाचा आहे…खरंय ना!

लैलेशा भुरे
नागपूर

Previous article४० मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या; बीडच्या नीता अंधारे यांच्याही बदलीची चर्चा
Next articleअशोक गलांडे एम ए पदव्युत्तर परीक्षेत चांदवड महाविद्यालयात प्रथम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here