Home सामाजिक विषय- जाहिराती चांगल्या की वाईट **************************

विषय- जाहिराती चांगल्या की वाईट **************************

165
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240203_070823.jpg

विषय- जाहिराती चांगल्या की वाईट
**************************
आजकाल प्रत्येक गोष्टीची जाहिरात केली जाते.आजचे युग जाहिरातीचे युग आहे.वर्तमानपत्रे,मासिके, नियतकालिके यांमध्ये जाहिराती दिसतात.रस्त्यावरून जातानाही सर्वत्र जाहिरातीचे फलक दिसतात.बसेस, रेल्वे येथेही जाहिराती असतात.नभोवाणी, दूरचित्रवाणी यावर सतत जाहिराती चालूच असतात.कधीकधी दूरचित्रवाणीवरील जाहिरातींचा राग येतो.कारण त्यांच्यामुळे कार्यक्रमांमध्ये व्यत्यय येतो.पण काही जाहिराती खरोखरच चांगल्या असतात.
काहीही असले तरी जाहिराती आजच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेल्या आहेत.एखादे नाटक, सिनेमा कुठे आहे हे आपल्याला जाहिरातींमुळेच समजते.जाहिरातीचे युग वाईट नाही.परंतु आपल्याला सजग राहून त्यातील काय योग्य आणि काय अयोग्य ते घ्यायचे.आपण जागृत राहिले पाहिजे.आपली फसवणूक होऊ द्यायची नाही.
जाहिरात ही एक कला आहे.आकर्षक जाहिराती बनवण्यासाठी त्यात चित्रकला, लेखनकला, फोटोग्राफी ऍनिमेशन अशा इतर कला प्रकारांची मदत घेतली जाते.त्यामुळे सामान्य वस्तूही असामान्य भासू लागते.प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे.तशी ती जाहिरातींच्या क्षेत्रात देखील आहे.म्हणून प्रत्येक उत्पादक कमी किंमत ठेवून जास्तीत जास्त नफा मिळवू इच्छितो.आपल्या मालाची विक्री वाढवून जास्त फायदा मिळविण्यासाठी व्यापारी जाहिरातींची मदत घेतो.पाम्प्लेट वाटून,भिंतींवर लिहून, घोषणा देऊनही जाहिरात करतात.कित्येकदा आपल्या प्रचारासाठी कंपनी वेगवेगळ्या प्रसार माध्यमांचा उपयोग करतात.तयार कपड्यांच्या जाहिरातीसाठी स्मार्ट मुले, स्त्रिया,मुली यांचा वापर केला जातो.जाहिरातदार विश्व सुंदरी,नट,नट्या,खेळाडूंचा आपल्या जाहिरातीत उपयोग करतात.जाहिरातींमुळेच वस्तूंचे भाव वाढतात.चैनीच्या वस्तुंच्या जाहिराती देऊन उत्पादक नफा कमावतात.आज जाहिरातींत स्त्रियांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.त्यात भडकपणा,अश्लिलता असते.तसेच जागोजागी लावलेले पोस्टर्स, जाहिराती यांमुळे गावे,शहरे खराब दिसू लागतात.कधी कधी तर आपण जाहिराती पाहून नको नको त्या गोष्टी विकत घेतो.जगात एकुण चौसष्ट कला आहेत असे आपण म्हणतो.त्यात आणखी एका कलेची भर पडली आहे.ती पासष्टावी कला म्हणजे जाहिरात कला.असे म्हणतात की ओरडून जाहिरात करणा-याची माती खपते पण गप्प बसून राहणा-याचे मोती सुध्दा खपत नाहीत.एवढे जाहिरातीचे महत्त्व आहे.एवढेच नव्हे तर जाहिरात हाच आता स्वतंत्र उद्योग बनला आहे.
यंत्रयुगात वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले.त्यामुळे त्या वस्तू विकण्यासाठी जाहिरात करणे गरजेचे बनले.जाहिरातीचे काही तोटे असे की जेव्हापासून उपभोग्य वस्तूंची संख्या वाढू लागली तेव्हापासून जाहिरातींचा सुळसुळाट सुरू झाला.आज पहावे तिकडे जाहिरातींचा भडिमार असतो.अगदी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गुटख्याची किंवा शीतपेयांची जाहिरात आपला पिच्छा सोडत नाही.लहान मुलांना नजरेसमोर ठेवून बनवलेल्या जाहिरातींना मुले फशी पडतात आणि आईवडिलांकडे त्या वस्तू विकत घेण्याचा हट्ट धरून बसतात.जाहिरातींमुळे वस्तूंची विक्री वाढत असल्याने जाहिरात करायलाच हवी परंतु ती करताना तारतम्य बाळगले पाहिजे.खोटे दावे, भडकपणा एखाद्या जाहिरातीत केले असल्यास त्याविरूद्ध ग्राहक आयोगाकडे तक्रारही करता येते.लहान असो वा मोठे सर्व ब्रॅंड आणि कंपन्या त्यांच्या उत्पादनाची विविध प्लॅटफॉर्मवर जाहिरात करतात.
जग आता स्पर्धात्मक झाले आहे.प्रत्येकाला स्पर्धेत पुढे राहायचे आहे.जाहिराती देखील याच श्रेणीत येतात.आपण अनेक जाहिरातींमध्ये नोकरीसाठी रोजगार स्तंभ सुद्धा पाहतो ज्यामध्ये नोकरीच्या रिक्त पदांची यादी असते जी बेरोजगार उमेदवारांसाठी फायदेशीर आहे.त्याचप्रमाणे वैवाहिक जाहिराती लोकांना विवाहासाठी योग्य वधू किंवा वर शोधण्यात मदत करतात.शिवाय हरवलेली माणसे,दुकाने,प्लाॅट शोधण्यासाठी जाहिराती उपयोगी पडतात.विद्यार्थ्यांना वेगवेगळे कोर्स आणि त्याबद्दल माहितीसाठी सुध्दा जाहिरात असते.पूर्वी फक्त मासिके, साप्ताहिके, इमारतींच्या भिंतीवर जाहिराती दिल्या जात असत.आजकाल वर्तमानपत्रांपासून इंटरनेट पर्यंत जाहिरातींचा प्रचार आणि प्रसार केला जातो.समाजातील एक मोठा वर्ग इंटरनेटवर बराच वेळ घालवत असल्याने लोक त्यांच्या जाहिरातींना लक्ष्य करत आहेत.इंटरनेटवर पोस्ट केलेली जाहिरात काही सेकंदात लोकांपर्यंत पोहचते.जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना बाजारपेठेतील किमतीतील तफावत आणि दर्जाविषयी माहिती मिळते.
एकूणच जाहिराती खूप उपयुक्त आहेत.परंतु त्या हानिकारक देखील असू शकतात.त्यांचा हुशारीने वापर करणे आणि त्या मनोरंजन आणि शैक्षणिक आहेत याची खात्री करणे हे आपल्यावर अवलंबून आहे.आपल्यापैकी कुणीच जाहिरात टाळू शकत नाही.कारण आपण जाहिरात युगात आहोत.पण आपण काय करू शकतो ते म्हणजे आपल्या बुध्दीमत्तेचा वापर वाईट लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि योग्य लोकांकडून नफा मिळवण्यासाठी करणे.जाहिरात आपल्या रोमारोमात भिनली आहे.जाहिराती म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाचा अचूक उपयोग करून तयार केलेल्या तांत्रिक करामती.जाहिरातीला कोणतीही जागा अप्राप्य नाही.
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here