आशाताई बच्छाव
ठेंगोडयात डेंगूचे थैमान एक तरुणीचा बळी;शंभरावर रुग्ण प्रशासनाचा निष्काळजीपणा भोगताय नागरीक! नयन शिवदे विशेष प्रतिनिधी
सटाणा- नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेले प्रसिध्द गणेशस्थान म्हणून ओळखले जाणारे व मध्यवर्ती बाजारपेठेचे ठेंगोडा गाव सध्या डेंगूच्या रुग्णामुळे त्रस्त झाले असून,त्यातच एका तरुणीचा डेंगूच्या आजाराने बळी घेतल्याने आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासनाचा निष्काळजीपणा व अनागोंदी कारभार चव्हाटयावर आला असून, गावात डेंगूचे थैमान सुरु असताना आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन सुस्त असल्याने त्यांच्या अब्रुची लक्तरे पार वेशीवर टांगली गेली आहेत.
याबाबत सविस्तर असे की,मध्यवर्ती बाजारपेठेचे व गुजरात मुंबई महामार्गावरील ठेंगोडा गावात डेंगूची लागण होऊन अनेक रुग्ण त्रस्त असतानाही,स्थानिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच कुठलीही खबरदारी घेऊन उपाययोजना केल्या नाहीत म्हणून आज १५ वर्षीय इयता नववीत शिकत असलेल्या चंचल श्रावण पगार या तरुणीचा डेंगूने बळी घेतला.तर अजूनही ठेंगोडा गावात डेंगूचे शंभरावर रुग्ण असल्याचे बोलले जात असून,ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग गावातील नागरीकांची आरोग्य सुविधा पुरविण्याकामी सपशेल अपयशी ठरले असल्याच्या प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटत आहेत.तर ठेंगोडा गावात ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेचा बो-या वाजल्यामुळेच आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.त्यामुळे गावात आरोग्य सुविधेसह गाव स्वच्छता नियमित व्हावी अशी नागरिकातून मागणी पुढे येत आहे.