Home सामाजिक राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा

राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा

101
0

आशाताई बच्छाव

IMG-20230824-WA0010.jpg

राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा’ आपण साजरा करत आहोत. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी २० ऑगस्ट १९८५ ला सपत्नीक नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून वाढदिवस साजरा केला होता. दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून पाळला जाईल, असे त्यांनी जाहीर केले होते, तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर हा पंधरवडा शासनाकडून राबविण्यात येतो. परंतु, नुसता पंधरवाडा पाळून उपयोग होणार नाही, नेत्रदानाविषयी जनमानसच बदलण्याची गरज आहे, असेच आज सांगावसे वाटते.

अंधत्व निवारणासाठी भारतात १९७६ पासून स्वतंत्रपणे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. अंधत्व दूर करण्यासाठी ‘दृष्टी २०२०’ हे विशेष अभियान भारतात राबविण्यात येत आहे. आज जगातील अंधांची संख्या पाच कोटींच्या जवळपास असून, त्यातील जवळपास दीड कोटी भारतात आहे. यापैकी ६० लाख हे कॉर्नियामुळे (नेत्रपटल) ‍अंधत्व आलेले आहेत. या अंधांपैकी जवळपास ६० टक्के बालके ही १२ वर्षांखालील आहे. भारतात दरवर्षी १ लाखांपेक्षा जास्त नेत्रपटलांची आवश्यकता असून सध्या केवळ ५० हजार नेत्रपटले नेत्रदानाद्वारे उपलब्ध होतात. उपलब्ध नेत्रपटलांपैकी केवळ ६० टक्के नेत्रपटले प्रत्यारोपणासाठी वापरण्यात येते. भारतात अडीच लाख अंधांना बुबुळ प्रत्यारोपणाच्या माध्यमातून दृष्टी देता येते. परंतु नेत्रदानाद्वारे नेत्रपटले मिळण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे.
देशात दरवर्षी एक कोटी लोक या ना त्या कारणाने मृत्युमुखी पडतात. परंतु त्यापैकी केवळ १.५ टक्के लोक नेत्रदान करीत असतात. शेजारच्या श्रीलंकेत नेत्रदानाचे प्रमाण १०० टक्के असून, मानवी नेत्र ही राष्ट्रीय संपत्ती असल्याचीच मानसिकता तेथील लोकांची आहे. श्रीलंकेने नेत्रदानासाठी कायदाच केल्यामुळे ते स्वतःच्या देशाची नेत्रपटलांची गरज भागवून भारतासह इतर ६६ देशांना नेत्रपटले पुरवित असतात. त्यासाठी खास ऑरिबिस नावाच्या सुसज्ज विमानातून इतर देशात जाऊन नेत्रपटल प्रत्यारोपण करीत असतात.
नेत्रदान म्हणजे आपले डोळे गरजू अंध व्यक्तींना दृष्टी येण्यासाठी आपल्या मृत्यूनंतर दान देणे होय. दात्यांच्या डोळ्यांच्या केवळ बुबुळांचे प्रत्यारोपण केले जाते. पूर्ण नेत्रगोलाचे केले जात नाही, म्हणून त्याला नेत्ररोपण न म्हणता ‘बुबुळ रोपण’ असेही म्हटले जाते. ज्या व्यक्तींना अंधत्व हे बुबुळाच्या आजाराने अर्थात कॉर्नियाच्या दोषामुळे आले व ज्या रुग्णांची नजर गेलेली आहे आणि ज्यांच्या डोळ्यातील इतर भाग कार्यक्षण आहे, अशा अंधांना बुबुळ प्रत्यारोपण केले जाते.

कुणी करावे नेत्रदान?

नेत्रदानासाठी स्त्री-पुरुष, जाती, वंश, धर्म आणि वय हा भेद मानला जात नाही. कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीस नेत्रदान करता येते. मोतीबिंदू काढलेल्या व्यक्तींचे डोळेदेखील नेत्रदानासाठी उपयोगात येऊ शकतात. परंतु विषबाधा किंवा बुडून झालेला मृत्यू, धनुर्वात, हिपॅटायटिस, इनकॅप्लायटीस, एड्स, डोळ्यांचा कर्करोग व एड्सग्रस्त नेत्रदान करू शकत नाही. याशिवाय, मधुमेह, कुष्ठरोग, ट्युबरकोलीस, सेप्टीसिनिया, सिकोरीस इत्यादी व्याधींमुळे डोळ्यावर परिणाम झालेल्या व्यक्तींचा कॉर्निया प्रत्यारोपणासाठी उपयुक्त ठरत नाही. भारतात कॉर्निया प्रत्यारोपणाचा पहिला प्रयत्न इंदूर येथे प्रोफेसर धांडा यांनी १९६० साली केला.
पारदर्शक असणारे डोळ्याचे बुबुळ जीवनसत्त्व ‘अ’च्या अभावाने, डोळे येण्यामुळे, डोळ्यांना इजा झाल्यामुळे तसेच अन्य आजाराने अपारदर्शक झालेले बुबुळ पांढरे होऊन अंधत्व येते. या कारणास्तव जगभरात ९१ लाखांवर लोकांना अंधत्व आले असून, त्यात प्रतिवर्षी ४५ हजार दृष्टिहिनांची भर पडत आहे. भारतातील ६० लाख लोकांना वरील कारणामुळे अंधत्व आले असून, त्यात दरवर्षी ४० हजार नवीन अंधांची भर पडतच आहे. भारतात गुजरात, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात नेत्रदानासाठी समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे, ही समाधानाची बाब आहे.

असे करा नेत्रदान

मानवसेवेचे हे महान सत्कार्य मृत्यूपूर्व नेत्रपेढीत इच्छापत्र भरून संकल्पाद्वारे करता येते. मरणोत्तर नेत्रदानाचे ठराविक नमुन्यातील इच्छापत्र आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या समक्ष भरून दिल्यानंतर दात्यास एक डोनर कार्ड दिले जाते. पत्नी, मुले, मुली आणि परिवारातील सर्वांना याची कल्पना द्यावी. नेत्रदात्यास जेव्हा केव्हा मृत्यू येईल तेव्हा फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष नेत्रपिढीला जाऊन अविलंब नेत्रदानासंबंधी लगेच नेत्रपिढीशी संबंध साधणे गरजेचे असून त्यासाठी १९९१ हा दूरध्वनी क्रमांक देशभरातील सर्व नेत्रपेढ्यांना देण्यात आला आहे. डॉक्टर येण्यापूर्वी मृत्यूचे प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावेत. मृतदेह ज्या ठिकाणी असेल तेथील पंखे बंद करावे. जेणेकरून मृतकाचे डोळे कोरडे पडणार नाही, याचीही काळजी घ्यावी. शक्य झाल्यास नेत्रदात्यांच्या डोळ्यात अँटीबायोटिक्स ड्रॉप्स टाकून डोळे उघडे असल्यास बंद करावे. डोळ्यांवर थंड पाण्याच्या कापडी पट्ट्या ठेवाव्यात. नेत्रदात्याचे डोके ६ इंच उंच राहील, अशा स्थितीत ठेवावे. नेत्रदात्याच्या संकल्पपूर्तीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी ठराविक वेळेपूर्वी डोळे काढून नेत्रपेढीत जमा करणे आवश्यक असते. डोळ्याचे बुबुळ दोन ते चार तासांपूर्वी उन्हाळ्यात आणि चार ते सहा तासांपूर्वी हिवाळ्यात काढणे आवश्यक असते.

असे काढतात नेत्रपटल

नेत्रतज्ज्ञ डॉक्टर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांकडून नेत्रपटल काढण्यासाठी संमतीपत्र भरून घेतात किंवा मृत्यूपूर्वी भरून दिलेले संकल्पपत्र उपलब्ध करून घेतात. मृत व्यक्तींचे नेत्रपटल संपूर्ण निर्जंतूक केलेल्या उपकरणांच्या साहाय्याने १५ ते २० मिनिटांच्या अवधीत अलगद काढून घेतात. त्यानंतर विशिष्ट प्रकारच्या द्रावणात ठेवले जातात. नेत्रदान केलेले (बुबुळ) ४८ ते ७२ तासांच्या आत रोपण करणे आवश्यक असते. एका व्यक्तीच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. नेत्रपटल काढल्यावर रक्तस्त्राव होत नाही. मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणतीही विद्रुपता येत नाही. मृताच्या चेहऱ्यावर बॅन्डेज किंवा अन्यतऱ्हेने चेहरा झाकला जात नाही. लोकदर्शनासाठी चेहरा पूर्ववत राहतो. कोणतेही व्यंग्य दिसत नाही, अंत्यविधीला विलंबही होत नाही.

नेत्र ही अमूल्य राष्ट्रीय संपत्ती आहे. ती सत्कर्मी लावावी. अंधश्रद्धा, रुढी-परंपरेच्या वलयातून बाहेर पडायला हवे. अवयवरोपणासाठी आणि वैद्यकीय संशोधनासाठी मानवी मृतदेह अत्यंत उपयोगी आहे. नेत्रदानासह देहदान करणे हे मानवतावादी महान कार्य आहे. मरणोत्तर नेत्रदान ही काळाजी गरज आहे.

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे
नेत्रशल्य चिकित्सक
जिल्हा सामान्य रुग्णालय, नांदेड.

Previous articleउडा़न सपनों की.. व ब्रेन वॉशिंग प्रोग्राम अंतर्गत आयोजित हॉटेल बहार,पिकनिक पॉईंट, नाशिक एकदिवसीय महिलांसाठी पिकनिक संपन्न..!
Next articleरामनगर ते दहिवड बससेवा सुरू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here