Home नाशिक गोंदेगाव च्या हिरकणीने अथक परिश्रमाने केले पोलीस दलात भरतीचे स्वप्न पूर्ण—

गोंदेगाव च्या हिरकणीने अथक परिश्रमाने केले पोलीस दलात भरतीचे स्वप्न पूर्ण—

88
0

आशाताई बच्छाव

IMG-20230522-WA0029.jpg

गोंदेगाव च्या हिरकणीने अथक परिश्रमाने केले पोलीस दलात भरतीचे स्वप्न पूर्ण—

दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे

लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती! हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेली या काव्यपंक्तीची ज्योत घेऊन धावणाऱ्यांच्या जीवनात अंधकार येण्याची शक्यता कमी आहे. अश्रूंची फुले करण्याची ताकद या कवितेत सामावलेली आहे. ताकद, स्फूर्ती, आणि प्रेरणा काठोकाठ भरलेली ही कविता निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील एका हिरकणीने प्रेरक मानली अन त्या जोरावर मुंबई पोलीस दलात पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण केलं. चार महिन्यांच्या तान्ह्या मुलीला सासूच्या पदरी देऊन भरती होण्यासाठी जाणाऱ्या दीपाली पगार- गाडे या आधुनिक हिरकणीचे जिल्हाभरात कौतुक होत आहे. काल जाहीर झालेल्या मुंबई पोलीस अंतिम यादीत दिपालीची निवड झाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील बाबासाहेब पगार यांची कन्या असलेल्या दिपाली यांचा विवाह गोंदेगाव (ता.निफाड) येथील रावसाहेब गाडे यांचा मुलगा अमोल यांचेशी २०२० मध्ये विवाह झाला. विवाहापूर्वी विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेत असतांनाच दिपालीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणास सुरुवात केली होती. विवाह झाल्यास वर्दीच्या स्वप्नांचा चुराडा होणार नसेल तरच लग्न करेन या अटीवर दिपालीने विवाह केला. पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करण्याची ईच्छा दिपालीने अमोल यांना बोलून दाखविली. सुशिक्षित कुटुंब असलेल्या गाडे परिवाराने दिपालीच्या स्वप्नांच्या आड न येण्याचे ठरवले. त्यात दोघांच्या संसारात अन्वी या गोंडस मुलीचा जन्म झाला. एकीकडे बाळाचा लळा आणि दुसरीकडे खुणावणारी पोलीस वर्दी यांच्या द्वंद्वात असलेल्या दिपालीच्या पंखात अमोलने बळ भरले. खरा प्रश्न होता त्या चिमुकलीचा. अवघ्या चार महिन्यांच्या मुलीला सोडून दूर जायचे दिपालीचे मन होईना. तो प्रश्न सासू लता गाडे यांनी सोडविला. मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी सासू लता यांनी स्वीकारली अन दिपालीच्या स्वप्नंचा रस्ता मोकळा झाला. भरती पूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी दिपालीने थेट पुणे गाठले.
अंतःकरणात पाझर फोडणारी हिरकणी आणि दुसरीकडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारी तरुणी अशा दोन्ही आघाड्यांवर दिपाली झुंजत होती. शेतीवर अवलंबून असलेल्या गाडे कुटुंबाने तडजोड करत तर कधी मोलमजुरी करत दिपालीचा खर्च भागविला. या कष्टांची जाणीव ठेवून दीपालीने देखील मैदानी कसरत आणि लेखी परीक्षेचा जोरदार सराव केला. मुंबई पोलीस भरतीमध्ये जीवाचे रान करत तिने झोकून दिले. जिद्द, चिकाटी, सरावात सातत्य असेल तर यश देखील चरणी लोटांगण घेते, याची प्रचिती दिपालीला आली. दि.१७ लागलेल्या निकालात मुंबई पोलीस दलात निवड झाल्याचे कळता मात्र तिचे आनंदाश्रू थांबता थांबेना. वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तान्हुल्यापासून दूर गेलेल्या तिच्या अंतःकरणातील मातेस रडू आवरत नसल्याचे चित्र बघायला मिळाले. दिपाली पगार – गाडे हिने मिळविलेल्या यशामुळे नाशिक जिल्ह्यात दिपालीचे कौतुक होत आहे.

Previous articleदैनिक युवा मराठा चे रामभाऊ आवारे यांना गोदा युवा सामाजिक पुरस्कार जाहीर–
Next articleकांद्याला किमान १८०० रुपये हमीभाव द्यावा-कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here