Home नांदेड नांदेडच्या विकासाला अत्यावश्यक असलेल्या अंतर्गत रस्त्यांची सुधारणा युद्ध पातळीवर पूर्ण करू –...

नांदेडच्या विकासाला अत्यावश्यक असलेल्या अंतर्गत रस्त्यांची सुधारणा युद्ध पातळीवर पूर्ण करू – पालकमंत्री अशोक चव्हाण

57
0

राजेंद्र पाटील राऊत

नांदेडच्या विकासाला अत्यावश्यक असलेल्या अंतर्गत रस्त्यांची सुधारणा युद्ध पातळीवर पूर्ण करू – पालकमंत्री अशोक चव्हाण

सुरक्षिततेच्या दृष्टिने शहरात सीसीट‍िव्ही कॅमेरे
• कायदा व सुव्यवस्थेसाठी लवकरच दिसेल बदल
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड  :- नांदेडच्या विकासात भविष्यातील गरजांचा अंतर्भाव करून ज्या काही अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करता येतील त्यावर मी भर देत आलेलो आहे. हे शहर वाढत आहे. शहराच्या गरजाही वाढत आहेत. याचा ताण केवळ पाणी पुरवठा व इतर सुविधेपुरता मर्यादीत राहत नाही तर रस्ते विकासापासून याचे नियोजन करावे लागते. भविष्यातील लोकसंख्या, वाहनांची संख्या लक्षात घेता नांदेड महानगराला चांगल्या रस्त्यांच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आपण महानगरातील पाच मार्गांच्या विकासाचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. त्याचा आज शुभारंभ करतांना मला मनस्वी आनंद होत असल्याच्या भावना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

नांदेड महानगरातील डीआयजी कार्यालय ते पश्चिम वळण रस्ता, वर्कशॉप कॉर्नर ते अण्णाभाऊ साठे चौक, महाराणा प्रताप चौक ते हिंगोली गेट, बजाज फंक्शन ते नागार्जूना हॉटेल पर्यंत सिमेंट कॉक्रिटीकरण रस्ता, नाली बांधकाम, रस्ता दुभाजकासह संगम स्थळांची सुधारणा कामांचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्त भक्ती लॉन्स येथे आयोजित विशेष समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, महापौर जयश्रीताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, मुख्य अभियंता बसवराज पांढरे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

नांदेड येथील पायाभूत विकासाच्या बळावर या ठिकाणी आता विविध क्षेत्र विकसित होत आहेत. विकासाशी कटिबद्ध होऊन मी आजवर जे काही बोललो त्या सेवा-सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध करुन दिल्या आहेत. या महानगराला चांगल्या रस्त्याच्या सुविधा असाव्यात, असे मी वर्षभरापूर्वी जाहिर केले होते. त्याची पूर्ती आज शुभारंभा पासून झाली आहे. रस्ते विकासाच्या या कामामुळे काही महिने नांदेडकरांना गैरसोय सहन करावी लागणार असून नागरिक योग्य ते सहकार्य करतील याची मला खात्री आहे. दोन्ही बाजुने रस्ते काढून न टाकता एका बाजुने रस्ता पूर्ण करून तो वाहतुकीस खुला करून दिल्यानंतर दुसऱ्या बाजुचा रस्ता पूर्ण करण्यात येईल. याचबरोबर भविष्यातील 15 ते 20 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन हा रस्ता गॅस पाईप लाईन, पाणी आदी बाबींसाठी खोदण्याचे काम पडणार नाही यादृष्टिने नियोजनबद्ध पद्धतीने विकसित केला जात असल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

नांदेडच्या विकास कामात मध्यंतरी खंड पडला होता. तो खंड भरून काढण्यासाठी वेगाने काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. योगा-योगाने महाराष्ट्र शासनाने नांदेडच्या विकास कामांना कुठेही आखडता हात न घेता ज्या योजना घेतल्या त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधित विभागांनी मंजुरी देऊन मोठे सहकार्य केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक चोख करण्याच्या दृष्टिने लक्ष घातले आहे. काही दिवसात याचा प्रत्यय येईल. पूर्ण नांदेड शहरात सीसीटीव्ही कॅमेरे प्राधान्याने बसवू. शहराच्या प्रत्येक सिमेवर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

नांदेड शहराच्या विकासात नांदेड उत्तर वळण रस्ता व मालेगाव पर्यंतचा रस्ता हा आवश्यक असून त्यादृष्टिनेही लवकरच हे काम मंजूर होईल, असा विश्वास आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला. नांदेडच्या विकासाला आवश्यक असणारा निधी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अक्षरश: खेचून आणला आहे. नांदेडच्या विकासात यामुळे आता कमतरता पडणार नसल्याची आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी सांगितले. जवळपास 1 हजार कोटी रुपयांपर्यंतची विकास कामे नांदेड जिल्ह्यात आणली असून विकासाची खरी परिभाषा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्ययास दिल्याचे आमदार अमर राजूरकर यांनी सांगितले.

विकास निधी आजच्या आव्हानात्मक काळात खेचून आणणे तेवढे सोपे नाही. जिल्ह्यातील समतोल विकासाचा दृष्टिकोण ठेवून पालकमंत्री या नात्याने अशोक चव्हाण यांनी एक मोठी भूमिका आणि कर्तव्य निभावलेले आहे. जिल्ह्यातील महामार्ग आता चांगले होत आहेत. ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांपासून ते समृद्धी महामार्गापर्यंत विकासाची झेप आपण अनुभवत असल्याचे माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी नमूद केले. याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विकसित करण्यात आलेल्या गुणवत्ता तपासणी वाहनाचे त्यांनी कौतूक केले. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी मार्गदर्शन केले.

फिरत्या प्रयोग शाळा वाहनाचे
ना. अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विविध विकास कामे हाती घेतली जातात. यात डांबरी रस्त्यांपासून सिमेंटचे रस्ते, पूल, इमारती आदी बांधकामांचा समावेश असतो. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे ही कामे होण्यासाठी दक्षता व गुण नियंत्रण विभाग नांदेड येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. तथापि असंख्य कामे ही दुर्गम भागात व मुख्यालयापासून दूर असल्याने अशा कामांची गुणवत्ता ही जागेवरच तपासता यावी यादृष्टीने एक गुणवत्ता तपासणी वाहन तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या. या सूचनेनुसार नांदेड विभागासाठी एक अद्ययावत गुणवत्ता तपासणी वाहन तयार करण्यात आले. तपासणीचे सर्व निकष शास्त्रोक्त दृष्ट्या परिपूर्ण व्हावेत यादृष्टीने आवश्यक ती सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्री या वाहनात बसविण्यात आली आहे. संबंधित तज्ञ हे आता प्रत्यक्ष फिल्डवर जावून कामांच्या गुणवत्तेवर नियंत्रण व दक्षता घेतील. या वाहनाचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleइंधन बचत ही काळाची गरज – प्राचार्य डॉ.एस.बी.अडकिने
Next articleउपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे मोफत आरोग्य मेळावा संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here