Home Breaking News !! संत कबीर — प्रज्ञावंत बुध्दीचा आविष्कार !!

!! संत कबीर — प्रज्ञावंत बुध्दीचा आविष्कार !!

144
0

राजेंद्र पाटील राऊत

!! संत कबीर — प्रज्ञावंत बुध्दीचा आविष्कार !!

संत कबीर…मध्ययुगातील संत सृष्टीचा प्रज्ञावंत आविष्कार. काशी या प्रसिध्द् ठिकाणी एका मुसलमान जोडप्यास समुद्राच्या काठावर एका पेटीत एक बालक सापडले तेच कबीरदास. हे जोडपे विणकामाचा व्यवसाय करत असे. मोठया मनाने या जोडप्याने कबीराचे लालनपालन केले आणि याच कबीरांच्या रुपाने मानवतेचा एक सच्चा पाईक समस्त भारतीयांच्या आदराचा विषय ठरला. कबीर मोठेपणी विणकामाचा व्यवसाय करु लागले.पण तो व्यवसाय फक्त त्यांच्या पोटापाण्याचा होता. या माणसाचा खरा व्यवसाय होता समाजाला साक्षर करणे.विशेष म्हणजे स्व्त: कबीर पुर्णपणे निरक्षर होते.त्यांच्या मुखातून निघालेल्या अमृतवाणीला त्यांच्या अनुयायांनी शब्दरुप दिले आणि कबीर हे नावं समस्त भारतीयांच्या ओठावर गौरवाने विराजमान झाले.कबीरांचे ग्रंथ साहित्य नेमके केती हा वादाचा विषय आहे.पण कबीराचा एक जरी दोहा उचलला तरीही तो काही ग्रंथांच्या तोडीचा होता याविषयी शंकाच नाही. कबीराचे वैयक्तिक जीवन अत्यंत साधे हाते. लोई नावाची त्यांची पत्नी आणि कमाल आणि कमाली ही दोन मुले हेच त्यांचा परिवार होता.आपल्या परिवाराच्या संगोपनासाठी चरख्यावर सुत कातणे आणि त्याची विक्री करुन जीवन चालवणे हाच व्यवहार होता.पण चरख्यावर सुत कातता कातता कबीरांनी मानवजातीच्या कल्याणाचे अखंड सुत कातले आणि अगदी निरपेक्ष भावनेने ते समाजात वाटून टाकले.या वाटणीने समाज अधिक शहाणा झाला.एका निरक्षर मनुष्याने समाजाला साक्षर करण्याचा हा व्यवसाय होता.याच निरक्षर मनुष्याला डॉ.बाबासाहेब आंबंडकर यांच्या सारखा प्रज्ञावंत मनुष्य आपला मार्गदर्शक मानतो यामध्येच कबीरांचे मोठेपण दिसून येते.
कबीर हा शब्द् उच्चारला की डोळयासमोर उभे राहतात ते कबीरांचे दोहे.एका निरक्षर मनुष्याने चरख्यावर सुत कातताना एकुणच समाजाच्या प्रबोधनाचे जे सुत कातले ते म्हणजे कबीरांचे दोहे.कबीरांची भाषा ही सरमिसळ असणारी भाषा आहे. यामध्ये पंजाबी आहे.राजस्थानी आहे,भोजपूरी आहे,अवधी आहे.निरनिराळृया भाषांची सरमिसळ होत कबीरांच्या कविता व दोहे पुर्ण होतात.भाषा कोणतीही असो,प्रत्येक कबीरांच्या वाणीचा उद्देश हा समाजाला जागे मरण्याचा होता आणि कबीरांचे दोहे वाचले की मनातील बरीच जळमटे निघूनही जातात. एका दोह्यात कबीर अशी रचना करतात की, “ बुरा देखनं मै चला बुरा मिला न कोई,जो मनं देखा अपना,मुझसे बुरा न कोई “. कबीरांचा हा एवढाच दोहा जरी मानवजातीने आपल्या आचरणात आणला तरीही मानवजातीचे काही मुख्य प्रश्न नक्कीच सुटतील.स्व्त:च्या मनाच्या कवाडयात झाकोळून न बघता आपण दुसऱ्याचे दोष मात्र सांगत सुटतो. हे दोष आपल्या अंगात देखील असतात, फक्त गरज असते ती आपल्या अंतरंगात डोकावण्याची.कबीरांनी कर्मकांड व शोषणावर कडाडुन हलला चढवलाय. “ जत्रा में फतरा बिठाया,तीरथ बना पाणी,दुनिया हुई दिवानी,पैसे की धुलधानी “ ह्या एका दोह्यात मुर्तीपुजा आणि तीर्थयात्रा यांच्या मध्ये अडकलेल्या समाजाला जागे करण्याचा कबीरांचा प्रयत्न आहे. दगडात ईश्वर शोधणारे आणि साध्या पाण्याला तीर्थ म्हणून पुजणारे वेडाचार करतात आणि संपत्ती गमावतात हा कबीर संदेश आहे. “ पत्थर पुजे भगवान मिले,तो मैं पुजू पहाड “ अशा साध्या पध्दतीने कबीर समाजप्रबोधन करतात.दगड पुजल्याने देव भेटणार असेल तर मी पहाडाचीच पुजा करतो .असे चपखल उदाहरण देणारे कबीर लोकांना सहजसोप्या ईश्वरभक्तीची महती सांगतात.
कबीर हे सर्वधर्मीय पुरोहितशाहीचे विरोधक आहेत. जेव्हा कबीर ईश्वरभक्तीचा मार्ग कर्मकांडविरहीत सांगतात तेव्हा साहजीकच पुरोहितशाहीचे पित्त खवळते.विशेष म्हणजे हिंदु पुजारी आणि मुस्लीम मौलवी दोघेही मिळून कबीरांचे विरोधक होतात.कबीरांचा उल्लेख हा हिंदु मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणून केला जातो. अशावेळी दोन्ही धर्माचे धर्मप्रमुख मात्र कबीरांना विरोध करतात याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.कबीरांच्या मुखात सतत ‘ रामनाम आहे.राम या व्यक्तीरेखेचा प्रभाव त्यांच्यावर आहेच परंतु हा राम सर्वधर्मीय मानवतेचा उपासक म्हणून त्यांना अपेक्षित आहे. हिंदु व मुस्लीम धर्मातील पुरोहितशाहीने कबीराच्या विरोधाचे प्रयत्न केले. मात्र कबीरांना हे जवळजवळ ठाऊकच होते.याचकरता कबीर एका दोह्यात थेट रस्त्यावर येऊन आवाहन करतात की, “ कबीर खडा बाजारमें,लिए कटोरा हाथ,जो घर फुंके अपना,चले हमारे साथ “.स्व्त:च्या घराला आग लावण्याची ज्यांची तयारी आहे अशांनी माझ्यासवे चालावे असे आवाहनच कबीर करतात.एवढे धाडस कबीरांच्यात आले तर कसे ? कबीरांचा स्वभाव हा बंडखोरीचा स्वभाव आहे.संघर्ष करण्याचा आहे.आणि महत्वाचे म्हणजे हा संघर्ष कशासाठी आणि कुणासाठी करायचा याचे पक्के भानं कबीरांना आहे. समाजातील सर्वसामान्य मनुष्याची होणारी पुरोहितशाहीकडून होणारी फसवणूक कबीर पहात आहेत.सर्वधर्मीय पुरोहितशाही यामध्ये सामिल होती.ही पुरोहितशाही सामान्यजणांचे घर अक्षरश: फुंकते.आणि सामान्यजणांना ही फसवणूक धर्माचा एक अविभाज्य भाग वाटते.कारण सामान्यांच्या नजरेत पुजारी अथवा मौलवी हे धर्माचे कार्य करतात असा एक समज दृढ आहे.खरेतर हा पूर्णपणे गैरसमज आहे.धर्माच्या नावाखाली ही मंडळी सामान्यांची करत असणारी फसवणूक कबीर उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत.सामान्यांच्या ह्या शोषणाला विरोध करत कबीर उभे आहेत. यामध्ये पुरोहितशाहीचे हितसंबंध धोक्यात येणार आणि सामान्यांचे घर फुंकणारे हे नराधम आपल्याला उभी आग लावतील याची पक्की धारणा कबीरांच्या मनात आहे.म्हणूनच “ जो घर फुंके अपना,वो चले हमारे साथ “ असे आवाहन कबीर करतात.कबीरांचा हा संदेश बहुजनसमाजाला नित्य् मार्गदर्शक असाच आहे.
भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून एक मोठी खोडं लागलेली आहे.एखाद्या विचारांची प्रस्तुतता पाहण्यापेक्षा त्या विचारांचा भाष्यकार कोण याची चर्चा अधिक असते.याहूनही अधिक चर्चा होते ती त्या विचार प्रवर्तकाचा धर्म कोणता याची.कबीर या खोडीला बळी पडलेत. कबीरांचा धर्म कोणता ? हा प्रश्न चर्चेत ठेवण्यात काही बहाद्दरांनी आपली अक्क्ल पाजळून ठेवलीय.सगळ्या शहाणपणाचा ठेका आमच्या जातीधर्मातच सामावलेला आहे असा अनाठायी गर्व भारतातील ब्राम्हण् समाजातील मोठया समुदायाचा आहे.कबीर ज्याअर्थी इतके प्रज्ञावंत आहेत त्याअर्थी ते ब्राम्हणच आहेत अशा कथा प्रसूत केल्या जातात.ही हरामखोरी आहे.कबीरांचे मुस्लीम असणे यामध्ये खटकण्यासारखे काही नाही.खरेतर तो काही अभिमानाचा अथवा गौरवाचा देखील भाग नाही. कबीरांसारखी माणसे ही कधीच एका धर्माची,जातीची,प्रांताची अथवा वंशाची प्रतिनिधी नसतातच मुळी. कबीर असतात समस्त मानवजातीचे उपासक.मानवधर्माचे भाष्यकार.माणुसकी हीच जात असते त्यांची आणि ते समस्त विश्वाचे नागरीक असतात.ज्यांना कुणाला जातधर्माची लेबले अशा विश्वव्यापी प्रज्ञावंताला लावावीशी वाटतात त्यांचा हेतू मुळीच स्वच्छ् नसतो.कारण संकुचित दृष्टीचे ते वाहक असतात.धर्माचा व्यापक अर्थ त्यांना मुळीच ठाऊक नसतो. धर्म ही मनुष्याची वैयक्तिक बाब असून ,तिचा सामाजीक व्यवहारपणाचा भाग हा नैतिकतेने बध्द् असेल तरच धर्म सामाजीक बाबतीत विश्वाचे कल्याण करतो.अन्यथा धर्म हा मोठा विध्वंसक बॉम्बअसतो. कबीरांना हे सत्य सोळाव्या शतकातच कळले हाते .म्हणून त्यांनी पुरोहितशाहीला उघडे पाडून मनुष्यधर्माची पालखी वाहण्याचा निर्णय घेतला.आणि खरे सांगायचे तर कबीरांशिवाय या गोष्टीला लायक असा मनुष्य त्या काळात तरी शोधावाच लागेल.याचे कारणच मुळी कबीरांचा निर्भयपणा आहे.कोणत्याही इतर धर्माची चिकीत्सा करण्यासाठी फारशी हिंमत लागत नसते. मात्र स्वधर्मातील दोष दाखवून ते दुरुस्त करण्याचा आग्रह धरणे सोपे काम नसते.हे देखील केव्हा ?तर अवतीभवती सारी मुस्लीम राज्यक्रत्यांची वहीवाट आहे.मुस्लीम हा धर्म नेहमीच परंपरेच्या बाबतीत कट्टरतावादी राहिलेला आहे. अशा एका बळकट क्षणी मुस्लीम पुरोहितशाहीला अंगावर घेणे ही साधी गोष्ट् नाहीच मुळी.कबीरांचे मोठेपण इथे शोधायला हवे.
कबीरांचे महानपण आणखी एका गोष्टीतुन कळुन येते. कबीर हे आपल्या स्विकृत विचारधारेशी कमालीचे प्रामाणिक राहिले.ज्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात आणि कर्मकांड व अंधश्रध्देच्या विरोधात त्यांनी आयुष्य्भर संघर्ष केला त्या घातक रचनेचे अंतरंग आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्येही त्यंनी उघडे करुन दाखवले.कबीर ज्या काशी नगरीत जन्माला आले होते ती नगरी भारतीय समाजात आणि विशेष करुन हिंदुधर्मात एका पवित्र नगरीचे स्थान कमवुन उभी आहे.काशीमध्ये येणारे मरण हे पुण्याचे समजले जाते.याउलट त्याच उत्त्तर प्रदेशातील मरगज हे ठिकाण मात्र कुप्रसिध्द् करुन टाकले आहे. अशी वदंता कबीरांच्या काळी होती की,मरगज य ठिकाणी येणारे मरण म्हणजे नरकात जायचा मार्ग आहे. कबीरांचा अशा अंधश्रध्दांवर विश्वास नव्हता.पण त्याही पुढे जाऊन कबीरांनी या अंधश्रध्देला उघडै पाडायचे ठरवले आणि आयुष्याच्या अखेरीला काशी सोडून कबीर मरगज या ठिकाणी आले.मरगज याच ठिकाणी कबीरांचे देहावसान झाले.ध्यानात घ्यावयाची गोष्ट् अशी की,सोळाव्य शतकातील कबीरांचे हे ‘ अंधश्रध्दामुक्त्त जगणे ‘ हे आजच्या पिढीला देखील शक्य होणे कठीण आहे.समस्त समाजाला शहाणं करण्याचा हा कबीरांचा व्यवसाय असाच अगदी आयुष्याच्या अखेरीपर्यंत सुरु होता.याचे कारणच मुळी कबीरांच्या जीवनदृष्टीत शोधायला हवे. “ कबीर खडा बाजारमे,लिए कटोरा हाथ,जो घर फुके अपना,वो जले हमारे साथ “ हे फक्त अन् फक्त कबीरच म्हणू शकतात.

!! उमेशसूर्यवंशी 9922784065 !!

(” दृष्टिकोन ” या आगामी पुस्तकातील लेख…विचारार्थ )

Previous articleकिरण शिंदे यांचा मिशन हिरवीगार डोंबिवली
Next articleविजयवाडी गावात लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान करून महिलांनी साजरी केली आगळी-वेगळी वटपौर्णिमा………..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here