राजेंद्र पाटील राऊत
वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक; पत्नीचा जागीच मृत्यू
अपघातात दुचाकीस्वार पती गंभीर जखमी
पंढरपूर : पंढरपूरच्या नवीन पुलावर चारचाकी वाहनाने एका दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला जोरात धडक दिल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. यात दुचाकीवर स्वार असलेल्यांपैकी पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. त्यामुळे अवैध वाळूचा उपसा व वाहतूक हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
चंद्रभागेच्या पैलतीरावरील ६५ एकर परिसरात पहाटे फिरण्यासाठी अनेकजण येतात. आज पहाटे जयश्री व प्रकाश बारले हे या परिसरात फिरण्यासाठी गेले होते. हे दोघे नंतर त्यांच्या दुचाकीवरून नवीन दगडी पुलावरून घराकडे जात होते. यावेळी अवैध वाळू वाहतूक करणारे विना नंबरचे वाहन जोराने आले आणि समोरून येणार्या पती-पत्नीच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत त्या अवजड वाहनाने पती-पत्नींना पन्नास ते साठ फूट घसरत नेले. यामध्ये जयश्री बारले यांचा जागीच मृत्यू झाला. पती प्रकाश बारले हे या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. धडक दिलेल्या चारचाकी वाहनात पाटी, खोऱ्या अशा गोष्टी दिसून आल्या. घटना घडल्यावर वाहन चालक फरार झाला.
नदी पात्रातील अवैध वाळूउपसा सुरू आहे. वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडून जुजबी कारवाई केली जाते. आजच्या घटनेवरून वाळूचोरी रोखण्यात प्रशासन अद्यापही अपयशी ठरल्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे. अशाप्रकारच्या घटनांना आळा बसावा अशी मागणी नागरिक करत आहेत. युवा मराठा न्युज नेटवर्क