• Home
  • अरुण लाड यांचा ४८ ,८२४ मतांनी दणदणीत विजय

अरुण लाड यांचा ४८ ,८२४ मतांनी दणदणीत विजय

 

महाराष्ट्रातील तीनही पदवीधर मतदारसंघात भाजपसाठी आजचा पराभव चटका लावणारा,
विधान परिषदेच्या लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव निश्चित केला. लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास लाड यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
प्रचारात चुरशीची वाटणारी निवडणूक प्रत्यक्षात एकतर्फी झाल्याचे निकालातून दिसून आले. उमेदवारांची मोठया प्रमाणात असलेली संख्या, मोठी मतपत्रिका यामुळे पुण्यातील मतमोजणीला विलंब झाला होता. चुरशीच्या निवडणुकीमुळे दुसऱ्या क्रमांकाची मते मोजावी लागतील, असे वाटत होते. मात्र लाड यांनी पहिल्या पसंतीच्या क्रमांकांवरच विजय संपादित केला. दुसऱ्या पसंतीच्य क्रमांकाची मते मोजायची वेळच आली नाही. त्यामुळे पहिल्यांदाच या मतदारसंघात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच लाड यांची आघाडी कायम होती.पहिल्या फेरीनंतर मतदानाचा कोटा एक लाख १३ हजार इतका निश्‍चित करण्यात आला होता. तो पहिल्या पसंतीच्या क्रमांकाच्या लाड यांनी गाठला.
मराठवाड्यात सतिश चव्हाण सहज विजयी….
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी झाले आहेत. चव्हाण यांनी सलग पाचव्या फेरीत आपली आघाडी कायम राखत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा तब्बल 57 हजार 895 मतांनी धुव्वा उडवला.
चव्हाण यांना 1 लाख 16 हजार 638 मिळाली. भाजपचे शिरीश बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. एकूण दोन लाख 41 हजार 908 इतके ाझाले. त्यापैकी 23992 मते अवैध ठरली. भाजपचे बंडखोर रमेश पोकळे यांना 6712, सिद्धेश्वर मुंडे यांना 8053 मते मिळाली.
गेल्या निवडणुकीतील ३८ टक्यांवरून यावेळी मतदानाचे प्रमाण थेट ६४.५३ टक्यांवर पोहचल्याने निकाल काय लागणार याची उत्सूकता शिगेला पोहचली होती. परंतु पोस्टल मतांपासून सुरू झालेली सतिश चव्हाण यांची आघाडी सर्व फेऱ्यांत कायम ठेवली. त्यामुळे चुरशीची वाढणारी मराठवाडा पदवीधरची निवडणूक एकतर्फी झाली.
भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने आपली शक्तीपणाला लावत मराठवाडा पदवीधरची जागा तिसऱ्यांदा मिळवण्याच्या दृष्टीने दमदार पावले टाकली आहेत.
भाजपला पंकजा मुंडे समर्थक रमेश पोकळे यांची बंडखोरी, १६ हजारांहून अधिक बाद झालेली मते याचा फटका बसला असून आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे प्रा. सचिन ढवळे आणि बीडमधील अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे यांनी घेतलेल्या हजारोंच्या मतांनी देखील भाजपला बॅकफुटवर टाकले. बोराळकर हे दुसऱ्या क्रमांकावर असले तरी सतीश चव्हाण यांच्या मताधिक्यांपेक्षा निम्मी मते देखील त्यांच्या वाट्याला आलेली नाहीत.
दरम्यान, सतीश चव्हाण यांची वाढती आघाडी पाहता मतमोजणी केंद्रातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतल्याचे दिसून आले आहे. बोराळकर यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. ती मतपेटीतून व्यक्त होतांना दिसते आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा पदवीधर तसेच नागपूरची जागा प्रतिष्ठेची केली होती. पण त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या आघाडीवरून स्पष्ट झाले आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment