Home Breaking News बांधावर जाऊन दिला शेतकऱ्यांना आश्वासन – वेळ प्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना...

बांधावर जाऊन दिला शेतकऱ्यांना आश्वासन – वेळ प्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू ; विजय वडेट्टीवार

110
0

बांधावर जाऊन दिला शेतकऱ्यांना आश्वासन – वेळ प्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू ; विजय वडेट्टीवार

नांदेड,दि.१८ ; राजेश एन भांगे

अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झाले असून आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा अतिवृष्टी झाली त्याचेही पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून यासाठी वेळ प्रसंगी ड्रोनचाही वापर करण्यास सांगितले आहे. लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांना मदत करू असे आश्वासक उद्गार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले.
अतिवृष्टीमुळे कृषी क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने त्यांनी आज नांदेड येथे शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन त्यांनी आढावा घेतला.

या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी लितफ पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे वर्षे नैसर्गिक आपत्तीचे वर्षे असेल दुर्देवाने म्हणावे लागत आहे. कोकणापासून ते विदर्भापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील काही भाग वगळला तर शेतकऱ्यांना खूप काही सहन करावे लागले आहे. कोकणातील चक्रीवादळामुळे सर्वप्रथम तिथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने सातशे कोटी रुपयांची मदत उभी केली. त्याखालोखाल आताचे हे नुकसान लक्षात घेता आम्ही केंद्र सरकारला मदत करण्याची विनंती केली आहे. त्याबाबत त्यांना लेखीही कळविले आहे. आम्ही आमच्या पातळीवर शेतकऱ्यांसाठी मदतीला तत्पर असून वेळप्रसंगी कर्ज काढायची वेळ जरी आली तरी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाचे सर्व मंत्री आज त्या-त्या जिल्ह्यातील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसमवेत मदतीसाठी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांच्यासमोर ठेवला. शेतीसमवेत नांदेड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागातील रस्ते व लहान पूल वाहून गेल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टिने त्याच्या दुरुस्तीचेही नियोजन आवश्यक असून त्याबाबत स्वतंत्र आर्थिक मदत केली जावी असे आमदार अमर राजूरकर यांनी सांगितले. राज्य शासनाने सर्व शक्तीनिशी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना सहकार्य करण्याची मागणी आमदार मोहन हंबर्डे यांनी केली. जिल्ह्यातील सर्वात जास्त फटका सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून ज्वारी व इतर पिकेही हातची गेले असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. बैठकीनंतर त्यांनी नांदेड तालुक्यातील तुप्पा, मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील शेतकऱ्यांशी त्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला.

दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी रात्री येथील विश्रामगृहात मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी विभाग प्रमुखांना भेटून जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला. दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी याबाबत पुन्हा बैठक घेऊन लोकप्रतिनिधींशी व प्रशासनाशी चर्चा करुन त्यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत उर्वरीत पंचनामे व मदतीसाठी अत्यावश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Previous articleमुखेड तालुक्यातील शेतकरी परतीच्या पावसाने पुन्हा संकटात !
Next articleमुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अँड सुनील पौंळकर, सचिव संतोष बेळगे तर कोषाध्यक्ष नामदेव यलकटवार यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here