पालघर,(अनिकेत शिंदे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक कर्मचार्यांसाठी विशेष गाड्या सोडताना 1 जुलैपासूनच्या वेळापत्रकात डहाणू ते विरारसाठी सकाळी 4.50 वाजता सोडण्यात येणारी मेमू बंद करीत 5 वाजताची लोकल सुरू केल्याने पालघर, बोयसर, डहाणूवरून मुंबईतील केईएम, नायर आदी रूग्णालयातील परिचारिकांचे सकाळी 7 वाजताच्या पहील्या ड्युटीचे मस्टर मिस होत होते. यासंदर्भात वृत्तपत्रात बातम्या आल्याने शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिल्याने पश्चिम रेल्वेने सकाळी 4.50 वाजताची ‘मेमू पुन्हा एकदा सुरू केली आहे.
लॉकडाऊनपूर्वी सौराष्ट्र एक्स्प्रेसने डहाणूवासीय प्रवास करायचे, त्यानंतर डहाणूवरून सकाळी 4.50 वाजता सुटणारी ‘मेमू’ अचानक बंद करून पश्चिम रेल्वेने लोकल ट्रेन सुरू केली. आता पश्चिम रेल्वेने ‘मेमू’ पुन्हा सुरू केल्याने बोरीवलीपर्यंत जाणार्या निमवैद्यकीय कर्मचार्यांचा फायदा झाला आहे.