• Home
  • चीनमध्ये पुन्हा आढळू लागले कोरोनाचे रुग्ण

चीनमध्ये पुन्हा आढळू लागले कोरोनाचे रुग्ण

🛑 चीनमध्ये पुन्हा आढळू लागले कोरोनाचे रुग्ण 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

( बीजिंगमध्ये संसर्ग; साथीने पुन्हा डोके वर काढले, नवे सहा रुग्ण आढळल्याने काही भागांत केले लॉकडाऊन )

बीजिंग :⭕ कोरोना साथीवर विजय मिळविल्याचे चीनचे दावे फोल असल्याचे दिसून येत आहे. बीजिंगमध्ये कोरोनाचे सहा नवे रुग्ण आढळले असून त्यामुळे तेथील काही भागांत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
या घटनेमुळे चीनमध्ये कोरोनाच्या साथीने पुन्हा डोके वर काढल्याचे सांगितले जात आहे. बीजिंगमधील फेंगताई जिल्ह्यातील ११ वसाहतींमधील लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. या वसाहतीजवळच मटण मार्केट आहे. तिथून कोरोनाच्या विषाणूचा माणसांना संसर्ग झाल्याची चर्चा आहे.
गेल्या दोन महिन्यांत बीजिंगमध्ये प्रथमच कोरोनाचा रुग्ण गुरुवारी आढळून आला होता. तो गेल्या आठवड्यात शीनफादी येथील मटण मार्केटमध्ये जाऊन आला होता. ही व्यक्ती गेल्या काही महिन्यांत बीजिंग शहराबाहेर गेलेली नाही.
चीनमधील वुहान शहरातून कोरोना विषाणूच्या संसर्गास सुरूवात झाली व नंतर ही साथ अनेक देशांत पसरली. जगभरात ७७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून ४ लाखांहून जास्त लोकांचा बळी गेला आहे. चीनने वुहानच्या प्रयोगशाळेत कोरोनाचा विषाणू बनविला असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. त्यावरून चीन व अमेरिकेमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली होती. चीनने मात्र याबाबत स्पष्टीकरण दिले होते की, कोरोनाच्या संकटातून मुक्त झाल्यानंतर हा विषाणू नेमका कुठे आढळला आणि कसा निर्माण झाला, याची चौकशी करता येईल. तसेच ज्या शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्याबाबतही सविस्तर माहिती घेऊन अहवाल सादर केला जाईल. सध्या कोरोनाच्या संकट काळात रुग्ण बरे करण्याला प्राधान्य असल्याचे म्हटले होते. (वृत्तसंस्था)
सामूहिक चाचणी सुरू

वुहानमध्ये कोरोनाची साथ पसरल्यानंतर चीनमधील अनेक प्रांतातही त्याची लागण झाली होती. मात्र त्या देशाने अतिशय कडक निर्बंध लादून ही साथ आटोक्यात आणल्याचा दावा केला होता. मात्र बीजिंगमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याने आता चित्र पालटले आहे. स्थानिक नागरिकांमधूनच या विषाणूची बीजिंगमध्ये लागण झाल्याने प्रशासन हादरले आहे. बीजिंगच्या संसर्गग्रस्त भागातील नागरिकांची सामूहिक चाचणी केली जात आहे…⭕

anews Banner

Leave A Comment