• Home
  • निसर्ग’ चक्रिवादळ आज धडकणार; मुंबईपासून अवघ्या २०० कि.मी. अंतरावर

निसर्ग’ चक्रिवादळ आज धडकणार; मुंबईपासून अवघ्या २०० कि.मी. अंतरावर

🛑 ‘निसर्ग’ चक्रिवादळ आज धडकणार; मुंबईपासून अवघ्या २०० कि.मी. अंतरावर 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 3 जून : ⭕मुंबईवर आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळी निसर्ग चक्रिवादळ धडकणार आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झालं. दरम्यान, बुधवार सकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार असून किनारपट्टीला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसात पूर्वमध्य व लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले. मंगळवारी सायंकाळी ते मुंबईपासून ३५० किमी तर अलिबागपासून ३०० किमी आणि गोव्यापासून २८० किमीवर होते. आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत मुंबईला धडकणार आहे. मुंबईवर जेव्हा वादळ धडकेल तेव्हा ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळ मुंबईच्या दिशेने वेगाने सरकत असून पहाटे पाच वाजताच्या स्थितीनुसार मुंबईपासून २०० तर अलिबागपासून १०० किलोमीटर अंतरावर हे वादळ आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना होणार आहे. त्याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागही या वादळाच्या पट्ट्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, सुरत तसंच दमण, दादरा नगर हवेली भागालाही निसर्ग वादळाचा फटका बसू शकतो. या संपूर्ण भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळासोबतच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईत पूरस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल सज्ज झाली आहेत.

निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील गावातील कच्च्या घरांत राहणाऱ्या नागरिकांना मंगळवारी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. महाराष्ट्राला चक्रीवादळाचा फारसा अनुभव नसल्याने चक्रीवादळ आलं तर काय करायला हवं, काय तयारी हवी, त्याची तीव्रता किती असेल या सगळ्याबद्दल नागरिकांमध्ये गोंधळाचं आणि अनभिज्ञतेचं वातावरण आहे.

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचसोबत पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार येथेही पाऊस पडेल. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे या ठिकाणी बुधवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पाऊसही पडला. चक्रीवादळामुळे लाटा नेहमीच्या उंचीपेक्षा एक ते दोन मीटर अधिक उंच उसळणार आहेत. बुधवारी सकाळी १० आणि रात्री दहाच्या सुमारास अनुक्रमे ४.२६ आणि ४.०६ मीटर उंचीच्या लाटा मुंबईमध्ये उसळण्याची शक्यता आहे. तर ४ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास ४.५६ मीटर इतकी लाटांची उंची असेल.⭕

anews Banner

Leave A Comment