पंढरपूर तालुक्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित
सोलापूर विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता सातवर पोहोचली आहे. करकंब येथील 39 व्यक्तींचे स्वॉब घेण्यात आले होते. त्यापैकी 38 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पंढरपूर शहरातील आता केवळ तीन व्यक्तींचे रिपोर्ट प्रलंबित आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पंढरपूर शहर आणि तालुक्यातील ऊपरी येथील प्रत्येकी दोन तर तालुक्यातील करकंब आणि गोपाळपुर येथील प्रत्येकी एक अशा सहा जणांचे रिपोर्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आले होते. पुण्याहून करकंबला आलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील अन्य 39 व्यक्तींचे स्वॉब घेण्यात आले होते.
त्याचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 39 पैकी 38 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील करकंब या महत्त्वाच्या गावातील रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे. तर पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता एकूण सात वर पोहोचला आहे.
दरम्यान पंढरपूर शहरातील नवीन बसस्थानकासमोरील ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसरातील दोन व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आल्यामुळे शहरातील सावरकर पुतळा ते शिवाजी चौक शिवाजी चौक ते अर्बन बँक अर्बन बँक ते नवीन बस स्थानक हा सर्व भाग सील करण्यात आला आहे. वाखरी येथील एमआयटीमधील कोव्हीड सेंटरमध्ये 59 व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
३१ व्यक्तींवर गुन्हे
परराज्यातून आणि परजिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात कालपर्यंत 46639 लोक सोलापूर जिल्ह्यात आले आहेत. या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जाते. ठरवून दिलेल्या या काळात या व्यक्ती इतरत्र फिरताना दिसून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. आत्तापर्यंत सोलापूर जिल्ह्यात अशा 31 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंढरपूर तालुका पोलीस ठाणे आणि पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका व्यक्तीवर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.