आशाताई बच्छाव
शहीद जवानाच्या कुटुंबाला १ कोटींची मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर – जम्मू-काश्मीरमध्ये देशासाठी शहीद झालेल्या तमलूर (ता. देगलूर) येथील जवान सचिन वणजे यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे १ कोटी रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
उपमुख्यमंत्री पवार यांनी आज देगलूर येथे शहीद जवानाच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर चव्हाणवाडी येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी ही मदत जाहीर केली.
“महाराष्ट्रातील कोणताही जवान देशासाठी शहीद झाल्यास, त्यांच्या कुटुंबाला राज्य शासनाकडून १ कोटी रुपयांची मदत दिली जाते. हे सहाय्य निश्चितच सचिन वणजे यांच्या कुटुंबालाही देण्यात येणार आहे,” असे ते म्हणाले.
यासोबतच त्यांनी सांगितले की, “माता रमाई घरकुल योजनेअंतर्गत वणजे कुटुंबाला घर देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. तसेच, शहीद जवानाच्या पत्नीला शासनाच्या धोरणानुसार नोकरी मिळावी यासाठी पाठपुरावा केला जाईल. फॅमिली पेन्शनची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.”
“देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांची जबाबदारी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असेही भावनिक उद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या भेटीवेळी अनेक स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व शहीद जवानाचे कुटुंबीय उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे कुटुंबीयांना मानसिक आधार व आश्वस्तता लाभली आहे.