Home भंडारा पैसे परत द्या अन्यथा ट्रॅक्टर द्या ; २०० च्या वर शेतकरी धडकले...

पैसे परत द्या अन्यथा ट्रॅक्टर द्या ; २०० च्या वर शेतकरी धडकले कंपनीवर

157

आशाताई बच्छाव

1000488330.jpg

पैसे परत द्या अन्यथा ट्रॅक्टर द्या ; २०० च्या वर शेतकरी धडकले कंपनीवर

तुमसर तालुक्यातील चिचोली येथील संतापजनक प्रकार • साकोलीसह जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांची १२ कोटी रुपयांची गुंतवणूक

संजीव भांबोरे
भंडारा,,( जिल्हा प्रतिनिधी)आदिवासींना सब्सिडी नावावर ट्रॅक्टर देण्यासाठी प्रत्येक आदिवासींकडून १ लाख ३० हजार व ओबीसींतर्फे ४ लाख घेतल्या गेले. परंतु अवधित ट्रॅक्टर मिळाले नाही व टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येताच जिल्ह्यातील २०० च्या वर आदिवासी व ओबीसी शेतकऱ्यांनी तुमसर जवळील चिचोली स्थित “जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड लेंडेझरी” या कंपनीवर शुक्रवार २१ जूनला धडक देत “आम्हाला आमचे भरलेले पैसे परत द्या अन्यथा ट्रॅक्टर द्या” अशी मागणी घेऊन धडक दिली. या संतापजनक प्रकारावर पुन्हा एकदा “सब्सिडी नावाखाली ट्रॅक्टर” वाटपात काय आहे नेमका खेळ हा संशयास्पद प्रश्न आता शेतकऱ्यांच्या तोंडावर असून याची सविस्तर चौकशी करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
आदिवासी शेतकऱ्यांना ९०% टक्के सब्सिडीवर व ओबीसींना ३ लाख ५० हजार भरून ट्रॅक्टरचा लाभ घ्या अशी “आदिवासी सर्वांगिण विकास फंड” अंतर्गत ही योजना असल्याचे या कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी एम. ए. नैताम यांचे म्हणणे आहे. येथे साकोली, तुमसर, भंडारा, मोहाडीसह नागपूर जिल्ह्यातील एकुण आदिवासी व ओबीसी ६४७ शेतकऱ्यांनी १ लाख ३० हजार व वाहन नोंदणीचे २२ हजार ७०० आणि २५ ओबीसी शेतकऱ्यांचे ४ लाख असे पैसे शेतकऱ्यांनी या कंपनीत सप्टेंबर २०२३ ला भरले आहेत. यात बहुतांश शेतकऱ्यांनी १ लाख ७१ हजार भरले आणि त्यांना पावती मात्र १ लाख ३० हजारांची का दिली.? असाही आरोप शेतकऱ्यांनी येथे केला. यावर काही शेतकऱ्यांनी आमचे पैसे परत द्या करीता येथे अर्जही सादर केला पण दिड दोन महिने लोटूनही यांचे पैसे परत नाही आणि ट्रॅक्टर सुद्धा दिला नाही. शुक्रवारी चिचोली स्थित या कंपनीचे कार्यालयावर सुमारे २०० वर शेतकऱ्यांनी धडक दिली. दिवसभर चाललेल्या या गदारोळात ज्यांना पैसे परत हवे अश्यांनी आपले नाव व दिलेली रक्कम कंपनीला सादर केली. सदर जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. ए. नैताम यांनी सांगितले की नुकतेच आचारसंहिता असल्याने विलंब झाला पण लवकरच ट्रॅक्टर वितरण केले जाईल. पण हेच उत्तर नेहमीचे आणि सहा महिन्यांपासून देत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी या कंपनीला लेखी स्वरूपात दोन महिन्यांत एक तर पैसे परत द्या अन्यथा ट्रॅक्टर द्या असा अल्टीमेटम देत लिहून घेतलेले आहे. यावेळी या शेतकऱ्यांसह या क्षेत्रातीलच व राष्ट्रवादी काँग्रेस ( शप ) भंडारा जिल्हा अध्यक्ष किरण अतकरी, भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. हरेंद्र रहांगडाले आणि सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
या दोनशे जवळपास शेतकऱ्यांमध्ये साकोली, तुमसर, भंडारा, मोहाडी, सडक अर्जूनी ( गोंदिया ), तांडा, चिखली, मोटगाव, देवलापार, रोंघा, बरघाट, शिरपूर, देवलगाव, लंजेरा, हीरापूर, नवेगाव सह नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील असंख्य शेतकऱ्यांनी “ट्रॅक्टर देत नसतील तर आमचे पैसे दोन महिन्यांत परत करा” या मागणीसाठी दिवसभर चिचोली येथील कार्यालयात ठाण मांडून बसलेले होते.

 

आदिवासींच्या विकासासाठी आणि शेतकरी यांना शेतीविषयक वाहन देण्याची ही योजना आहे. मागे आचारसंहिता लागू असल्याने विलंब झाला, ज्यांना पैसे परत पाहिजे त्यांनी कागदावर आपली नावे लिहून द्या, त्यांना चेक देण्यात येईल व ज्यांना ट्रॅक्टर पाहिजे त्यांनी दोन महिने थांबा, पोलीसात एफ आय आर दाखल करून बाकीच्या आदिवासींचे नुकसान करू नये व आदिवासी बांधवांनी संयम बाळगावा”
— एम. ए. नैताम
“मुख्य कार्यकारी अधिकारी”
जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड लेंडेझरी – कार्यालय चिचोली ( तुमसर )