राजेंद्र पाटील राऊत
ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज कापणे बंद करा
आमदार डॉक्टर देवरावजी होळी
विज कापणे बंद न केल्यास प्रशासनाला भोगावे लागणार गंभीर परिणाम
मार्च २०२१ पर्यंत शासन भरत असलेल्या पथदिव्यांची वीज एप्रिल २०२१ पासून ग्रामपंचायतींनी भरावे असे शासनाचे आदेश
या आदेशाच्या निषेधार्थ प्रत्येक ग्रामंचायतीमधील सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावागावात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करावे असे आवाहन
सदर आदेश तातडीने रद्द करण्याची केली मागणी
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
राज्यात सत्तेत आलेल्या महा विकास आघाडी सरकारने पथदिव्यांची वीज बिल न भरलेल्या ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज खंडित करण्याचे काम सुरू केले असून ग्रामपंचायतींना अंधारात टाकणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करीत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पथदिव्यांची वीज कापण्याचे काम बंद करावे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
राज्य सरकारच्या या आदेशाच्या निषेधार्थ प्रत्येक ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तथा गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावागावात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन सुरु करावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी ग्रामपंचायतींना केले आहे
गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम नक्षलग्रस्त असून या जिल्ह्यामध्ये असामाजिक तत्त्वांची अगोदरच दहशत आहे. त्यातच ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज कापणे म्हणजे या शक्तींना बळ देण्यासारखे आहे. त्यामुळे गडचिरोली सारख्या दुर्गम नक्षलग्रस्त जिल्ह्याला यातून सूट देणे अत्यंत आवश्यक आहे. राज्य सरकार यापूर्वी मार्च २०२१ पर्यंत ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज बिलाची रक्कम स्वतः भरत होती परंतु आता एप्रिल २०२१ पासून पथ दिव्यांचे वीज बिल ग्रामपंचायतींनी भरावे असे निर्देश देणारे पत्र ग्रामपंचायतींना दिले आहे. ग्रामपंचायतींकडे सदर वीज बिल भरणा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसून ग्रामपंचायतींचे उत्पन्न अत्यंत कमी आहे. त्यामुळे कोणत्याही ग्रामपंचायतीला या पथदिव्यांची वीज बिल भरणे शक्य नाही. वीज बिल भरत नसल्यामुळे महावितरण कंपनी द्वारा या गावातील वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू केले असून अनेक ग्रामपंचायतींना अंधारात टाकले आहे .त्यामुळे असामाजिक तत्वांना या अंधाराचा फायदा घेऊन अनुचित घटना घडण्यासाठी मोठी लाभ मिळणार आहे. करिता शासनाने गडचिरोलीसारख्या दुर्गम क्षेत्राला यातून वगळावे व गडचिरोली जिल्ह्यातील पथ दिव्यांचे वीज बिल शासनाने स्वतः भरावे . तसेच वीज कापलेल्या ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे