Home सामाजिक नि:स्वार्थ प्रेम

नि:स्वार्थ प्रेम

394
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240206_174948.jpg

नि:स्वार्थ प्रेम

विधी आणि अमोल एकाच गावात राहणारे.त्यांची घरेही जवळजवळ होती.विधीने नुकतेच बारावी पास
केले होते.अठरा-एकोणवीस वर्षे वय तिचं.अमोलने त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते.विधी आणि अमोल एकमेकांवर प्रेम करायचे.ही बाब त्यांना दोघांना सोडून कुणालाच माहित नव्हती.अमोलच्या घरची परिस्थिती फारच बेताची होती.त्याच्या बाबांनी आपल्या तुटपुंज्या पगारात अमोल आणि त्याच्या बहिणीला शिकवले होते.हाती पैसा काहीच नव्हता.अमोल अजूनही बेरोजगार होता.त्याला पुढे शिक्षण घेऊन लेक्चरर व्हायचे होते.विधीचे वडील सारखे आजारी असायचे.त्यामुळे त्यांनी विधीचे लग्न लवकर लावून देण्याचे ठरवले.त्यांना रिटायर होऊन तीन वर्षे झाली होती.कारकून म्हणून सरकारी नोकरीत असताना त्यांनी एक मजली घर दुमजली केलं होतं.थोडाफार पैसा त्यांनी विधीच्या लग्नासाठी जमवला होता.त्यांना मिळणा-या सरकारी पेंशनवर त्यांचा उदरनिर्वाह होत असे.अमोल मात्र घरच्या हलाखीच्या परिस्थितीत काहीच करू शकत नव्हता.त्याने स्काॅलरशिप मिळवली होती आणि आता तो पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करणार होता.त्यानंतर बीएड,नेटसेट परिक्षा त्याला द्यायची होती.
एके दिवशी विधीला पहायला पाहुणे आले.मुलगा चांगला शिकला आणि चांगल्या पगाराच्या खाजगी नोकरीत असल्याने विधीच्या बाबांनी तिचे लग्न त्या मुलाशी म्हणजे राहुल सोबत लावून दिले.विधीलाही होकार देण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.आता विधी लग्न करून शहरात आली होती.तिच्या सासरी सासू,सासरे आणि त्यांचा एकुलता एक मुलगा राहुल होता.विधीला पूर्वीपासूनच शिक्षिका व्हायचे होते.पण लग्न लवकर झाल्यामुळे ती तिचे स्वप्न पूर्ण करू शकली नाही.हळूहळू दिवस सरकत गेले आणि लग्नाला सहा महिने झाले.एके दिवशी तिने आपली इच्छा नव-याला बोलून दाखवली.ती राहुलला म्हणाली,”मला पुढे शिकायचे आहे.लग्नामुळे माझे शिक्षण अपूर्ण राहिले.”यावर राहुल म्हणाला,”हे बघ,माझे
आई- वडील घरात एकटेच असतात.त्यांची काळजी तू घ्यावीस असे मला वाटते.मला वाटतं तू घरीच असावं आणि आईला तिच्या कामात मदत करावी.”राहुलचे बोलणे ऐकून विधी खिन्न मनाने तेथून निघून गेली.आता लग्नाला पाच वर्षे झाली होती.राहुल आणि विधीच्या संसारवेलीवर दोन गोंडस मुले जन्मली.विधी आताही शिक्षण घेण्यासाठी राहुलच्या मागे लागायची.पण राहुल तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा.त्यांचा संसार सुखाचा चालला होता.अचानक राहुलची तब्येत अस्वस्थ राहायला लागली.फार काही सिरीयस नाही असे म्हणत त्याने चेकअप करायचे टाळले.पण जेव्हा जास्तच तब्येत बिघडली तेव्हा तो चेकअप करण्यासाठी डॉक्टरकडे गेला.तेव्हा त्याला कळले की त्याला कॅन्सर झाला आहे आणि तो लास्ट स्टेजला आहे.घरच्यांवर दु:खाचा पहाड कोसळला.विधीला तर काय करावे काहीच सुचत नव्हते.विधी राहुलची खूप काळजी घ्यायची. पण आता कशाचाच काही उपयोग नव्हता.अखेर तो दिवस आला जेव्हा राहुल हे जग सोडून निघून गेला.विधी आता एकटी पडली होती.पदरात दोन मुले होती.विधीने आता ग्रॅज्युएशन पूर्ण करून डीएड करायचे ठरवले.सास-यांच्या पेंशनवर आणि मिळणा-या घरभाड्यावर सर्व खर्च चालत होता.
राहुलला जाऊन एक महिना झाला होता.विधीने आता पुढे शिकायचे ठरवले.सासू- सास-यांनीही तिला पाठिंबा दिला.एके दिवशी ती बी.ए. चा फाॅर्म भरायला काॅलेजमध्ये गेली.तिथे तिची भेट अचानक अमोलसोबत झाली.दोघे एकमेकांना पाहून हसले.अमोलने विधीला सांगितले की तो त्या काॅलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागला आहे.विधीच्या बाबतीत घडलेली घटना त्याला काही लोकांकडून आधीच कळली होती.त्याचे त्याला वाईटही वाटत होते.अमोल विधीला म्हणाला,”तुझ्यासोबत जे काही घडले ते अतिशय दुर्दैवी होते.पण आता किती दिवस त्याचे दु:ख करत बसशील? तुझेपण आयुष्य आहे.तू मला एक चांगला मित्र समजून तुझे दुःख, अडचणी सांगू शकते.तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आजपासून मी घेतो.”अमोलचे बोलणे ऐकून विधीला खूप बरे वाटले.विधी आणि अमोल आता खूप चांगले मित्र म्हणून राहू लागले.त्यांचे मित्रत्वाचे संबंध अधिक दृढ होत गेले.एकामागून एक दिवस गेले.विधीचे मुलही आता मोठे झाले.विधीने ग्रॅज्युएशन पूर्ण करून डीएड केले.तिलाही शिक्षिकेची नोकरी मिळाली.तरीही अमोल तिला पैश्याची मदत करतच होता.अमोलने तब्बल दहा वर्षे विधी आणि तिच्या मुलांसाठी खर्च केले.विधी आणि तिच्या कुटुंबाचा विचार करताना त्याला मात्र स्वतः च्या आयुष्याचा विसर पडला.त्याने आजही लग्न केले नव्हते.विधी आणि तिच्या कुटुंबालाच त्याने आपले कुटुंब मानले होते.एक दिवस तो विधीला म्हणाला,”विधी,मला तुला काही सांगायचे आहे.मी तुझ्यावर आजही प्रेम करतो.मला तुझ्याशी लग्न करायचे आहे.”विधीने त्याचे बोलणे ऐकून काहीच उत्तर दिले नाही.ती अमोलला शक्य तेवढे टाळू लागली.त्याच्या प्रत्येक गोष्टीला ती दुर्लक्षित करू लागली.आजपर्यंत ज्याच्यासाठी ती वेडीपिशी व्हायची ती आता अमोलला टाळायला लागली.अमोलला तिच्या वागण्या,बोलण्यातला फरक हळूहळू जाणवू लागला.अमोलने या बाबतीत विधीला एक दिवस विचारले.त्यावर विधी म्हणाली,” हे बघ अमोल,तू माझ्यासाठी खूप काही केले मान्य.पण याचा अर्थ असा नाही की मी लग्नासाठी तुला हो म्हणेल. मला नाही वाटत की आपण लग्न करायला पाहिजे.”
विधीचे उत्तर ऐकून अमोलच्या पायाखालची जमीन सरकली.त्याला हसावं का रडावं कळेनासं झालं.जिच्यासाठी आपण आपल्या आयुष्यातील दहा वर्षे दिली ती असं काही बोलेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं.जेवढं दु:ख त्याला विधीचं लग्न झाल्यावर झालं त्यापेक्षा कितीतरी जास्त दु:ख आज त्याला झालं होतं.विधीने धोका दिल्याची जाणीव त्याला पदोपदी व्हायला लागली.त्याने केलेल्या पवित्र प्रेमाची अशी किंमत मोजावी लागेल असे त्याला कधीच वाटले नव्हते.विधीने आपल्या प्रेमाची अवहेलना केली या जाणीवेने तो रडवेला झाला.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleजिजाऊ ब्रिगेड देगलुर तर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळा.
Next articleरस्ते विकास कामांचा आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here