Home सामाजिक वृध्दाश्रम

वृध्दाश्रम

321
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240205_195451.jpg

वृध्दाश्रम

दिवसेंदिवस वृध्दाश्रमांची संख्या वाढत आहे.आपल्या भारतात एकूण लोकसंख्येच्या १४ टक्के इतके प्रमाण वृध्दांचे आहे.सर्वप्रथम वृध्दाश्रमाची सुरूवात केरळ येथे झाली.पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती.त्यामुळे वृध्दांना कधीच एकटे वाटत नव्हते.त्यांची काळजी घेणारे घरात अनेक लोक असत.त्यांचा कित्येक बाबतीत सल्ला घेतला जात असे.आज हे चित्र खूप प्रमाणात बदलले आहे.आजच्या काळात नवनवीन उपचार पद्धतींमुळे माणसाचे आयुर्मान वाढले आहे.पर्यायाने वृध्दांची संख्याही वाढली आहे.प्रश्न असा आहे की वृध्दांची काळजी घ्यायची कुणी? हल्ली अगदी मोजक्या घरांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती दिसते.काळाबरोबर समाजात अनेक बदल घडत गेले.आज घरातील स्त्रिया कामकाजी झाल्या आहेत.घरातील वृध्दांशी बोलायला, त्यांच्यासोबत वेळ घालवायला कुणालाच वेळ नसतो.नातवंडेही शाळा,काॅलेजातून आली की ट्यूशन करता बाहेर जातात.अशावेळी कित्येकदा घरातील वृध्दांना घर खायला उठतं.
हल्लीची पिढी वृध्दांना निरूपयोगी मानते.हेही एक कारण आहे वृध्दांना नाईलाजाने वृध्दाश्रमात जावं लागण्याचं.कुणालाच आपले घर सोडून जायची इच्छा नसते.आपल्या समाजात पूर्वी वृद्धाश्रमांची संख्या नगण्य होती.आज ती भरमसाठ झाली आहे.वृध्दाश्रम वाढीला ब-याच प्रमाणात पाश्चात्य संस्कृती जवाबदार आहे.घरीच जर वृद्धांची नीट काळजी घेतली तर त्यांना कधीच वृद्धाश्रमात जावे लागणार नाही.एकेकाळी वृद्धांचा घरात खूप आदर होता.पण हल्ली तरूण पिढी त्यांचे मत विचारात घेणे गरजेचे समजत नाही.हे चित्र सगळ्याच घरात आहे असे मी म्हणणार नाही.परंतु ज्या-ज्या वृध्दांकडून ऐकायला मिळतं की आम्हाला घरात कोणीच विचारत नाही, तेव्हा फार वाईट वाटतं.वृध्दांना फक्त घरातील लोकांचे प्रेमाचे दोन शब्द हवे असतात.बाकी त्यांची काहीच अपेक्षा नसते.कमीतकमी त्यांना माणूस म्हणून नीट वागवावं हीच तर अपेक्षा असते त्यांची.काही घरांत वृध्दांची पेंशन हिसकावून घेतली जाते.त्यांना अगदी लाचार केले जाते.फक्त सूनच नाही तर मुलगा आणि नातवंडेही त्यांचे काहीच ऐकत नाही.त्यांना घराच्या एका कोपऱ्यात गपगुमान बसायची ताकीद दिली जाते.मग अशा परिस्थितीत त्यांना वृध्दाश्रमाची आठवण होते.
हल्ली प्रत्येक शहरामध्ये वृध्दाश्रम उघडणे काळाची गरज आहे.कमीतकमी वृध्दांना तेथे आपले उर्वरित आयुष्य व्यवस्थित जगता येते.तिथे त्यांना कोणी टोचून बोलणारं नसतं.तेथे ते आपल्या समवयस्क लोकांसोबत आनंदाने वेळ घालवू शकतात.एकमेकांसोबत सुखदुःखे वाटल्यामुळे त्यांना खूप मानसिक आधार मिळतो.वृध्दाश्रमांत जेष्ठ नागरिकांना सर्व सुविधा दिल्या जातात.काही मुले विसरतात की त्यांच्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी किती खस्ता खाल्ल्या.त्यांना शिक्षित करण्यासाठी, त्यांना चांगली नोकरी मिळवून देण्यासाठी किती कष्ट झेलले.मुले मोठी झाली की त्यांना आईवडील ओझे वाटायला लागतात.त्याऐवजी जर पालकांना समजून घेतले तर ते वृध्दाश्रमात जाण्याऐवजी आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहतील.काही वृध्दांना आपले कुटुंब सोडून वृध्दाश्रमात जाणे रूचत नाही.पण दु:ख करत आयुष्य घालवण्यापेक्षा आहे ते दिवस वृध्दाश्रमात आनंदाने घालवणे कधीही चांगले.खरं पाहायला गेलं तर,वृध्दांच्या घरात असल्याने नातवंडांवर चांगले संस्कार होतात.वृध्द आईवडील घराकडेही लक्ष ठेवतात.त्यांना जमेल तेवढी छोटीमोठी कामेही करतात.तरीही त्यांची अवस्था घरातील एखाद्या उपरत्याप्रमाणे व्हावी ही खरच दुर्दैवी बाब आहे.मुले विसरतात की तेही कधीतरी म्हातारे होणार आहेत.कदाचित त्यांनाही त्यांची मुले वृध्दाश्रमात पाठवतील.भौतिक सुखसुविधा अनुभवताना म्हाता-या माणसांकडे दुर्लक्ष केले जाते.काही वृध्दांची आर्थिक बाजू कोलमडलेली असते.त्यांना पूर्णपणे आर्थिक बाबींसाठी आपल्या मुलांवर अवलंबून राहावं लागतं.मग त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होतो.काही मुलांची तर पालकांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे इथपर्यंत मजल जाते.मुले कोडगी झाली तर मातापित्याला वृध्दाश्रम हाच एक पर्याय उरतो.वृध्द पती-पत्नी जोपर्यंत जीवंत आहेत तोपर्यंत ते एकमेकांना सांभाळून घेतात.पण कुणा एकाचा मृत्यू झाला की परिस्थिती आणखीनच बिकट होते.हल्ली बहुतेक घरांमध्ये चौकोनी कुटुंब असते.दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये म्हाता-या आईवडिलांना कुठे ठेवायचं असा विचार कित्येक मुले करतात आणि मग त्यांना सोयिस्करपणे वृध्दाश्रमात पाठवले जाते.मुले वृध्दाश्रमात आईबापासाठी पैसे खर्च करायला तयार असतात पण त्यांना ती घरात नकोत….
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here