Home सामाजिक नातेसंबंध

नातेसंबंध

240
0

आशाताई बच्छाव

IMG_20240202_083319.jpg

नातेसंबंध

मानवी जीवन नातेसंबंधात गुरफटलेले आहे.आपल्या समाजात नातेसंबंधांना खूप महत्त्व आहे.पण हल्ली नातेसंबंधांचे महत्त्व कमी होऊन त्याऐवजी हितसंबंधांचे वर्चस्व वाढल्याचे दिसून येते.माणसाचे प्राथमिक नातेसंबंध त्याच्या कुटुंबासोबत असतात.इतर आप्तांशी व समाजातील इतर व्यक्तींशी परस्परसंबंध ठेवण्याचे शिक्षण कुटुंबातच दिले जाते.माता,पिता, बहिण,भाऊ,पती, पत्नी,पुत्र,पुत्री यांच्याशी माणसाचे प्राथमिक संबंध असतात.माणूस समाजप्रिय प्राणी आहे.सामाजिक आदानप्रदान ही एक महत्त्वाची संकल्पना आहे.समाज अनेक घटकांनी मिळून बनलेला असतो.नात्याचे प्रकारही अनेक अन् बदलत्या काळानुसार पैलूही अनेक.
एक किस्सा सांगावासा वाटतो.माझ्या शेजारी राहणाऱ्या मुळे काकू अतिशय चपळ वृत्तीच्या.पण तीन-चार दिवस होऊन गेले तरी त्या मला दिसल्या नव्हत्या.माझ्या मनाला जरा चुटपुट लागली.काही भलतच तर झालं नसेल ना असे नाना प्रकारचे विचार मनात यायला लागले.त्यांचे मिस्टर गेल्यापासून त्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या.त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत होता.तो वर्षातून एकदा काकूंना भेटायला यायचा.त्याने काकूंना कित्येकदा त्याच्यासोबत अमेरिकेला चलण्याबद्दल म्हटले,पण काकू काही तयार झाल्या नाहीत.त्यांचे म्हणणे एकच की मी इतक्या वर्षांत इथे रमली,आता इथेच मरेन.काकू इतके दिवसांपासून न दिसल्याने मला राहावले नाही.मला आता धीर धरवेना.मी त्यांची बेल वाजवली.थोड्या वेळाने काकूंनी दार उघडले.नेहमीप्रमाणे त्यांनी स्मितहास्य केले.त्यांना व्यवस्थित बघून माझ्या जीवात जीव आला.मी त्यांना म्हटले,” काकू काय झालं? तुम्ही तीन-चार दिवस कुठे होत्या?मला तर नुसता जीवाला घोर लागला होता.तुम्हाला बघून आता बरं वाटत आहे.”काकू स्मितहास्य करीत म्हणाल्या,” मला वाटलच तुला माझी काळजी वाटली असणार.मला जरा बरं वाटत नव्हतं. म्हणून फोनवर बोलूनच फॅमिली डॉक्टरांना औषध विचारले आणि मग आपल्या वाॅचमनच्या हाताने औषध मागवून घेतले.कामवाली बाईपण दोन दिवसांपासून नाही आली.मीच कसंबसं जेवण बनवून खाल्लं.तू विचारपूस करायला आली,मला खरंच खूप बरं वाटलं.” मी पुढचे दोन दिवस त्यांना जेवण नेऊन दिले आणि त्या ब-या होत पर्यंत रोज दुपारी त्यांच्याशी गप्पा केल्या.त्या ठणठणीत ब-या झाल्या तेव्हा मला शेजारधर्म पाळल्याचा आनंद झाला.
कधीकधी वाटतं रक्ताच्या नात्याइतकीच किंवा त्याहीपेक्षा गहरी काही नाती असतात.हल्ली जिवाभावाची नाती विरळ होत चालली आहेत.नाती म्हणजे काय? असा प्रश्न मला भेडसावतो.जी “ना”कारू शकत नाही ती की “ना” “ना” करता आपसुकच जुळून येतात ती? खरंच याचं उत्तर तेवढं सोपं नाहीये.रोज घरी येणा-या कामवाल्या बाईसोबत एकप्रकारे नातं जुळतंच.पूर्वी सणासुदीला त्यांना गोडधोड बांधून देण्याची पद्धत होती.आताही त्यांना दिले जाते,पण आताशा फक्त कोरडी देवाणघेवाण जास्त असते.आता हॅप्पी दसरा, हॅप्पी दिवाली म्हटले की संपलं.पूर्वी पोस्टमन दारात येऊन पत्र देऊन जायचा.त्याच्याशीही थोडा संवाद होत असे.पत्र देता देता तो अक्षर ओळख नसलेल्यांना पत्रही वाचून दाखवत होता.आता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला जातो.हल्ली पत्र लिहिणेच मुळी कमी झाले आहे किंवा कुणी कुणाला पत्र लिहित नाही असे म्हटले तरी वावगे ठरू नये.आता पोस्टमन फक्त पोस्ट ऑफिसातच दिसतात.सर्वच इंटरनेटच्या जाळ्यात अडकली आहेत.नातेसंबंध टिकून राहणे फार महत्त्वाचे आहे.तरच नात्यांना महत्त्व राहिल.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleसामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : भाई रामदास जराते
Next articleनरेंद्र गुळघाने यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्काराने हिंगणा येथे सन्मानित
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here