आशाताई बच्छाव
जळगावमधील मराठा मोर्चात पिंपरीतून शेकडो बांधव होणार सहभागी : सतीश काळे.
मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या बकालेला अटक करुन बडतर्फ करण्याची मागणी. जळगांव,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)
जळगाव येथील एलसीबी पीआय किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाचा अपमान केला. त्याविरोधात रोष व्यक्त केल्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करुन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी बकालेंचा जामिन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे बकालेला तत्काळ अटक करुन त्यांना बडतर्फ करण्याची सकल मराठा समाजाची मागणी आहे. याच मागणीसाठी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सकल मराठा समाज बांधव मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला पिंपरी चिंचवड शहरातून शेकडो मराठा बांधव सामील होणार असल्याची माहिती, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर पोलिस प्रशासनाने निलंबनाची कार्यवाही करुन त्यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र ही कारवाई तात्पुरती असून त्याबाबत मराठा समाज समाधानी नसून. भारतीय राज्यघटनेच्या कलम 311 अन्वये एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांनी केलेले वक्तव्य समाजामध्ये शांतता भंग आणि कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करून जातीय तेढ निर्माण करणे हे भारतीय घटनेच्या विरोधी आहे यासाठी अशा अधिकाऱ्यांना नोकरी मधून डिसमिसल कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावे.
किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. अशा शासकीय पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याला देखील कायद्यानुसार शिक्षा होणे गरजेचे आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या बाबत संताप व्यक्त केला होता. तरी देखील बकाले यांना अटक करुन बडतर्फ करण्याची कारवाई का केली जात नाही. राज्य शासन या अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहे की काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. तसे झाले तर समाजात सामाजिक तेढ निर्माण करण्यास अधिकारी जबाबदार असतील. यांना वेळीच आळा घालने गरजेचे आहे.
या अधिकाऱ्याला त्वरित अटक करून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी जळगाव येथील सकल मराठा समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्धार पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाज बांधवांनी केला आहे. या मोर्चाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी सतीश काळे यांनी केले.