आशाताई बच्छाव
ओबीसींचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत; ओबीसी जनमोर्चाची मागणीं, पटोले यांना दिले निवेदन
राजापूर/रत्नागिरी,(सुनील धावडे) : ओबीसींचे राजकीय आरक्षण पूनर्स्थापित करण्यासाठी जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समर्पित आयोगाच्या अहवालासंबंधी व त्यांनी केलेल्या शिफारशींसंबंधी आमचे आक्षेप नोंदवा, दशवार्षिक जनगणना करण्यात यावी तसेच या जनगणनेच्या धर्तीवर सखोल सर्वेक्षण करण्यात यावे, ओबीसींचे राजकीय आरक्षण तसेच इतर मागण्यांबाबत आपल्याकडून गांभीयार्ने आवाज उठवण्यात यावा अशा मागण्या घेऊन ओबीसी जनमोर्चाच्या एका शिष्टमंडळाने रविवारी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांची शासकीय विश्रामधाम येथे भेट घेत निवेदने दिली.
ओबीसी जनमोचार्चे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या भेटीत राजापूर तालुका ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. दरम्यान राज्यभरातील सर्व संघटनांना एकत्रित करून ओबीसींच्या मागण्यांसाठी भविष्यात मोठा लढा उभारण्यात येईल असे यावेळी पटोले यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले. ओबीसी संघटनांच्या या भेटीत परराज्यात शिकत असणाऱ्या ओबीसी, व्हिजे, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा म्हणून प्रयत्न करावेत अशी मागणीही पटोले यांच्याकडे करण्यात आली. अनुसूचित जाती जमातींप्रमाणेचे ओबीसी, व्हिजे, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती , शिक्षण शुल्क , परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती , निर्वाह भत्ता अदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी चंद्रकांत बावकर यांनी यावेळी केली.
यावेळी शिष्टमंडळात राजापूर तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष महेश शिवलकर , उपाध्यक्ष जितेंद्र पाटकर , सेक्रेटरी चंद्रकांत जानस्कर , जिल्हा उपाध्यक्ष व कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, पंढरीनाथ आंबेरकर, श्रीकांत राघव , सौ. अनामिका जाधव तसेच अन्य पदाधिकारी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड उपस्थित होते.